खडतर प्रारब्ध सोसतांना केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून साधना करत सनातनच्या सद्गुरुपदी विराजमान झालेल्या सद्गुरु (कै.) (सौ.) आशालता सखदेव !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमी (१०.१२.२०२१) या दिवशी सनातनच्या सद्गुरु (कै.) (सौ.) आशालता सखदेव यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने…

लहानपणापासूनच अतिशय सालस, सत्शील, निगर्वी व्यक्तीमत्त्व लाभलेल्या सद्गुरु (कै.) (सौ.) आशालता सखदेवआजी, म्हणजे सनातन संस्थेतील एक अप्रतिम हिरा ! आजींचे बालपण अतिशय समृद्ध होते. हा काळ आनंदाने व्यतीत केल्यानंतर विवाहानंतरचा काळ त्यांना अतिशय खडतर परिस्थितीला तोंड देत व्यतीत करावा लागला. देवावर दृढ श्रद्धा ठेवून त्यांनी ते दिवसही सोसले. ‘देव दयाळू असतो’, हेच खरे ! तो परीक्षा पहातो; पण तोच त्यात उत्तीर्णही करतो. तसेच झाले ! ही कठीण परीक्षा देत असतांनाच त्यांना देव भेटला ! त्यांचा सनातन संस्थेशी परिचय झाला आणि मुळात अंतर्मनातून होत असलेल्या त्यांच्या साधनेला देवभेटीचा एक राजमार्ग मिळाला. साधनेच्या राजमार्गावरून चालतांना त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी, संतपद अणि देहत्यागानंतर सद्गुरुपदही सहजतेने गाठले !

या लेखाद्वारे त्यांचा जीवनप्रवास पहात आहोत. त्यांची मुलगी कु. राजश्री सखदेव रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहेत. त्यांनी सद्गुरु (कै.) (सौ.) आशालता सखदेवआजी यांचा जीवनपट उलगडला आहे. ७ डिसेंबर २०२१ या दिवशी आपण सद्गुरु (कै.) (सौ.) सखदेवआजी यांचा जन्म, बालपण आणि वैवाहिक जीवन यांविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहूया.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/533310.html

(भाग २)

सद्गुरु (सौ.) आशालता सखदेव

४. सद्गुरु (कै.) (सौ.) आशालता सखदेव यांचे साधनापूर्व जीवन आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये

४ अ. सात्त्विक जीवनशैली

४ अ १. पहाटे उठणे : माझे आई-वडील पहाटे ५.१५ ते ५.३० च्या दरम्यान उठत असत आणि घरातील केर काढणे, सडा-रांगोळी करणे, बंब पेटवणे, देवपूजा करणे इत्यादी कामे करत असत.

४ अ २. घराची स्वच्छता आणि वस्तूंची हाताळणी चांगली असणे : आमचे घर नेहमी स्वच्छ असे. घरात कधीही एखादा कागदाचा कपटाही पडलेला दिसणार नाही, इतके ते चकचकीत असे. आई आणि वडील स्वच्छतेच्या विषयी एकदम सजग होते. घरातील स्वयंपाकासाठी वापरायची भांडी ४० ते ५० वर्षे वापरूनही एकदम नव्यासारखी होती.

४ अ ३. सात्त्विक पद्धतीने कपडे वाळत घालणे : आई अनेक वर्षे घरातील सर्वांचे कपडे स्वतःच धूत असे. कपडे धुतल्यानंतर ती ते विशिष्ट पद्धतीने वाळत घालत असे. सर्वांचे टॉवेल (अंग पुसायचे पंचे) रंगानुसार आणि लहान-मोठ्या आकारानुसार एकापाठोपाठ वाळत घातलेले असत. घरातील प्रत्येकाचे कपडे वाळत घालण्याची जागा ठरलेली असे. त्यामुळे दिवा लावलेला नसतांनाही प्रत्येक जण आपापले वाळलेले कपडे घेऊ शकत होता.

४ आ. नियोजन आणि काटकसर

कु. राजश्री सखदेव

४ आ १. आईने प्रत्येक मासाला लागणारी किराणा मालाची सूची नियोजनपूर्वक सिद्ध करणे : माझ्या मामाचे किराणा मालाचे दुकान होते. आई तिच्या विवाहानंतर तिच्या भावाच्या (माझ्या मामाच्या) दुकानातून किराणा माल घेत असे. ‘पुढच्या मासात काही सण आहे का ? उपवासाचे दिवस आहेत का ?’, हे पाहूनच आई सामानाची सूची देत असे. प्रत्येक वेळी सामान भिन्न असले, तरी त्याचे देयक साधारण सारखेच असे. आई अतिशय नियोजनपूर्वक सामानाची सूची देत असे. ‘सामान पोचवण्यास उशीर झाला; म्हणून साहित्य संपले आणि ते ऐन वेळी दुकानातून आणावे लागले’, असे कधीच झाले नाही.

