कठीण प्रसंगांना स्थिरतेने सामोरे जाणारे, सेवाभाव आणि दृढ श्रद्धा आदी दैवी गुणांचा समुच्चय असलेले सनातनचे २६ वे संत पू. सदाशिव (भाऊ) परब !
आज दत्तजयंती या दिवशी सनातनच्या कोल्हापूर सेवाकेंद्रातील आणि मूळचे डिचोली, गोवा येथील सनातनचे संत पू. सदाशिव (भाऊ) परब यांचा ८१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त डिचोली, गोवा येथील साधक श्री. माधव पराडकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
लेखक : श्री. माधव रामचंद्र पराडकर, डिचोली, गोवा.
पू. सदाशिव (भाऊ) परब यांच्या चरणी ८१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून शिरसाष्टांग नमस्कार !
१. सर्वांना हवेहवेसे वाटणारे पू. भाऊ !
‘पू. भाऊंची आणि आमची ओळख प्रथम सनातन संस्थेच्या माध्यमातून झाली. ‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आम्हा सर्वांनाच ते हवेहवेसे वाटतात.
२. ‘आदर्श साधक कसा असावा ?’, ते पू. भाऊंकडून शिकावे. त्यामुळे श्री गुरुदेवांनीच त्यांची अल्पावधीत साधक, शिष्य ते संत अशी आध्यात्मिक प्रगती करवून घेतली.
३. निवासस्थानाला लागलेल्या भीषण आगीत पू. भाऊंच्या घराची पुष्कळ मोठी हानी होऊनही ते अतिशय स्थिर असणे
मूळगाव, डिचोली (गोवा) येथील पू. भाऊंच्या निवासस्थानाला लागलेल्या भीषण आगीत त्यांच्या घराची मोठी हानी झाली. तेव्हा ते कोल्हापूर येथे सेवारत होते. या घटनेनंतर आम्ही त्यांना भेटलो, तेव्हा ते अतिशय स्थिर होते. ते एवढेच म्हणाले, ‘‘केवढा हा वाईट शक्तींचा प्रताप आहे. केवळ आणि केवळ आम्ही श्री गुरुकृपेनेच वाचलो !’’ आगीची एवढी मोठी दुर्घटना घडली, तरी पू. भाऊंची खोली पूर्ण सुरक्षित होती. खरंच हा चमत्कार आहे. या घटनेतून आम्हाला ‘श्रीगुरुकृपा कशी कार्यरत असते ?’, ते शिकायला मिळाले.
‘अशा या आमच्या पू. भाऊंना दीर्घायुरारोग्य लाभो आणि असे संतरत्न समाजाला दिले’, यासाठी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– (६.१२.२०२१)
लेखिका : सौ. पुष्पा माधव पराडकर (वय ७२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), डिचोली, गोवा.
१. सत्संगाला नियमित उपस्थित रहाणारे पू. भाऊ परब !
पूर्वी मूळगाव (शिरोडवाडी) येथील ‘श्री धाकटी वनदेवता’ सभागृहामध्ये सौ. मंगला मराठे यांनी ‘सनातन संस्थे’च्या वतीने प्रवचन घेतले होते. नंतर तिथे काही मास सत्संग चालू होता. सत्संगाला इतर कुणी आले नाही, तरी पू. भाऊ परब नियमित सत्संगाला उपस्थित रहायचे. त्यांचा साधनेचा पाया होताच. केवळ योग्य मार्ग मिळायचा होता. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या एकट्यासाठीच या सत्संगाचे नियोजन केले होते’, असे मला वाटते.
२. साधकांना साधनेसाठी प्रोत्साहन देणारे आणि साधकांना सेवेत सहभागी करून घेणारे पू. भाऊ परब !
गुरुपौर्णिमेचा प्रसार, ग्रंथप्रदर्शन, सणवारानिमित्त प्रवचन घेणे या सर्व सेवांमध्ये पू. भाऊ आम्हा साधकांना सहभागी करून घ्यायचे. एकदा श्री गणेशचतुर्थीनिमित्त २० ते २५ प्रवचनांचे आयोजन केले होते. वन, मावळींगे, लाडफे, साळ, मेणकुरे, पिर्ण, तसेच मूळगाव ही गावे पू. भाऊंच्या प्रसाराची महत्त्वाची ठिकाणे होती. प्रत्येक शाळेमध्ये पू. भाऊ सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन ठरवायचे. गोव्यात पुष्कळ जत्रा असतात. प्रत्येक गावातील जत्रेमध्ये पू. भाऊ ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करायचे.
३. कौटुंबिक अडचणी असतांनाही सेवेला तत्पर असणारे पू. भाऊ !
पू. भाऊंचे नियोजन पुष्कळ चांगले असायचे. सेवेसाठी ते १५ ते २० मिनिटे पूर्वीच उपस्थित रहायचे. पू. भाऊंना कौटुंबिक अडचणी पुष्कळ असायच्या. एकदा त्यांची पत्नी (सौ. सुशिला परब) पुष्कळ आजारी होती; परंतु पू. भाऊ स्थिर होते. त्या परिस्थितीतही ते सेवेला तत्पर असायचे. त्यांच्या तोंडवळ्यावर आम्ही कधीही निराशा किंवा दुःख पाहिले नाही. ते कधीच आपले दुःख इतरांना सांगत नसत. त्या वेळी ते संत झाले नव्हते; पण संतत्वाची सर्व लक्षणे, भाव आणि तळमळ प.पू. गुरुदेवांनी ओळखली. ‘ते ‘संतपदी’ विराजमान झाले’, याचा आम्हाला अभिमान वाटतो.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती दृढ श्रद्धा असलेले पू. भाऊ परब !
पूर्वी सेवेच्या बैठकीसाठी डिचोलीहून फोंडा येथे पू. भाऊ एकटेच दुचाकीने जात असत. त्यांचे वयही अधिक होते; पण ते म्हणायचे, ‘‘प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉक्टर) माझ्या समवेत असतात. मग चिंता कसली ?’’ ‘पू. भाऊंमधील भावामुळेच त्यांची आध्यात्मिक प्रगती अतिशय जलद झाली’, असे मला वाटते.
पू. भाऊंची गुणवैशिष्ट्ये लिहिली, तर एक मोठा ग्रंथ होईल. असा ग्रंथ व्हावा, अशी आम्हा सर्व साधकांची प.पू. गुरुमाऊलीकडे (परात्पर गुरु डॉक्टरांकडे) प्रार्थना आहे. असे पू. भाऊ आम्हाला लाभले; म्हणून आम्ही डिचोलीतील सर्व साधक परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत ! जय गुरुदेव ! जय गुरुदेव !’
– (२९.७.२०२१)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजेमध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजेमंद आध्यात्मिक त्रास असणेहोय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |