मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमी (१०.१२.२०२१) या दिवशी सनातनच्या सद्गुरु (कै.) सौ. आशालता सखदेव यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने…
लहानपणापासूनच अतिशय सालस, सत्शील, निगर्वी व्यक्तीमत्त्व लाभलेल्या सद्गुरु (कै.) सौ. आशालता सखदेवआजी, म्हणजे सनातन संस्थेतील एक अप्रतिम हिरा ! आजींचे बालपण अतिशय समृद्ध होते. हा काळ आनंदाने व्यतीत केल्यानंतर विवाहानंतरचा काळ त्यांना अतिशय खडतर परिस्थितीला तोंड देत व्यतीत करावा लागला. देवावर दृढ श्रद्धा ठेवून त्यांनी ते दिवसही सोसले. ‘देव दयाळू असतो’, हेच खरे ! तो परीक्षा पहातो; पण तोच त्यात उत्तीर्णही करतो. तसेच झाले ! ही कठीण परीक्षा देत असतांनाच त्यांना देव भेटला ! त्यांचा सनातन संस्थेशी परिचय झाला आणि मुळात अंतर्मनातून होत असलेल्या त्यांच्या साधनेला देवभेटीचा एक राजमार्ग मिळाला. साधनेच्या राजमार्गावरून चालतांना त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी, संतपद अणि देहत्यागानंतर सद्गुरुपदही सहजतेने गाठले !
या लेखाद्वारे त्यांचा जीवनप्रवास पहात आहोत. त्यांची मुलगी कु. राजश्री सखदेव रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहेत. त्यांनी सद्गुरु (कै.) सौ. आशालता सखदेवआजी यांचा जीवनपट उलगडला आहे. ८ डिसेंबर २०२१ या दिवशी आपण सद्गुरु (कै.) सौ. सखदेवआजी यांचे साधनापूर्व जीवन आणि गुणवैशिष्ट्ये यांचा काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/533583.html
(भाग ३)
४. सद्गुरु (कै.) सौ. आशालता सखदेव यांचे साधनापूर्व जीवन आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये
४ ई. आई आणि फुले !
४ ई १. आईने वाटिकेतील फुलझाडांची प्रेमाने काळजी घेतल्याने त्यांना पुष्कळ फुले येणे : आमची वाटिका मोठी होती. ती नेहमी स्वच्छ असे. ‘तेथे पिकलेली पाने किंवा कचरा पडला आहे’, असे कधीच होत नसे. वाटिकेतील झाडांना नळीने पाणी घालण्यास न्यूनतम २ घंटे लागत. तेथे साधारणपणे १०० कुंड्यांतून झाडे लावलेली होती. आई प्रत्येक झाडाजवळ जाऊन त्याच्यावरून प्रेमाने हात फिरवून त्याची अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे काळजी घेत असे. त्यामुळे तिने लावलेल्या फुलझाडांना पुष्कळ फुले येत असत.
४ ई २. प्रतिदिन फुलांचे हार करून ते मंदिरात किंवा आश्रमात देणे : आमच्या वाटिकेतील मोगर्याच्या वेलीला उन्हाळ्यात पुष्कळ फुले येत असत, तसेच उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात जुईच्या वेलीलाही पुष्कळ फुले येत असत. आई जुईच्या फुलांचे हार आणि गजरे करत असे. मोठे हार करून ती ते वारानुसार संबंधित देवतेच्या मंदिरात नेऊन देण्यास वडिलांना सांगे. वाड्यातील प्रत्येकाच्या घरातही फुले देत असे. ती साधनेत आल्यानंतर आणि मिरज येथे सनातनचा आश्रम चालू झाल्यापासून ती सर्व हार मिरज आश्रमात देत असे.
४ ई ३. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि संत यांना अर्पण करण्यासाठी फुलांचे हार करण्याची सेवा मिळणे : आई फुलांचे विविध प्रकारचे हार करत असे. हारात वेगवेगळ्या प्रकारची फुले आणि पाने घालून ती तो हार अगदी सुंदर, आकर्षक आणि स्पंदनांच्या भाषेत बोलायचे, तर सात्त्विक पद्धतीने करत असे. तिच्या या तपश्चर्येचे फळ म्हणून परात्पर गुरु डॉक्टर जाहीर प्रवचनांच्या निमित्ताने सांगली जिल्ह्याच्या दौर्यावर असतांना तिला त्यांना अर्पण करण्यासाठी जुईच्या फुलांचे हार करण्याची सेवा मिळाली. प्रत्येक वर्षी गुरुपौर्णिमेला किंवा आश्रमात कुणी संत येणार असतील, तर त्यांना अर्पण करण्यासाठी आईला हार करण्याची सेवा मिळत असे.
