धर्माधारीत ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था बंद करून प्रमाणपत्र देणार्‍या संस्थांची चौकशी करावी ! – अनिकेत कदम, जिल्हा उपाध्यक्ष, ‘भाजप व्यापारी आघाडी’

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन देतांना सातारा येथील हिंदुत्वनिष्ठ

सातारा, १७ डिसेंबर (वार्ता.) – केवळ धर्माच्या आधारावर निर्मिलेली ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था अन्य समाज घटकांवर लादण्यात येत आहे. मुसलमान समाजाच्या मागणीमुळे बहुसंख्यांक हिंदु समाज, तसेच मुसलमानेतर अन्य अल्पसंख्यांक समाज यांना ‘हलाल प्रमाणित’ पदार्थ किंवा उत्पादने घ्यायला लावणे, हे धार्मिक अधिकारांवर गदा आणणारे आहे. त्यामुळे धार्मिक भेदभाव करणार्‍या ‘हलाल सर्टिफिकेशन’वर भारतात बंदी आणावी, तसेच ज्या संस्था ‘हलाल सर्टिफिकेशन’ देतात, त्या सर्व संस्थांची सीबीआयद्वारे चौकशी करून या निधीचा उपयोग आतंकवाद्यांना साहाय्य करण्यासाठी झाला का ? याद्वारे राष्ट्रीय सुरक्षेला काही धोका नाही ना ? याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ‘भाजप व्यापारी आघाडी’चे जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत कदम यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कृती का करत नाही ? – संपादक)

या वेळी भाजप व्यापारी आघाडीचे सरचिटणीस मनीष महाडवाले, युवा नेते गणेश घोरपडे, नगरसेवक विजयकुमार काटवटे, भाजपचे जिल्हा सचिव सिद्धार्थ गुजले, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री हेमंत सोनवणे, राजेंद्र सांभारे, सौ. राजेश्वरी सांभारे आदी उपस्थित होते.

निवेदनामध्ये म्हटले आहे की, ज्या खासगी आस्थापनांना ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्याची अनुमती देण्यात आली आहे, त्या सर्व आस्थापनांची अनुमती सरकारने त्वरित रहित करावी. शासनाच्या रेल्वे, एअर इंडिया आदी सरकारी आस्थापनांमध्ये ‘हलाल प्रमाणित’ पदार्थच पुरवले जातात, ही व्यवस्था त्वरित बंद करावी.