जेजुरी येथील भेसळयुक्त भंडार्‍यामुळे भाविकांच्या आरोग्याला धोका !

भेसळ करण्याची संधी न सोडणारे देशासाठी घातक आहेत.

जेजुरी (पुणे) – महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाच्या नगरीत भेसळयुक्त भंडारा आणि कुंकू यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. भेसळयुक्त भंडार्‍याच्या उधळणीमुळे डोळे चुरचुरणे, त्वचेची आग होणे, नाकामध्ये भंडारा गेल्यामुळे श्वसनाला त्रास होणे, घसा खवखवणे, प्रसंगी खोकला लागणे, असे आजार बळावू लागले आहेत. भेसळयुक्त भंडार्‍यामुळे खंडोबा गडाच्या ऐतिहासिक वास्तूलाही बाधा निर्माण होत आहे. या सर्व प्रकारामध्ये अन्न आणि औषध भेसळ प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून जेजुरीतील भेसळयुक्त भंडारा विक्रेत्यांचे अन्वेषण करून त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याची आवश्यकता आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे ‘यलो पावडर’ विकली जात आहे. दळणवळण बंदीच्या काळात राहिलेला आणि प्रतवारी संपलेला भंडारा विकला जात आहे. यांमुळे भाविक आणि नागरिक यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.