खडतर प्रारब्ध सोसूनी आणि पूर्ण श्रद्धा ठेवून साधना करत सनातनच्या सद्गुरुपदी विराजमान झालेल्या सद्गुरु (कै.) (सौ.) आशालता सखदेव !

खडतर प्रारब्ध सोसतांना केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून साधना करत सनातनच्या सद्गुरुपदी विराजमान झालेल्या सद्गुरु (कै.) (सौ.) आशालता सखदेव !

सद्गुरु (सौ.) आशालता सखदेव

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमी (१०.१२.२०२१) या दिवशी सनातनच्या सद्गुरु (कै.) (सौ.) आशालता सखदेव यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने…

लहानपणापासूनच अतिशय सालस, सत्शील, निगर्वी व्यक्तीमत्त्व लाभलेल्या सद्गुरु (कै.) (सौ.) आशालता सखदेवआजी, म्हणजे सनातन संस्थेतील एक अप्रतिम हिरा ! आजींचे बालपण अतिशय समृद्ध होते. हा काळ आनंदाने व्यतीत केल्यानंतर विवाहानंतरचा काळ त्यांना अतिशय खडतर परिस्थितीला तोंड देत व्यतीत करावा लागला. देवावर दृढ श्रद्धा ठेवून त्यांनी ते दिवसही सोसले. ‘देव दयाळू असतो’, हेच खरे ! तो परीक्षा पहातो; पण तोच त्यात उत्तीर्णही करतो. तसेच झाले ! ही कठीण परीक्षा देत असतांनाच त्यांना देव भेटला ! त्यांचा सनातन संस्थेशी परिचय झाला आणि मुळात अंतर्मनातून होत असलेल्या त्यांच्या साधनेला देवभेटीचा एक राजमार्ग मिळाला. देवानेही त्यांना त्या परिस्थितीतून अलगद बाहेर काढले आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आणले. त्यामुळे साधनेच्या राजमार्गावरून चालतांना त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी, संतपद अणि देहत्यागानंतर सद्गुरुपदही सहजतेने गाठले !

या लेखाद्वारे आज आपण त्यांचा जीवनप्रवास पहाणार आहोत. त्यांची मुलगी कु. राजश्री सखदेव रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहेत. त्यांनी सद्गुरु (कै.) (सौ.) आशालता सखदेवआजी यांचा जीवनपट उलगडला आहे. तो पुढे दिला आहे.   (भाग १)

कु. राजश्री सखदेव

१. जन्म 

‘मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमी (३.१२.१९३५) या दिवशी सांगली येथे आईचा (सद्गुरु आशालता सखदेव यांचा) जन्म झाला.

२. बालपण

आईचे विवाहापूर्वीचे नाव कु. कुसुम नारायण मराठे होते. आईच्या ६ भावंडांपैकी कुसुम (आई) हे तिच्या आई-वडिलांचे तिसरे अपत्य होते. आईला २ मोठ्या बहिणी (श्रीमती इंदुमती दाते (वय ९३ वर्षे) आणि (कै.) लीला कानिटकर)), २ लहान भाऊ (श्री. अरविंद मराठे (वय ८४ वर्षे) आणि श्री. अशोक मराठे (वय ८१ वर्षे)) आणि २ लहान बहिणी ((कै.) सुशीला हेर्लेकर आणि श्रीमती वैशाली वेलणकर (वय ७६ वर्षे)) होत्या. आईचे वडील ((कै.) नारायण नागेश मराठे), दोन काका ((कै.) महादेव नागेश मराठे आणि कै. बाळकृष्ण नागेश मराठे) आणि त्यांचे कुटुंबीय अन् अन्य नातेवाईक, असे एकूण २५ जण त्यांच्या सांगलीच्या घरी एकत्र रहात होते. घरची एकूण ७६ एकर शेती असल्याने गायी, म्हशी आणि वासरे, अशी एकूण २० ते २५ जनावरे होती. आईचे वडील शेती करत असत आणि तिचे दोन काका किराणा मालाचे दुकान चालवत असत. त्यांचा सांगलीतील राममंदिराजवळ ७ सहस्र ५०० चौरस फूट जागेत ४ मजली वाडा होता. त्यात काही कुटुंबे भाड्याने रहायला होती, तर खेड्यातून शिक्षणासाठी सांगलीत आलेल्या गरीब विद्यार्थ्यांसाठी अनेक खोल्या विनामूल्य दिल्या होत्या.

२ अ. उपळावी (तालुका तासगाव, जिल्हा सांगली) येथील शेतातील घरी काही मास वास्तव्य करणे आणि शिक्षण घेणे : सांगलीपासून साधारण १५ कि.मी. अंतरावर असलेल्या उपळावी (तालुका तासगाव) येथे आजोबांची (आईच्या वडिलांची) शेती होती. आई ७ वर्षांची असतांना तिच्या आजीच्या ((कै.) रमा नारायण मराठे यांच्या) समवेत काही दिवस तेथे शिक्षणासाठी राहिली होती. त्या वेळी आजोबांनी तिला शेतातील विहिरीत पोहायला शिकवले. शेतातील गडीमाणसांना लहानग्या कुसुमचे पुष्कळ कौतुक होते. ‘हरिबा’ नावाचा गडी तर तिला खांद्यावरून शाळेत पोचवायचा. गाईचे दूध, शेतातील ताज्या भाज्या आणि फळे, सकस धान्य अन् उत्तम हवा-पाणी यांमुळे आईचे आरोग्य उत्तम होते.

