राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : १५.१२.२०२१

प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

केंद्र सरकारने धर्मांतरविरोधी राष्ट्रीय कायदा आणावा ! – महामंडलेश्वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज, श्री अखंडानंद आदिवासी गुरुकुल आश्रम, इंदूर

श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज

सनातन धर्म हा महान धर्म आहे. त्याला जगात कोणताही पर्याय नाही. सनातन धर्मावर ख्रिस्ती मिशनरी आणि मुसलमान धर्मांतराच्या माध्यमातून आक्रमणे करत आहेत. आमची वैचारिकता, राष्ट्रीय आणि सांस्कृतिक चेतना नष्ट करण्यासाठी अन्य धर्मीय कार्यरत आहेत. आपली संस्कृती, वैज्ञानिक संपदा, भौतिक शक्ती आपल्या कह्यात घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत. फक्त धर्मांतरापुरता हा विषय मर्यादित नसून पूर्ण भारताला आपल्या अधीन करण्याचे हे षड्यंत्र आहे. आपले पूर्वज अत्यंत धर्मनिष्ठ होते. कितीही आक्रमणे झाली, तरी त्यांनी स्वतःचे धर्मांतर होऊ दिले नाही. हिंदूंनी याचा आदर्श घेऊन धर्मशिक्षण घेतले पाहिजे. या धर्मांतराच्या विरोधात राष्ट्रव्यापी आंदोलन उभे केले पाहिजे, तसेच भारताला सुरक्षित करण्यासाठी सरकारने धर्मांतराच्या विरोधात राष्ट्रीय कायदा आणावा आणि कुठल्याही प्रकारचे धर्मांतर अवैध ठरवले जावे.


कट्टरतावाद्यांना हिंदूंनी संघटितपणे विरोध करणे, हा आशेचा किरण ! – अनुपम मिश्रा, संपादक, ‘प्रयागराज टाइम्स’

 

अनुपम मिश्रा

हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी मुसलमान आणि ख्रिस्ती यांना देशात मोकळीक देण्यात आली आहे. भारतात असे कोणते राज्य आहे का, जिथे मदरशांना आर्थिक साहाय्य आणि इमामांना वेतन दिले जात नाही ? ‘जमात-ए-इस्लामी’सारख्या संघटना आपल्या संकेतस्थळावर ‘धर्मांतर करणे, हा आमच्या अस्तित्वाचा मुख्य उद्देश आहे’, असे घोषित करतात. विविध ठिकाणी सरकारकडून हिंदूंचे दमन होत असतांना धर्मांतर करणारे मिशनरी, तसेच सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करणारे कट्टरतावादी यांना हिंदू आता संघटीतपणे विरोध करत आहेत, हा एक आशेचा किरण आहे.


न्यायालयांनी सरकारवर अंकुश ठेवायचा असेल, तर सरकार हवेच कशाला ?

‘खासगी रुग्णालये पैसे कमावण्याची यंत्रे बनली आहेत. रुग्णालये ही ‘रिअल इस्टेट’ (जमीन खरेदी-विक्री व्यवसाय) उद्योग बनत आहेत. रुग्णांना संकटकाळात साहाय्य करण्याऐवजी पैसे कमावणे, हे रुग्णालयांचे ध्येय बनले आहे. लोकांचे प्राण संकटात टाकून रुग्णालयांची भरभराट होऊ देण्यास आम्ही अनुमती देऊ शकत नाही. त्याऐवजी रुग्णालये बंद केलेली बरी, अशा शब्दांत सर्वाेच्च न्यायालयाने खासगी रुग्णालयांना फटकारले.’


अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई उच्च न्यायालय

‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही एखादा गट किंवा समुदाय यांचा अवमान करून सार्वजनिक शांततेचा भंग करता कामा नये. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्काचा उपयोग राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवे, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने सामाजिक माध्यमांद्वारे आक्षेपार्ह संदेश प्रसारित करणार्‍यांविषयी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे.’