(म्हणे) ‘शिवरायांच्या नावाने माथी भडकावण्याचा प्रयत्न केला जात आहे !’ 

पुरुषोत्तम खेडेकर यांचे हिंदुद्वेषी आणि अल्पसंख्यांकाच्या तुष्टीकरणासाठी केलेले वक्तव्य !

  • छत्रपती शिवरायांचा जयजयकार या भूमीत नाही, तर काय पाकिस्तानात करायचा का ? – संपादक 
  • छत्रपती शिवरायांच्या काळात मोगलांच्या भयानक छळा-बळाने जनता अत्यंत त्रस्त झाली होती. छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून हिंदूंचे रक्षण केले. त्यासाठी त्यांनी ५ पातशाह्यांना नामोहरम केले. म्हणूनच ‘शिवाजी न होते तो सुनति होती सबकी।’ (जर छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर सर्वांची सुंता झाली असती, म्हणजे सर्वांना मुसलमान धर्म स्वीकारणे भाग पडले असते) हे वचन प्रसिद्ध झाले ! ‘छत्रपतींनी मोगलांचा वध केला हे लपवावे’ असे खेडेकर यांना का वाटते ? – संपादक 
  • ‘छत्रपती शिवराय ‘धर्मनिरपेक्ष’ होते’, असा धादांत खोटा समज पसरवण्याचे फार मोठे षड्यंत्र चालू आहे. ज्या गोष्टी हिंदूंचे शौर्य जागृत करतात, त्याचे वैचारिक दमन करून त्या निरस्त करून टाकायच्या, असाच या षड्यंत्राचा उद्देश आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे कधीही धर्मनिरपेक्ष नव्हते, तर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी ते मोगलांशी लढले आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ! – संपादक 
पुस्तकाचे प्रकाशन करताना पुरुषोत्तम खेडेकर

सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आज जगाच्या कानाकोपर्‍यात पोचले आहे; मात्र त्यांच्या सामाजिक कार्याहून युद्धाचाच गवगवा अधिक झाला आहे. शालेय जीवनापासून केवळ ‘अफझलखान आणि शिवाजी महाराज’ अशीच शिकवण दिली गेली. शिवरायांच्या नावाने माथी भडकावण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे प्रत्येकाने सावध रहायला हवे, असे विद्वेषी वक्तव्य मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले. (खेडेकर स्वतःच अशा प्रकारची वक्तव्य करून विद्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ? – संपादक) 

माजी पोलीस उपअधीक्षक मुसा खान यांच्या ‘छत्रपती शिवरायांची धर्मनिरपेक्षता’ या पुस्तकाचे प्रकाशन खेडेकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. मराठा सेवा संघ आणि मुसा खान गौरव सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर काझी मुफ्ती सय्यद अमजदअली होते.

या वेळी शहर काझी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात त्यांचे अंगरक्षक, सल्लागार, असे ४० टक्के लोक मुसलमान होते. (हा धादांत खोटा समज मुसलमान आणि विद्रोही यांनी पसरवला आहे. हा समज खोटा आहे, हे सिद्ध करण्याकरता शिवचरित्रकार गजानन मेहंदळे यांनी संशोधनाअंती ‘अगदी शहाजी महाराजांपासून केवळ १२ मुसलमान छत्रपती शिवरायांकडे होते, त्यांतील बहुतेक केवळ फारसी भाषेत लिखाण करण्यासाठी होते’, हे स्पष्ट केले आहे. – संपादक) त्यांनी सर्व जाती आणि धर्म यांचा आदर केला. (हिंदु धर्म सर्वांचा आदर करायलाच शिकवतोच; परंतु पाच पातशाह्यांना अद्दल घडवून ‘जे हिंदूंचा आदर करत नाहीत, त्यांची काय स्थिती करायची ?’ याचा आदर्श छत्रपतींनी घालून दिला ! – संपादक) अशा छत्रपतींच्या नावाचा राजकीय, आर्थिक आणि स्वहितासाठी वापर करून त्यांचा खरा इतिहास लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. (खरा इतिहास सर्वश्रूत आहे; मात्र खेडेकरांसारखे काही जण इतिहासद्रोह करून समाजाची वरीलप्रकारे दिशाभूल करत आहेत, हेच सत्य आहे ! – संपादक) त्यांची धर्मनिरपेक्षता समाजासमोर आणणे आवश्यक आहे. (छत्रपती शिवराय हे हिंदुरक्षक आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणूनच ओळखले जातात अन् तीच त्यांची ओळख अखेरपर्यंत राहील ! – संपादक)