१. साधना करू लागल्यानंतर योग्य वेळी आवश्यक ते साहाय्य मिळणे आणि ‘परात्पर गुरु डॉक्टरच आवश्यक ते उपलब्ध करून देत आहेत’, असा भाव निर्माण होणे
‘माझ्या यजमानांचे निधन झाल्यामुळे ३ मुले आणि घरातील सर्व दायित्व माझ्यावर असल्याने मला पुष्कळ ताण यायचा. ‘अशा परिस्थितीत आपण जगू शकत नाही’, असे मला वाटायचे; परंतु सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करायला लागल्यापासून माझे आयुष्यच पालटून गेले. अडचणीच्या वेळी मी परात्पर गुरुदेवांना प्रार्थना केली की, माझी ती अडचण सुटायची. हळूहळू ‘परात्पर गुरु डॉक्टरच आपल्याला आवश्यक तेवढे देत आहेत’, असा भाव त्यांच्याच कृपेने माझ्या मनात निर्माण झाला आणि त्यातून मला पुष्कळ आनंद मिळू लागला अन् माझ्या अडचणी सुटू लागल्या. आर्थिक अडचण असेल, तर काही काम केले की, मला आवश्यक तेवढे पैसे मिळतात. मला काही त्रास होत असेल, तर परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर माझा तो त्रास लगेच न्यून होतो. मानसिक त्रास होत असेल, तर परात्पर गुरुदेव साधकांच्या माध्यमातून आधार देऊन त्यातून मला बाहेर काढतात.
२. छातीत दुखत असतांनाच्या काळात आधुनिक वैद्यांकडे काम मिळणे, त्यांनी विनामूल्य उपचार करणे आणि ‘त्यांच्या रूपातून परात्पर गुरुदेवच काळजी घेत आहेत’, असे जाणवणे
मी नुकतीच साधनेत आले होते, त्या वेळी मला छातीत दुखण्याचा त्रास होत होता. आधुनिक वैद्यांनी ‘तुमच्या हृदयाला सूज आली आहे’, असे सांगितले. त्याच कालावधीत मला एका आधुनिक वैद्यांच्या चिकित्सालयात काम मिळाले होते. त्यांनी माझ्या सर्व चाचण्या विनामूल्य करून माझ्यावर औषधोपचार केले. त्यांच्या उपचारांनी मला बरे वाटले. त्या वेळी ‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेनेच मला त्या आधुनिक वैद्यांकडे काम मिळाले’, असे मला वाटले. ‘त्यांच्या माध्यमातून परात्पर गुरुदेवच सतत माझी काळजी घेत आहेत’, असे जाणवत होते.
३. बिघडलेला भ्रमणभाष आपोआप चालू होऊन त्याच्या पडद्यावर गुरुदेवांचे नारायणाच्या रूपातील छायाचित्र येणे आणि चंदनाचा सुगंध येऊन ‘परात्पर गुरुमाऊली समवेत आहे’, असे जाणवणे
मुलाच्या लग्नाच्या दिवशी सकाळी माझा बिघडलेला भ्रमणभाष आपोआप चालू झाला आणि परात्पर गुरुदेवांचे नारायणाच्या रूपातील छायाचित्र माझ्या भ्रमणभाषच्या पडद्यावर आले. मला नारायणाच्या रूपातील गुरुदेवांचे दर्शन झाले. त्या वेळी मला चंदनाचा सुगंध येत होता आणि ‘परात्पर गुरुमाऊली माझ्या समवेत आहे’, असे जाणवत होते. ‘सर्वकाही परात्पर गुरुदेवच करवून घेत आहेत’, असे वाटून मला हलकेपणा जाणवत होता.
४. आर्थिक परिस्थिती बेताची असूनही परात्पर गुरुदेवांच्या कृपेनेच मुलाच्या लग्नाची सिद्धता झाल्याचे जाणवणे
आमची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने ओळखीचे लोक मला विचारायचे, ‘‘तुम्हाला कुणाचा आधार नाही. मग तुम्ही लग्नाची सिद्धता कशी केलीत ?’’ त्या वेळी ‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेनेच सर्वकाही होत आहे. ते माझ्या पाठीशी आहेत; म्हणून मला हे करणे शक्य आहे. तेच मला शक्ती देऊन माझी क्षमता वाढवत आहेत, अन्यथा मला एवढे करणे शक्य नाही’, असे मला वाटले.
५. रामनाथी आश्रमात सेवा करतांना ‘ॐ’कार ऐकू येणे आणि ‘अंतराळात सेवा करत आहे’, असे वाटणे
अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या वेळी रामनाथी आश्रमात सेवा करतांना मला आतून सतत आनंद मिळत होता आणि ‘ॐ’कार ऐकू येऊन शांत वाटत होते. परात्पर गुरुदेवांप्रती माझा भाव सतत जागृत होत होता. माझ्याकडून त्यांचा धावा आणि त्यांना आत्मनिवेदन होत होते. ‘मी अंतराळात हवेत सेवा करत आहे’, असे मला वाटत होते.
६. कृतज्ञता
‘परात्पर गुरुदेव, आपण माझ्या जीवनात आलात; म्हणून मी जिवंत राहू शकले आणि साधना करू शकले. आपण या अज्ञानी जिवाला जवळ केलेत. परात्पर गुरु डॉक्टर, तुम्हीच माझे माता-पिता, बंधू, सखा, तुम्हीच माझा श्रीकृष्ण अन् श्रीमन्नारायण आहात. तुम्हीच माझे गुरुदेव अन् तुम्हीच माझे सर्वकाही आहात. तुमच्याविना माझ्या जीवनाला अर्थच नाही.’
वरील लिखाण पूर्ण झाल्यावर मला चंदनाचा सुगंध येत होता आणि सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवत होते.’
– श्रीमती अनिता भोसले, कराड, सातारा. (जून २०१८)
|