भाषेची सात्त्विकता हा तिचा अभ्यासक्रमात समावेश करावयाचा निकष असावा ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘भाषा आणि लिपी’ या विषयावरील संशोधन नवी देहली येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ‘ऑनलाईन’ सादर !

संस्कृत भाषा अन्य भाषांच्या तुलनेत सर्वाधिक सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित करते ! – संशोधनाचा निष्कर्ष

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक, तर श्री. शॉन क्लार्क आहेत सहलेखक !
श्री. शॉन क्लार्क

देहली – भाषा हे अभिव्यक्ती आणि परस्पर संवाद यांचे प्राथमिक साधन असल्यामुळे आपण बोलत असलेली भाषा आपल्या जीवनाचे एक मोठे अंग असते. आपली मातृभाषा कोणती असावी ? हे आपल्या हातात नाही; परंतु सात्त्विक भाषा शिकणे आपल्या हातात आहे. संशोधनासाठी निवडलेल्या ८ राष्ट्रीय आणि ११ विदेशी भाषांपैकी ‘संस्कृत’ अन् तिच्या नंतर ‘मराठी’ भाषा सर्वाधिक सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित करतात, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शॉन क्लार्क यांनी केले. ते नवी देहली येथे झालेल्या २५ व्या ‘इंडिया कॉन्फरन्स ऑफ वेव्हज् ऑन द कन्सेप्ट ऑफ लिबर्टी अँड इक्वॅलिटी इन वेदिक पर्स्पेक्टिव्ह’ या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ‘ऑनलाईन’ बोलत होते. श्री. क्लार्क यांनी परिषदेमध्ये ‘सर्वाधिक लोकप्रिय भाषा आणि त्यांच्या लिपी यांतील सूक्ष्म स्पंदने’ हा शोधनिबंध सादर केला. या परिषदेचे आयोजन ‘द वाईडर असोशिएशन फॉर वेदिक स्टडिज (वेव्हज्), न्यू दिल्ली’ यांनी केले होते. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले या शोधनिबंधाचे लेखक, तर श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत.

१. श्री. शॉन क्लार्क पुढे म्हणाले की, लिखित किंवा बोलण्याच्या माध्यमातून भाषेतूनही सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असतात. आपण आणि ज्यांच्याशी आपण संवाद साधत असतो ते, यांवरही आपल्या भाषेतील स्पंदनांचा परिणाम होत असतो.

२. श्री. शॉन क्लार्क यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने प्रभावळ मापक यंत्रे, तसेच सूक्ष्म परीक्षण यांच्या माध्यमातून केलेल्या काही चाचण्यांची माहिती दिली. यामध्ये पहिल्या चाचणीत ‘सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला अस्ताला जातो’, हे वाक्य ८ राष्ट्रीय आणि ११ विदेशी भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आले.

एका कागदावर एका भाषेतील वाक्य याप्रमाणे प्रत्येक भाषेतील वाक्य वेगळ्या ‘ए ४’ आकाराच्या कोर्‍या कागदांवर छापली. त्यानंतर त्या प्रत्येक कागदातून प्रक्षेपित होणार्‍या सूक्ष्म ऊर्जेचा अभ्यास युनिव्हर्सल ऑरा स्कॅनरच्या (‘यू.ए.एस्.’च्या) माध्यमातून करण्यात आला. काही भाषांतून केवळ नकारात्मक ऊर्जा, काहीतून सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही ऊर्जा, तर काहींतून केवळ सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होत होती. देवनागरी लिपी असलेल्या भाषांमध्ये अन्य भाषांच्या तुलनेत अधिक सकारात्मक ऊर्जा आढळली. संस्कृत भाषेत सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा होती आणि तीची प्रभावळ १४.२१ मीटर होती. त्या खालोखाल सकारात्मक ऊर्जा मराठी भाषेत होती.

३. अन्य एका चाचणीत वरील चाचणीतील संस्कृत वाक्य महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय-निर्मित सात्त्विक शैलीतील अक्षरांमध्ये आणि संगणकातील प्रचलित शैलीतील अक्षरांमध्ये छापण्यात आले. सात्त्विक शैलीतील अक्षरांमध्ये संगणकातील प्रचलित शैलीतील अक्षरांच्या तुलनेत १४६ टक्के अधिक सकारात्मक ऊर्जा आढळली.

निष्कर्ष

शोधनिबंधाचा समारोप करतांना श्री. शॉन क्लार्क म्हणाले की, शैक्षणिक संस्था आपल्या अभ्यासक्रमांसाठी भाषा निवडतांना भाषेची सात्त्विकता हा प्रधान निकष ठेवू शकतात.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने वैज्ञानिक परिषदेत सादर केलेला हा ८५ वा शोधनिबंध होता. यापूर्वी विश्वविद्यालयाने १५ राष्ट्रीय आणि ६९ आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी ९ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला ‘सर्वोत्कृष्ट शोधनिबंध’ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.