मुंबई, २८ डिसेंबर (वार्ता.) – ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या अहवालानुसार महाराष्ट्र गुन्हेगारीत देशात प्रथम ३ क्रमांकांमध्ये आहे. इतकी वाईट स्थिती राज्याची आहे. राज्यात महिलांवरील अत्याचार, बलात्कार, अपहरण अशा गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बिहार राज्यात दोष सिद्ध होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे, तर महाराष्ट्रात हेच प्रमाण केवळ १५.३ टक्के आहे. पोलिसांच्या वेशात वसुली करणारा गुंड म्हणजे सचिन वाझे होय. त्यामुळे राज्यातील पोलीस विभाग हा खंडणी वसुली विभाग होत आहे, अशी टीका भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली. ते अंतिम आठवडा प्रस्तावावर विधानसभेत बोलत होते.