‘प्रत्येक दंगलखोर हा मुसलमानच असतो’ असे साम्यवादी नेत्या कविता कृष्णन् यांचे अप्रत्यक्ष कथन !

हरिद्वारमध्ये झालेल्या धर्मसंसदेत कथित रूपाने मुसलमानविरोधी वक्तव्ये करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधात आकाशपाताळ एक करणारे आता कविता कृष्णन् यांच्या विरोधात चकार शब्दही बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक

साम्यवादी नेत्या कविता कृष्णन्

नवी देहली – साम्यवादी आणि हिंदुद्वेषाने पछाडलेल्या कविता कृष्णन् यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्रामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या उत्तरप्रदेश शासनाच्या एका विज्ञापनावर आक्षेप घेतला आहे. कृष्णन् यांनी या विज्ञापनाचे छायाचित्र ट्वीटला जोडत वृत्तपत्राचे मुख्य संपादक राजकमल झा यांना उद्देशून लिहिले आहे, ‘उत्तरप्रदेश सरकारचे तुमच्या वृत्तपत्राच्या पहिल्या पृष्ठावर छापण्यात आलेले हे मोठे (अर्धे पान) विज्ञापन मुसलमानविरोधी आहे. हे विज्ञापन प्रकाशित करण्यामागे ‘केवळ व्यावसायिक हेतू होता’, असे सांगून निर्णय घेतल्याचे नाटक तुम्ही करू शकत नाही. या विज्ञापनाच्या पाठीशी तुमचा संपादकीय विभाग असून तुमचे वृत्तपत्र हे ‘फासिस्ट’ (हुकुमशाही) विचारसरणीला प्रोत्साहन देत आहे. हे धक्कादायक आहे !’

काय आहे विज्ञापन ?

उत्तरप्रदेश शासनाच्या विज्ञापनामध्ये वर्ष २०१७ च्या आधी ‘दंगाइयों का खौफ’ (दंगलखोरांचे भय) आणि वर्ष २०१७ च्या नंतर ‘मांग रहे हैं माफी (क्षमा मागत आहेत ) अशा प्रकारे तुलना करण्यात आली आहे. वर्ष २०१७ च्या आधी एक दंगलखोर पेट्रोल बाँब फेकत असल्याचे विज्ञापनाच्या छायाचित्रात दाखवण्यात आले आहे, तर वर्ष २०१७ नंतर तो पोलीस ठाण्यात येऊन क्षमा मागत असल्याचे दिसत आहे. विज्ञापनाच्या खाली ‘सोच ईमानदार काम दमदार’ असे लिहिण्यात आले आहे. या विज्ञापनात दंगलखोर हा कोणत्या धर्माचा अथवा पंथाचा आहे, हे लक्षात येत नाही. तरीही कविता कृष्णन् यांनी हे विज्ञापन मुसलमानविरोधी असल्याचे म्हणत एकप्रकारे उत्तरप्रदेशमध्ये घडवून आलेल्या दंगली धर्मांधांनीच घडवल्या आहेत, हे अप्रत्यक्षपणे मान्य करून इंडियन एक्सप्रेस आणि योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील शासन यांच्यावर टीका केली आहे. वर्ष २०१७ मध्ये भाजपने उत्तरप्रदेश विधानसभेत तीन चतुर्थांश मते जिंकून उत्तरप्रदेशमध्ये सत्ता स्थापन केली होती.