खडतर प्रारब्ध सोसतांना केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून साधना करत सनातनच्या सद्गुरुपदी विराजमान झालेल्या सद्गुरु (कै.) सौ. आशालता सखदेव !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमी (१०.१२.२०२१) या दिवशी सनातनच्या सद्गुरु (कै.) सौ. आशालता सखदेव यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने…

लहानपणापासूनच अतिशय सालस, सत्शील, निगर्वी व्यक्तीमत्त्व लाभलेल्या सद्गुरु (कै.) सौ. आशालता सखदेवआजी, म्हणजे सनातन संस्थेतील एक अप्रतिम हिरा ! आजींचे बालपण अतिशय समृद्ध होते. हा काळ आनंदाने व्यतीत केल्यानंतर विवाहानंतरचा काळ त्यांना अतिशय खडतर परिस्थितीला तोंड देत व्यतीत करावा लागला. देवावर दृढ श्रद्धा ठेवून त्यांनी ते दिवसही सोसले. ‘देव दयाळू असतो’, हेच खरे ! तो परीक्षा पहातो; पण तोच त्यात उत्तीर्णही करतो. तसेच झाले ! ही कठीण परीक्षा देत असतांनाच त्यांना देव भेटला ! त्यांचा सनातन संस्थेशी परिचय झाला आणि मुळात अंतर्मनातून होत असलेल्या त्यांच्या साधनेला देवभेटीचा एक राजमार्ग मिळाला. साधनेच्या राजमार्गावरून चालतांना त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी, संतपद अणि देहत्यागानंतर सद्गुरुपदही सहजतेने गाठले !

या लेखाद्वारे त्यांचा जीवनप्रवास पहात आहोत. त्यांची मुलगी कु. राजश्री सखदेव रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहेत. त्यांनी सद्गुरु (कै.) सौ. आशालता सखदेवआजी यांचा जीवनपट उलगडला आहे. ९ डिसेंबर २०२१ या दिवशी आपण सद्गुरु (कै.) सौ. सखदेवआजी यांचे साधनापूर्व जीवन आणि गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज पुढील भाग पाहूया.               

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/533825.html

(भाग ४)

सद्गुरु (कै.) सौ. आशालता सखदेव यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

५. मुलांवर केलेले संस्कार

कु. राजश्री सखदेव

५ अ. मुलांना लवकर उठण्यास शिकवणे : ‘मुलांनी सकाळी उशिरात उशिरा, म्हणजे सकाळी ६ वाजेपर्यंत उठले पाहिजे’, असे आईचे म्हणणे असे. आई-वडिलांमुळे आम्हीही सकाळी लवकर उठायला शिकलो. ‘रविवार किंवा सुटीचा वार म्हणून उशिरा उठणे’, हे आमच्या स्वभावातही नव्हते. हे केवळ आई-वडिलांमुळे शक्य झाले.

५ आ. मुलांना चांगल्या सवयी लावणे : आमच्या घरची श्रीमंती नव्हती; परंतु ‘घरात कोणतीच गोष्ट नाही’, असे होत नसे. त्या त्या वेळी प्रत्येक गोष्ट सहजतेने उपलब्ध होण्याचे कारण म्हणजे आई-वडिलांची आवश्यक तेथेच व्यय करण्याची वृत्ती ! ‘पानात वाढलेला पदार्थ खाऊन पहा. आवडला नाही, तर पुन्हा घेऊ नका’, असे ती आम्हाला सांगत असे, तसेच ती ‘प्रत्येक भाजीचे शरिराला काय उपयोग आहेत ?’, हेही सांगत असे. त्यामुळे आम्हाला प्रत्येक प्रकारची भाजी खाण्याची सवय लागली.

५ इ. मुलांचे अनावश्यक लाड न करता त्यांना मोठ्यांचे ऐकण्यास शिकवणे : ‘आम्ही सांगितले; म्हणून केले’, असे आमचे अवाजवी लाड कधीच झाले नाहीत. एखाद्या गोष्टीसाठी आम्ही हट्ट केला आणि तो योग्य नसेल, तर आई-वडील आमचा तो हट्ट पुरवत नसत. ‘तसे करणे योग्य कसे नाही ?’, हे सांगण्याची त्यांची पद्धतही चांगली असल्याने त्यांनी एकदा ‘नको’ म्हटले, तर आम्ही परत कधीच त्याविषयी हट्ट करत नव्हतो. ‘आई-वडील जे सांगतील, ते करणे योग्य आहे’, हे त्यांनी आमच्या मनावर बिंबवून त्यानुसार आमच्याकडून कृती करवून घेतली. त्यामुळे आमचे फालतू लाड कधीच झाले नाहीत आणि आम्हाला मोठ्यांचे ऐकण्याची सवय लागली.

५ ई. सात्त्विक पद्धतीने भाजी चिरण्यास शिकवणे : आई आम्हाला छोट्या छोट्या कामांत साहाय्य करायला शिकवत असे. मी ५ वीमध्ये जाऊ लागल्यावर आईने मला भाज्या चिरणे इत्यादी कामे करायला शिकवली. ‘भाजी कशी चिरायची ?’, हे ती मला सांगत असे. तेव्हा तिला स्पंदने इत्यादी काही ठाऊक नव्हते; पण ‘अमुक प्रकारे भाजी चिरावी. ती चांगली वाटते’, असे ती सांगत असे. साधनेत आल्यानंतर ‘सात्त्विक पद्धतीने भाजी चिरणे कसे असते ?’, हे मला समजले. आईने मला तशाच पद्धतीने भाजी चिरण्यास शिकवले होते.

