जनरल रावत यांच्या मृत्यूनंतरचे पडसाद !

संपादकीय

भारताच्या सैन्याधिकार्‍यांविषयी द्वेष पाजळणार्‍यांना कठोर शिक्षा व्हायला हवी !

(डावीकडे) दुर्घटनाग्रस्त ‘हेलिकॉप्टर’ (उजवीकडे)भारताचे सीडीएस् बिपिन रावत

८ डिसेंबर या दिवशी भारताचे सी.डी.एस्. (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) म्हणजेच तिन्ही सैन्यदलांचे प्रुमख जनरल बिपिन रावत ‘हेलिकॉप्टर’ दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेनंतर देशात सद्भावनेचे वातावरण असतांना काही जणांकडून सामाजिक माध्यमांतून द्वेषपूर्ण वक्तव्ये केली जात आहेत. निवृत्त लेफ्टनंट जनरल एच्.एस्. पनाग, निवृत्त कर्नल बलजीत बक्षी यांसारख्या माजी सैन्याधिकार्‍यांनी जनरल बिपिन रावत यांच्याविषयी ट्वीटद्वारे असंवेदनशील वक्तव्ये केली. तसेच ‘नॅशनल हेराल्ड’च्या संपादिका अश्लीन मॅथ्यू, मध्यप्रदेश काँग्रेस सेवादलाचे अतुल दुबे यांनीही त्यांच्या वक्तव्यांतून जनरल बिपिन रावत यांच्याविषयी असलेला द्वेष पाजळला आहे. यांतील काही जणांनी नंतर क्षमा मागितली असली, तरी अशी क्षमा म्हणजे टीका झाल्यानंतर पार पाडलेला निवळ सोपस्कार ठरतो. ‘हेलिकॉप्टर’ दुर्घटनेनंतर एक-दोन नव्हे, तर १०० हून अधिक धर्मांधांनी आनंद व्यक्त केला आहे. देशात ठिकठिकाणी उमटत असलेल्या द्वेषमूलक प्रतिक्रिया चिंताजनक असून भारताचे अंतर्गत हितशत्रू कोण कोण आहेत ? यावर प्रकाश टाकणार्‍या आहेत.

सैन्याची प्रतिमा अबाधित ठेवण्याचे आव्हान !

सैन्यातील अधिकारी म्हटले की, डोळ्यांसमोर कर्तव्यदक्ष, राष्ट्रभक्त व्यक्तीरेखा उभी रहाते. प्रसंगी स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता देशहिताला प्राधान्य देण्याची शिकवण सैन्यात भरती होण्यापूर्वी दिली जाते. भारताला अशा अनेक राष्ट्रभक्त सैनिकांची देणगी लाभली आहे; म्हणूनच सैनिक हे देशाचे मानबिंदू असून प्रत्येक भारतियाला त्यांचा अभिमान आहे. सैनिकांचा त्याग आणि सतर्कता यांमुळेच देशाच्या सीमा अन् पर्यायाने भारतीय जनता सुरक्षित आहे, अन्यथा चीन-पाकिस्तानसारखे कट्टर शत्रू भारतावर आक्रमणे करण्याची विविध प्रकारे संधी शोधत आहेत. गेल्या काही वर्षांत मात्र भारतीय सैन्यासंदर्भात होत असलेले आरोप या प्रतिमेला छेद देणार्‍या आहेत कि काय ?, अशी गंभीर स्थिती निर्माण होत आहे. हनी ट्रॅप (शत्रू राष्ट्राच्या महिलांनी सैनिकांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे), सैन्यातील भ्रष्टाचार, शत्रूराष्ट्राला माहिती पुरवणे यांसारख्या घटना या धक्कादायक आहेत. यात भर म्हणजे जनरल बिपिन रावत हुतात्मा झाल्यानंतर सैन्यातील माजी अधिकार्‍यांनी व्यक्त केलेल्या विरोधी प्रतिक्रिया या फुटीरतावादाचा धोका व्यक्त करणार्‍या आहेत. अशा विघातक वृत्तीच्या लोकांनी सैन्यात एकेकाळी अधिकारी पदे भूषवली, हे धक्कादायक आहे. सैन्यात देशविरोधी शक्तींचा शिरकाव होणे, हे सर्व देशभक्त नागरिकांची झोप उडवणारे आहे. एखाद्या व्यक्तीला कर्करोग झाला असता, त्यावर वेळीच औषधोपचार न केल्यास कर्करोगाच्या पेशी व्यक्तीच्या संपूर्ण शरिराला पोखरतात. हे उदाहरण भारतीय सैन्यासंदर्भात लागू होऊ नये, हीच देशप्रेमी नागरिकांची अपेक्षा आहे. शेतकरी कायदे रहित करण्यापूर्वी पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी ‘सैन्यामध्ये फूट पाडण्यासंदर्भात मोठा कट रचला जात आहे’, अशी माहिती केंद्र सरकारला दिल्याचे मत काही ज्येष्ठ पत्रकारांनी व्यक्त केले होते. जनरल रावत यांच्याविषयी द्वेषपूर्ण ट्वीट करणार्‍या माजी सैन्याधिकार्‍यांमुळे या भीतीची शक्यता दाट होते. यादृष्टीने विचार केल्यास ‘भारतीय सैन्यात सर्व देशभक्तच आहेत’, ही प्रतिमा अबाधित ठेवण्यासाठी सरकारला संवेदनशीलतेने आणि सतर्कतेने निर्णय घेणे आवश्यक आहे.

