उत्तरदायी घटकांचे दायित्वशून्य वर्तन !

 संपादकीय

न्याययंत्रणा

न्याययंत्रणा ही देशाच्या ४ प्रमुख स्तंभांपैकी एक यंत्रणा आहे. त्यामुळे या यंत्रणेशी संबंधित प्रत्येक घटकाने दायित्वाने वर्तन करायला हवे. गेल्या काही दिवसांत याच न्याययंत्रणेचे घटक असणार्‍या अधिवक्त्यांचे मात्र लज्जास्पद वर्तन समोर येत आहे. कोरोनामुळे न्यायालयातील खटल्यांची ‘ऑनलाईन’ सुनावणी होत आहे. मद्रास उच्च न्यायालयाचे अधिवक्ता आर्.डी. संथन कृष्णन् खटल्याची ‘ऑनलाईन’ सुनावणी चालू असतांना ‘व्हिडिओ क्लिप’मध्ये एका महिलेसमवेत आक्षेपार्ह स्थितीत आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशा अनैतिक घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अधिक कठोर प्रयत्न करावे लागणार, हे लक्षात येते.

अधिवक्ता हे पद भूषवणारी व्यक्ती सज्ञान आणि हुशार असते. ‘व्यक्ती हुशार असली, तरी तिला सामाजिक मर्यादांचे भान असेलच, असे नाही. शाळांपासून ते पदव्युत्तर शिक्षण घेतलेले नीतीमान असतीलच, असे नाही’, असेच या घटनेवरून खेदाने म्हणावे लागेल. गेल्या काही वर्षांत समाजातील नैतिकता झपाट्याने घसरत आहे. शिक्षणक्षेत्रापासून ते न्यायालयापर्यंत याचे लोण आता पोचले आहे, हे चिंताजनक आहे. स्वातंत्र्यानंतर एकाही सरकारने जनतेला धर्मशिक्षण न दिल्याने समाजात नैतिकतेचा र्‍हास होत चालला आहे. याविरोधात कठोर कारवाई अत्यल्प वेळा होते. त्यामुळे अनैतिक कृत्ये करणार्‍यांना कारवाईचा धाक रहात नाही. समाजातील अपप्रकारांविरुद्ध आवाज उठवणे, तसेच सरकारला या संदर्भात जागृत करणे, हे समाजसेवी आणि मानवतावादी संघटना यांचे कार्य आहे; परंतु स्वत:ला पुरोगामी म्हणवणार्‍या अशा संघटना उच्छृंखलतेकडे झुकणार्‍या स्वातंत्र्याविषयी तोंडभरून बोलतात, अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी टाहो फोडतात. समाजाला नैतिकता शिकवणार्‍यांना मात्र ‘धर्मांध, बुरसटलेले’ आदी संबोधून हिणवतात.

समाज नीतीमान असला, तरच देशाचे भवितव्य उज्ज्वल असू शकते. सध्याच्या शिक्षणप्रणालीतून हे साध्य होणे शक्य नाही. नुकतेच केंद्र सरकारने ‘शाळांमधून भगवद्गीता शिकवली जाऊ शकते. या संदर्भात राज्य सरकारने निर्णय घ्यावा’, असे म्हटले आहे. भगवद्गीतेसारखे हिंदूंचे आध्यात्मिक ग्रंथ व्यक्तीची सर्वार्थाने जडण-घडण करतात. त्यामुळे राज्य सरकारांनी या दृष्टीने सकारात्मक पावले उचलायला हवीत, हेच सध्याच्या घटनांवरून लक्षात येते. समाजाला धर्मशिक्षण देऊन नीतीमान करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करायला हवेत, हेच येथे अधोरेखित करण्यासारखे सूत्र !