५ उ. मुलांवर धार्मिकतेचे संस्कार करणे : तिने आम्हाला सण आणि उत्सव या दिवशी देवळात नेऊन अन् घरी कुलाचार करून आमच्यावर धार्मिकतेचे संस्कार केले. त्याच समवेत ती ‘आमचा अभ्यास आणि व्यायाम (खेळ) होतो ना ?’, याकडेही लक्ष देत असे.’

६. ‘क्ष’ नातेवाइकाच्या विक्षिप्त वागण्यामुळे आईला पुष्कळ त्रास होणे

६ अ. ‘क्ष’ नातेवाईक आईला काही ना काही कारणाने सतत रागावू लागणे, त्यामुळे घरातील वातावरण पालटणे आणि घरात घाणेरडा वास येणे : ‘वर्ष १९८६ पासून आमच्या आयुष्यातील एका वाईट कालखंडाला आरंभ झाला. मी महाविद्यालयातून घरी आल्यानंतर कधी कधी मला घरात घाणेरडा वास येत असे. घरात पुष्कळ स्वच्छता असल्याने ‘वास कुठून येतो ?’, हे मला कळत नसे. आईशी बोलल्यानंतर तिचे ‘क्ष’ नातेवाइकांशी भांडण झाल्याचे मला कळत असे. आरंभी ‘क्ष’ नातेवाईक आईला लहान लहान कारणावरून बोलत असत. ते ‘घरात व्यय करायला पैसे न देणे, इतर नातेवाइकांचा राग करणे, इतर नातेवाईक घरी आल्यानंतर त्यांच्याशी नीट न बोलणे, ते येऊन गेल्यानंतर आईवर रागवणे’, असे करायला लागले. याचे प्रमाण वाढल्यानंतर आईने त्यांना ‘तुम्ही असे का वागत आहात ?’, असे विचारल्यावरही ते आईशी भांडत असत. त्यांचे बोलणे सहन न झाल्यास आईही त्यांना बोलत असे. त्यामुळे घरातले एकूण वातावरण पालटले. घरी घाणेरडा वास आला की, ‘आज नक्कीच ‘क्ष’ नातेवाईक आईला काहीतरी बोलले आहेत’, हे माझ्या आणि भावाच्या लक्षात येऊ लागले.

६ आ. ‘क्ष’ नातेवाइकांचे विक्षिप्त वागणे’, हे त्यांना जीवनात आलेले अपयश आणि स्वभावदोष यांमुळे असावे’, असे वाटणे : ‘क्ष’ नातेवाइकांना वाईट शक्तींचा त्रास आहे’, हे आम्हाला ठाऊक नव्हते. ‘त्यांना जीवनात आलेले अपयश किंवा घरातील काही जणांचे त्यांच्याशी अयोग्य पद्धतीने वागणे’, यांचा परिणाम आणि त्यांचे स्वभावदोष’, यांमुळे ते असे वागत आहेत’, असे आम्हाला वाटत होते. आई, मी आणि भाऊ यांनी त्यांना अनेक प्रकारे समजावून सांगितले; पण त्यांच्यावर कशाचाच परिणाम झाला नाही. त्यांचे बोलणे चालूच राहिले. ते सतत तेच तेच बोलत असत. ‘त्यांचे असे वागणे’, हे त्यांना होणार्‍या आध्यात्मिक त्रासामुळे होते’, हे साधनेत आल्यावर माझ्या लक्षात आले.

६ इ. ‘क्ष’ नातेवाइकांच्या त्रासाला कंटाळून आईने जीव देण्यासाठी निघणे आणि ‘मुलांना कोण पहाणार ?’, असा आवाज ऐकू आल्यावर तिने परत येणे : अशातच एक दिवस ‘क्ष’ नातेवाइकांचे बोलणे सहन न होऊन आई घरातून जीव द्यायला नदीवर जाऊ लागली. तिकडे जात असतांना तिला कुणीतरी (सूक्ष्मातून) म्हणाले, ‘तू जाशील; पण मुलांचे काय ? त्यांना कोण पहाणार ?’ त्यासरशी ती मागे फिरली आणि घरी आली. आईने सायंकाळी हा प्रसंग मला सांगितला.

६ ई. घरात आणि बाजूच्या बागेत वटवाघळे अन् एका लाकडी पेटीत उंदराची अनेक लहान पिल्ले दिसणे : या सर्व कालावधीत आमच्या घरात आणि वाटिकेतील अशोकाच्या झाडांवर वटवाघळे दिसू लागली. कितीही हाकलले, तरी वाटवाघळे तेथेच बसून रहात. घरात २ मोठ्या लाकडी पेट्यांमध्ये काही सामान भरून ठेवले होते. त्यांत उंदराची अनेक लहान लहान पिल्ले आढळली. या पूर्वी घरात असे कधीच दिसले नव्हते. पेट्या उघडल्यावर किळसवाणे वाटत होते.

अशा परिस्थितीत केवळ देवानेच आम्हाला जिवंत ठेवले. त्याने आमच्या मनाचे संतुलन बिघडू दिले नाही. देवाची कृपा नसती, तर आमचे काय झाले असते ? ‘आपण आणखी काही करू शकत नाही’, हे लक्षात घेऊन ‘देव पाहील’, हा एकच विचार आमच्या मनात प्रबळ असायचा.

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/534377.html

– कु. राजश्री सखदेव (मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.७.२०२१)