मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या ‘मिशनरीज् ऑफ चॅरिटी’ या संस्थेविरुद्ध धर्मांतराविषयी गुन्हा नोंद !

  • बालसुधारगृहातील मुलींच्या धर्मांतराचा प्रयत्न केला जात असल्याचा ठपका !

  • संस्थेने आरोप फेटाळले !

ख्रिस्ती मिशनरी आणि ख्रिस्ती संस्था यांच्यावर गेली अनेक दशके हिंदूंचे धर्मांतर करण्याचे आरोप झाले आहेत; मात्र आतापर्यंत याविषयी हिंदूंना न्याय मिळलेला नाही. मिशनर्‍यांना शिक्षाही झालेली नाही. गुजरातमध्ये भाजपचे सरकार असल्याने येथील हिंदूंना न्याय मिळेल, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक
(प्रतिकात्मक छायाचित्र)

वडोदरा (गुजरात) – मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या ‘मिशनरीज् ऑफ चॅरिटी’ या ख्रिस्ती संस्थेविरुद्ध धर्मांतराच्या आरोपावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या संस्थेकडून चालवण्यात येणार्‍या बालसुधारगृहातील मुलींना ख्रिस्ती बनवण्याचा प्रयत्न चालू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संस्थेने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. जिल्हा सामाजिक सुरक्षा अधिकारी मयंक त्रिवेदी यांच्या तक्रारीवरून मकरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

१. मयंक त्रिवेदी यांनी मकरपुरा भागातील ‘मिशनरीज् ऑफ चॅरिटी’ संचालित बालसुधारगृहाला नुकतीच भेट दिली होती. त्रिवेदी यांनी सांगितले की, या भेटीमध्ये मला बालसुधारगृहात आढळले की, तेथील मुलींना ख्रिस्ती धर्माकडे नेण्याच्या उद्देशाने ख्रिस्ती धार्मिक ग्रंथ वाचण्याची आणि ख्रिस्ती प्रार्थनांमध्ये भाग घेण्याची बळजोरी केली जात होती. ही संस्था १० फेब्रुवारी २०२१ ते ९ डिसेंबर २०२१ या कालावधीत हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून काम करत आली आहे. मुलींना त्यांच्या गळ्यात ‘क्रॉस’ बांधून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त केले जात आहे. मुली वापरत असलेल्या पटलावर बायबल ठेवून त्यांना बायबल वाचायला भाग पाडण्याचे प्रयत्नही करण्यात आले आहेत.

२. ‘मिशनरीज् ऑफ चॅरिटी’च्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही कोणत्याही धार्मिक परिवर्तनाच्या कार्यात सहभागी नाही. आमच्या बालसुधारगृहात २४ मुली आहेत. या मुली आमच्यासमवेत रहातात आणि त्या अभ्यास करतात. आम्ही कुणाचेही धर्मांतर केलेले नाही किंवा कुणाला ख्रिस्ती धर्मात विवाह करण्यास भाग पाडलेले नाही.