‘पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट असून त्यामुळे दगडफेक करणे, शांतताभंग करणे चुकीचे !’

  • बेंगळुरू (कर्नाटक) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना

  • कर्नाटकचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे विधान !

  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे धाडस भाजपच्या राज्यात होते, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारचा धर्मांध आणि समाजकंटक यांच्यावर वचक असला पाहिजे ! – संपादक
  • कायदा हातात घेणे, याचे कधीही समर्थन करता येणार नाही; मात्र पुतळ्याच्या विटंबनेला ‘छोटी गोष्ट’ म्हणणे, हा हिंदूंच्या अस्मितेचा अवमान आहे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक

बेळगाव – कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथील सदाशिवनगरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यानंतर येथे धर्माभिमान्यांनी रस्त्यावर उतरून निषेध करण्यास प्रारंभ केला. काही ठिकाणी दगडफेकीच्याही घटना घडल्या. या विटंबनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी संतापजनक विधान केले आहे. ते म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट असून त्यामुळे दगडफेक करणे आणि शांतताभंग करणे चुकीचे आहे.’ मुख्यमंत्री बोम्माई येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई

पंतप्रधानांनी कर्नाटकातील मराठी जनतेवरील अत्याचार थांबवून संबंधितांवर कडक कारवाई करण्यास राज्यशासनाला सांगावे ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ आमचेच नाहीत, तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवर होणारे कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावे अन् तेथील राज्यशासनाला संबंधितांवर त्वरित कडक कारवाई करण्यास सांगावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

ते पुढे म्हणाले…

१. बेंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याविषयी अघटित घडले आहे. त्याची कसून चौकशी करायलाच हवी. याकडे डोळेझाक करू नका.

२. भाजपशासित कर्नाटकात शिवरायांची विटंबना होते; मात्र कुणावरही कारवाई केली जात नाही. उलट मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो, हे अतिशय निंदनीय आणि अवमानकारक आहे.

बेळगाव येथे शिवसेनेचा मोर्च्याद्वारे निषेध, तर कोल्हापुरात कर्नाटकच्या वाहनांना काळे फासले !

कोल्हापूर, १८ डिसेंबर (वार्ता.) – बेंगळुरू शहरात १७ डिसेंबर या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारूढ पुतळ्यावर समाजकंटकांनी काळी शाई टाकून विटंबना करण्याचा प्रयत्न केला. याचे पडसाद कालपासून बेळगाव शहर आणि कोल्हापूर जिल्ह्यात उमटले. बेळगाव येथे १८ डिसेंबर या दिवशी सकाळी शिवसेनेने मोर्चा काढून निषेध नोंदवला, तर कोल्हापूर शहरात कर्नाटकच्या वाहनांना काळे फासण्यात आले. बेळगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिषेक घालण्यासाठी एकत्र आलेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली. बेळगाव शहरात कलम १४४ लागू करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

१. १७ डिसेंबर या दिवशी कोल्हापूर शहरात शिवप्रेमींनी शिवतीर्थावर एकत्र येऊन निषेध नोंदवला. यानंतर शिवप्रेमींनी काही कानडी लोकांची उपहारगृहे बंद केली.

२. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर कोगनोळी येथील सीमा पडताळणी नाक्यावर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्‍या आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात येणार्‍या वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

३. मिरज शहरातही या घटनेचे पडसाद उमटले असून कर्नाटक राज्याच्या २ बसगाड्यांवर दगडफेक करण्यात आली. शिवसैनिकांनी शहरात काही वाहनांवर दगडफेक करून त्यांच्या काचा फोडल्या, तर शहरातील काही कन्नड व्यावसायिक आणि आधुनिक वैद्य यांच्या फलकांची तोडफोड करण्यात आली. यामुळे शहरातही काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.