आतंकवादाला धर्म नसतो ?

जनरल बिपिन रावत यांचा मृत्यू झाल्यानंतर भारतातील धर्मांधांनी आनंद व्यक्त केला, ही ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणार्‍यांना सणसणीत चपराक आहे. जनरल बिपिन रावत यांच्या काळात पाकिस्तानातील आतंकवादी तळावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्यात आला होता. जनरल रावत यांच्या कार्यकाळात आतंकवाद्यांच्या विरोधात धडाडीने कारवाया करण्यात आल्या. त्यामुळे ‘जनरल रावत यांना बाधा पोचल्यास कुणाला आनंद होणार ?’ हे निराळे सांगायला नको. अशा आतंकवादधार्जिण्या धर्मांधांवर देशद्रोहाचे गुन्हे नोंद करून त्यांना तात्काळ शिक्षा द्यायला हवी. ‘अल्पसंख्यांकांना सुरक्षित वाटण्यासाठी त्यांना भारतीय सैन्यामध्ये राखीव जागा मिळाव्यात’, अशी मागणी काही जणांकडून केली जाते. ही शिफारस किती धोकादायक आहे, हे जनरल रावत हुतात्मा झाल्यानंतर आनंद व्यक्त करणार्‍या धर्मांधांनी दाखवून दिले आहे.

(डावीकडे) भारताचे सीडीएस् बिपिन रावत (उजवीकडे) तैवानचे सैन्यदलप्रमुख शेन यी मिंग

संशयाची सुई चीनकडे !

जनरल बिपिन रावत यांनी ज्या ‘हेलिकॉप्टर’ने प्रवास केला, ते अत्याधुनिक ‘हेलिकॉप्टर’ असून त्याला २ ‘इंजिने’ असल्याने त्याचा अपघात होण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे ‘हा घातपात आहे का ?’ असा प्रश्न देशभरातून उपस्थित होत आहे. निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी ‘हे चीनचे सायबर आक्रमण होते का ? हे पहायला हवे’, असे महत्त्वपूर्ण विधान केले आहे. संरक्षण विषयातील तज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी गेल्या वर्षी घडलेल्या तैवानचे सैन्यदलप्रमुख शेन यी-मिंग यांच्या ‘हेलिकॉप्टर’ दुर्घटनेची तुलना जनरल बिपिन रावत यांच्या ‘हेलिकॉप्टर’ दुर्घटनेशी केली आहे. ‘हे दोन्ही अपघात समान आहेत. प्रत्येक ‘हेलिकॉप्टर’ दुर्घटनेत चीनच्या विरोधात आक्रमक असलेल्या प्रत्येक प्रमुख सैन्याधिकाराचा मृत्यू होतो’, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. चीनने भारतात हेरगिरी करण्यासाठी त्याचे हस्तक पाठवणे, भारतावर सायबर आक्रमण करणे यांसाठी चीन गेल्या अनेक मासांपासून प्रयत्नरत आहे. भारत-चीन सीमेवर तणाव असून चीन भारताचा भाग गिळकृंत करण्यासाठी पावले उचलत आहे. ही पार्श्वभूमी तज्ञांची मते वस्तूस्थितीला मिळतीजुळती असण्याची शक्यता वर्तवते. सरकारने जनरल रावत यांच्या ‘हेलिकॉप्टर’ दुर्घटनेची चौकशी होणार, असे घोषित केलेच आहे; परंतु कोरोनाच्या वेळी चीनने स्वत:ची काळी कृत्ये समोर येऊ नयेत यासाठी धूर्तपणे पुरावे नष्ट केले, हे संपूर्ण जगाने अनुभवले. भारत सरकारने हे लक्षात घेऊन तात्काळ आणि धडाडीने पावले उचलायला हवीत, हीच देशभक्तांची एका सुरात मागणी आहे !