|
मुंबई, २३ डिसेंबर (वार्ता.) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातील आर्थिक अपहाराच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या धामणसकर समितीचा अहवाल वर्ष २०१८ मध्ये प्राप्त होऊन ३ वर्षांनंतरही या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात आलेली नाही. या विद्यापिठातील घोटाळ्याविषयी २३ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीवर उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीमधून हा प्रकार उघड झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठासह अन्य काही विद्यापिठांनी मागील अनेक वर्षांपासून लेखापरीक्षण सादर केले नाही, अशी धक्कादायक माहिती या वेळी उदय सामंत यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण यांनी ही लक्षवेधी सभागृहात उपस्थित केली होती.
मराठवाडा विद्यापिठात निविदा न काढता उपकरणे खरेदी करणे, स्वत:ची छपाई यंत्रणा असतांना बाहेरून चढ्या दराने छपाई करवून घेणे, शुल्क वसुलीच्या नोंदी न ठेवणे आदी अपहार करून १२७ कोटी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा आरोप लक्षवेधीमध्ये करण्यात आला आहे. यावर उत्तर देतांना उदय सामंत यांनी ‘या प्रकरणाच्या कारवाईची धारिका माझ्याकडे १ मासापूर्वी आली. ही धारिका स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे पाठवली आहे. राज्यपालांनी याविषयी विधी आणि न्याय विभागाशी चर्चा करून १५ दिवसांत गुन्हा नोंदवण्यात येईल’, असे आश्वासन सभागृहात दिले. या वेळी भाजपचे आमदार गाणार यांनी लेखापरीक्षणासाठी पाठपुरावा न करणारे प्रशासकीय अधिकार्यांवर यांच्यावर कारवाई व्हावी, तसेच अहवाल सादर होऊनही कारवाई का रखडली, याची चौकशी करण्याची मागणी केली.