राज्यातील १६६ लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी यांचे अद्याप निलंबन नाही

शिक्षण विभागात सर्वाधिक लाचखोर अधिकारी !

शिक्षण विभागात सर्वाधिक लाचखोर अधिकारी असणे, हे लज्जास्पद आहे ! घोटाळेबाजांना कठोर शिक्षा न दिल्यानेच त्यांचे फावते. त्यामुळे खासगी असो वा शासकीय क्षेत्र असो, भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शिक्षा होते, हा पायंडा पडला, तरच अशा प्रकारांना आळा बसू शकेल ! – संपादक 

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – राज्यातील १६६ लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी यांचे अद्याप निलंबन न झाल्याने अजूनही ते आपल्या पदावर कार्यरत आहेत. त्यामध्ये १५ वर्ग १ चे अधिकारी, १३ वर्ग २ चे अधिकारी, ८४ वर्ग ३ चे आणि ५ वर्ग ४ चे कर्मचारी तसेच ४९ इतर यांचा समावेश आहे. शिक्षण विभागात सर्वाधिक ४४ लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी निलंबित न झाल्याने अजूनही आपल्या पदावर कार्यरत आहेत. त्या खालोखाल ३१ जण ग्रामविकास खात्यातील, तर महसूल आणि नोंदणी विभागातील १६ जण आहेत.

शिक्षण विभागातील लाचखोरांवर कारवाईचे अधिकार असलेल्यांपैकी शिक्षण संचालकांकडे अधिकार असणारी सर्वाधिक प्रकरणे प्रलंबित असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालात दिसून येते. राज्यभरात आतापर्यंत ७२० सापळा रचून कारवाया झाल्या. त्यात महसूल विभाग आघाडीवर आहे. राज्यात १६८ कारवाया या महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर झाल्या आहेत. त्या खालोखाल पोलीस विभागात १६५ कारवाया झाल्या आहेत. सापळा रचलेल्या प्रकरणात ज्या आरोपींविरुद्ध कारवाई केली, त्यांपैकी अद्यापपर्यंत १६६ आरोपींचे निलंबन केलेले नाही.