४ आ २. आमच्या घरात वस्तू, अन्नधान्य आणि कपडे यांची टंचाई कधीच नव्हती; मात्र त्यांचा अनावश्यक वापरही नव्हता. ‘आवश्यक त्या सर्व गोष्टी त्या त्या वेळी कशा उपलब्ध करायच्या ?’, याचे तंत्र आईकडे होते.

४ आ ३. घरी असणारी पूजा किंवा इतर कार्यक्रम यांचे नियोजन करणे

अ. घरी पूजा असेल किंवा एखादा सण असेल किंवा बरेच जण जेवायला येणार असतील, तर सकाळचे खाणे आणि जेवणाचे पदार्थ यांचे संपूर्ण नियोजन अन् सिद्धता आदल्या दिवशी केलेली असायची. ‘ऐन वेळी धावपळ झाली आणि करावे लागले’, असे कधीच झाले नाही.

आ. घरी एखाद्या पूजेच्या वेळी किंवा गणपति, नवरात्र, दसरा, दिवाळी या सणांच्या वेळी आदल्या दिवशी पूजेची सर्व सिद्धता केलेली असे. सर्व उपकरणे (देवपूजेसाठी वापरण्यासाठी येणारी भांडी) घासून आणि पुसून व्यवस्थित ठेवलेली असत.

४ इ. निरपेक्ष प्रेम

४ इ १. मुलांच्या परीक्षेच्या निकालाच्या दिवशी त्यांच्यासाठी कौतुकाने गोड पदार्थ बनवणे : आम्ही शाळा किंवा महाविद्यालय यांत शिकत असतांना आमच्या परीक्षेचा निकाल लागला की, त्या दिवशी आमच्या घरी काही ना काही गोड केलेले असे. आईच्या दृष्टीने तो दिवस सणाप्रमाणे चांगला दिवस असे. ‘आपली मुले पुढच्या वर्गात गेली. त्यांना चांगले गुण मिळाले’, याचे कौतुक म्हणून ती गोड पदार्थ करत असे. ‘असे करणे, हे एक प्रकारे कृतीतून व्यक्त होणारे प्रेम आहे’, हे आता माझ्या लक्षात येते.

४ इ २. प्रतिदिन मुले शाळेतून आल्यावर त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवणे : आम्ही शाळेतून किंवा महाविद्यालयातून घरी आल्यावर हात-पाय धुऊन स्वयंपाकघरात असलेल्या पटलाजवळील आसंदीत जाऊन बसलो की, आई आमचे डोके आणि पाठ यांवरून प्रेमाने हात फिरवत असे. तिच्या त्या प्रेमळ स्पर्शाने आलेला सर्व क्षीण निघून जाऊन नव्या उत्साहाने आम्ही पुढील गोष्टी करत असू.

४ इ ३. आईचा एक भाचा (बहिणीचा मुलगा, श्री. रणजित दाते (वय ७१ वर्षे)) मुख्याध्यापक झाल्यावर तिने त्याला कौतुकाने सदरा शिवण्यासाठी कापड दिले.

४ इ ४. आईच्या निरपेक्ष प्रेमामुळे नातेवाइकांनी आवर्जून घरी येऊन आईला भेटून जाणे किंवा कधी घरी रहायला येणे : आमच्या नातेवाइकांना आमचे घर हक्काचे वाटे. मिरज-सांगली या भागात आमचे अनेक नातेवाईक आहेत. इतरत्र रहाणारे कुणीही नातेवाईक त्या भागात आले की, त्यांना ‘कधी एकदा आईला भेटून येतो ?’, असे होत असे. शक्यतो सर्व जण घरी रहायलाच येत; पण एखादा १ – २ दिवसांसाठी आला, तर तो आईला भेटून तरी जात असे.

४ इ ५. भावाला अटक झाल्यानंतर त्याला भेटायला जातांना त्याच्या समवेत अटक झालेल्यांसाठीही खाऊ करून नेणे : माझे मामा श्री. अरविंद मराठे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करत असत. वर्ष १९७७ मध्ये आणीबाणीचा काळ चालू होता. (जून १९७५ ते मार्च १९७७ या कालावधीत तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे सांगून देशव्यापी आणीबाणी घोषित केली होती. त्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली होती.) त्यानंतर काही मासांनी मामाला ‘मिसा’खाली (Maintenance of Internal Security Act (MISA) (‘अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिनियमा’खाली) अटक झाली. त्याला नाशिक येथील कारागृहात ठेवले होते. त्याला १५ दिवसांतून एक दिवस घरच्यांना भेटायची अनुमती होती. माझे आई-वडील, मामी आणि आजोबा हे सर्व जण नाशिक येथे गेले होते. त्यांना दोन दिवस मामाला भेटता आले. तेव्हा आईने १०० गुळाच्या पोळ्या करून नेल्या होत्या. मामाच्या समवेत अटक झालेल्या त्याच्या सर्व सहकार्‍यांसाठी तिने चिवडा आणि अन्य टिकणारे पदार्थही करून नेले होते. त्या वेळी मी आणि माझा भाऊ लहान होतो. आईने एकटीने हे सर्व केले होते.

– कु. राजश्री सखदेव (मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.७.२०२१)

(क्रमशः)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/533825.html