४ ई ४. आईमुळे प्रत्येक दिवशी फुलांना बहर येणे आणि देवाच्या चरणी अर्पण होण्यासाठी पुष्कळ संख्येने फुले येत असल्याचे जाणवणे : ठराविक काळात फुलांना बहर येतो; पण आईमुळे आमच्याकडे प्रत्येक दिवशी प्रत्येक प्रकारच्या फुलांचा बहरच असे. त्यामुळे मला वाटते की, देवाच्या चरणी अर्पण होण्यासाठी पुष्कळ संख्येने फुले येत असत.
४ उ. कुसुमताई (आई) आणि सखदेववाडा !
४ उ १. आईमुळे वाड्यातील ८ ते १० कुटुंबांचे एक मोठे कुटुंब सिद्ध होणे : आमच्या वाड्यात ८ ते १० कुटुंबे रहात. प्रतिवर्षी वाड्यातील सर्व घरांतील स्त्रिया एकत्र येऊन सांडगे, पापड, कुरडया, शेवया, बटाट्याचा किस बनवणे इत्यादी उन्हाळी कामे एकत्रितपणे करत. त्या सर्वांना एकत्र ठेवणारा धागा म्हणजे आई ! सर्व जण आईला ‘कुसुमताई’ म्हणत असत. सर्वांनाच प्रत्येक गोष्ट करतांना ‘कुसुमताई हव्यात’, असे वाटे. प्रत्यक्षात आईचा स्वभाव बोलका नव्हता. ती कारणाविना इतरांच्या घरी जातही नसे; पण एकदा कुणाचा आईशी संपर्क झाला, तर ती व्यक्ती तिची होऊन जात असे. सर्वांना आई हवीहवीशी वाटत असे. ‘तुमच्या घरात आल्यावर चांगले वाटते’, असे अनेक जण तिला सांगत. ‘हे सर्व आईच्या साधनेचे फळ होते’, हे आता माझ्या लक्षात येत आहे.
४ उ २. आईने वाड्यात रहाणार्या कुटुंबांना जोडून ठेवल्याने त्यांच्याशी अजूनही घरच्यासारखे संबंध असणे : पूर्वी आमच्या वाड्यात रहात असणार्यांनी आता स्वतःचे घर बांधले आहे. त्यांतील अनेक कुटुंबांशी आमचे अजूनही घरच्यासारखे संबंध आहेत. आम्ही किंवा त्यांच्या घरातले निःसंकोचपणे एकमेकांच्या घरात जात-येत असू. याचे कारण म्हणजे आई ! तिनेच सर्वांना जोडून ठेवले होते.’ (क्रमशः)
– कु. राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.७.२०२१)
सखदेव वाड्यात रहाणार्या श्रीमती नीरा जोशी यांचे मनोगत !
सद्गुरु (कै.) सौ. आशालता सखदेव, म्हणजे एक शांत, संयमी, निगर्वी, स्नेहार्द आणि सत्शील व्यक्तीमत्त्व !
‘कुसुमताई म्हणजे मनात घर करून राहिलेले स्नेहार्द आणि सत्शील व्यक्तीमत्त्व होते. त्या शांत, विचारी, संयमी आणि श्रद्धाळू होत्या. आम्ही वर्ष १९७२ ते १९७८ या कालावधीत सखदेव वाड्यात रहात होतो. त्या वेळी कुसुमताईंशी जुळलेले नाते, भावबंध आणि आमचे एकसारखे विचार, यांमुळे त्या माझ्या विशेष स्मरणात राहिल्या. त्यांच्या घरात स्वच्छता आणि टापटीपपणा वाखाणण्यासारखा असे. स्वयंपाकाची पूर्वसिद्धता त्या फार छान करायच्या. त्यांच्याकडून मला पुष्कळ काही शिकायला मिळाले. ‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’, अशी त्यांची जीवनशैली होती. ‘प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचे प्रयत्न, सदा हसतमुख, अत्यंत निगर्वी, मनमोकळा स्वभाव, मिळूनमिसळून रहाण्याची वृत्ती आणि इतरांना वेळेत निरपेक्ष मनाने साहाय्य करणे’, या त्यांच्यातील गुणांमुळे त्या आम्हाला सदा आदरणीय आणि अनुकरणीय वाटत.’
– श्रीमती नीरा जोशी, मिरज, जिल्हा सांगली. (३०.७.२०२१)