पृथ्वीच्या दिशेने एक लघुग्रह प्रचंड वेगाने येत आहे !

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ची माहिती

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने दिलेल्या माहितीनुसार एक विशाल लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने अत्यंत वेगाने येत आहे. हा लघुग्रह  पृथ्वीच्या अत्यंत जवळून प्रवास करणार आहे. नासाचे वैज्ञानिक त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. या लघुग्रहाला ‘२०१७ एई ३’ असे नाव देण्यात आले आहे. तो ताशी ७५ सहस्र किमी वेगाने पृथ्वीच्या कक्षेकडे प्रवास करत आहे. हा लघुग्रह ताजमहालपेक्षा तिप्पट मोठा आहे. हा लघुग्रह ३५३ मीटर रुंद असून तो पृथ्वीच्या १९ लाख मैल जवळ येण्याची शक्यता आहे. या लघुग्रहाने त्याचा मार्ग पालटला आणि तो पृथ्वीवर आदळला, तर विनाश उद्भवू शकतो, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. आतापर्यंत पृथ्वीच्या इतिहासात केवळ २ लघुग्रहांनी पृथ्वीच्या अत्यंत जवळून प्रवास केला आहे.

लघुग्रह हे असे दगड आहेत जे सूर्याभोवती एखाद्या ग्रहाप्रमाणे फिरत असतात; परंतु ते आकाराने ग्रहांपेक्षा पुष्कळच लहान असतात. आपल्या सौरमालेतील बहुतेक लघुग्रह मंगळ आणि गुरु ग्रहांच्या कक्षेत लघुग्रहांच्या पट्ट्यात आढळतात. ‘नासा’कडून सध्या जवळपास २ सहस्र अशा लघुग्रहांवर लक्ष ठेवले जात आहे, जे भविष्यात पृथ्वीसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. यामध्ये २२ अशा लघुग्रहांचा समावेश आहे, जे येत्या १०० वर्षांत पृथ्वीवर आदळण्याची काही प्रमाणात शक्यता आहे.