२ आ. प्रतिदिन ‘राष्ट्रसेविका समिती’त जाणे : नंतर आई सांगली येथे रहाण्यास आली. शाळा सुटल्यानंतर ती प्रतिदिन ‘राष्ट्रसेविका समिती’त (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला शाखेत) जात असे. त्या काळात तिच्या अनेक मैत्रिणी होत्या. आई त्यांतील २ – ३ मैत्रिणींच्या संपर्कात शेवटपर्यंत होती.

२ इ. गांधीवधानंतर झालेल्या जळितात रहाते घर, शेत आणि दुकाने जळणे अन् २ वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण होणे : वर्ष १९४८ मध्ये मोहनदास करमचंद गांधी यांच्या वधानंतर जळीत (टीप) झाले. त्यात आईच्या वडिलांचा सांगलीतील वाडा, दुकाने आणि ३ ठिकाणी असलेली शेती, तेथील घरे अन् शेतांतील उभी पिके यांना आग लावण्यात आली. सांगलीतील वाडा ८ दिवस जळत होता. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले ! घरातील सर्वांच्याच अंगावरचे वस्त्र सोडून बाकी सर्व जळाले. डब्यांमध्ये भरून ठेवलेले धान्य (तांदुळ, डाळी इत्यादी) ८० ते ९० टक्के करपून गेले. घरातील २५ जणांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न असल्याने करपलेल्या धान्यातील थोडे करपलेले आणि न करपलेले धान्य निवडून ते शिजवून दोन घास खाणे चालू होते. तेव्हा पोट भरण्याइतके अन्न मिळत नव्हते. (‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंत ७४ वर्षांत हिंदूंनी धर्माधांविषयी अशी कृती एकदाही केली नाही.’ – संकलक)

टीप – नथुराम गोडसे या ब्राह्मण व्यक्तीने गांधींची हत्या केल्याने ब्राह्मणद्वेष्ट्यांनी सर्वच ब्राह्मणांची घरी पेटवली होती. त्याला ‘जळीत’, असे म्हणतात.

२ ई. अन्याय सहन न करणे : त्यानंतर आजोबा आणि त्यांचे दोघे भाऊ, अशी तिघांची कुटुंबे वेगळी राहू लागली, म्हणजे केवळ स्वयंपाकासाठी वेगळ्या चुली होत्या. बाकी सगळे एकत्रच रहात. आईचे वडील उपळावीला रहात आणि प्रत्येक ८ ते १५ दिवसांनी सांगलीत येत. त्या वेळी आईचे काका आई आणि तिची भावंडे यांना पैसे, वस्तू, साहित्य इत्यादी आवश्यक तेवढे देत नसत. त्या वेळी आईच पुढे होऊन सर्व मागून घेई. स्वतःचे चुकत नसतांना अन्याय होत असेल, तर तिला ते सहन होत नसे.

२ उ. आजी रुग्णाईत असतांना तिची सेवा करणे आणि लहान भावंडांचे सर्व प्रेमाने करणे : त्यानंतर आजी (आईची आई (कै.) गंगा नारायण मराठे) रुग्णाईत झाली. आईच्या मोठ्या बहिणींचे विवाह झाले होते. स्वयंपाकादी घरातील कामे आणि आजीची सेवा करण्यासाठी आईची शाळा बंद झाली. त्या काळात आईने तिच्या ४ लहान भावंडांचे सर्व अगदी प्रेमाने केले.

२ ऊ. मोत्यासारखे अक्षर आणि नेटकेपणा यांमुळे आईने लिहिलेल्या वह्यांमध्ये चैतन्य जाणवणे : आईने शिवणाचा पदविका अभ्यासक्रम (‘डिप्लोमा’) पूर्ण केला. तिने तिच्या शिवणवर्गातील वह्या जपून ठेवल्या आहेत. ‘मोत्याप्रमाणे असलेले हस्ताक्षर, आखीव-रेखीव आकृत्या आणि एकूणच नेटकेपणा’, यांमुळे त्या वह्यांमध्ये पुष्कळ चैतन्य जाणवते. तिच्या अन्य वह्यांमध्येही चैतन्य जाणवते.

२ ए. भावंडे आणि मोठ्या बहिणीची मुले यांची स्वतःच्या मुलांप्रमाणे काळजी घेणे : आईने सर्वच भावंडांची पुष्कळ काळजी घेतली आणि त्यांचे सर्व प्रेमाने केले. तिच्या अंगी कमालीचा सोशिकपणा होता. तिच्या मोठ्या बहिणीच्या मुलांचीही तिने स्वतःच्या मुलांप्रमाणे काळजी घेतली.

३. वैवाहिक जीवन

३ अ. विवाह आणि अपत्ये : १६.५.१९६३ या दिवशी आईचा विवाह श्री. शशिकांत सखदेव यांच्याशी झाला. वर्ष १९६४ मध्ये आईला मुलगा झाला; परंतु जन्मानंतर ४ दिवसांतच आचके येऊन त्याचा मृत्यू झाला. वर्ष १९६५ मध्ये मुलगी चि. राजश्री (मी) आणि वर्ष १९६७ मध्ये मुलगा चि. गुरुदत्त यांचा जन्म झाला.

३ आ. ‘मुलांवर संस्कार व्हावेत’, यासाठी आईने घरात कुलाचार चालू करणे : वेगळे रहायला लागल्यानंतर आईने सर्व सण-वार, गणपति बसवणे, नवरात्र बसवणे इत्यादी कुलाचार करणे चालू केले. ‘आपण वेगळे रहातो, तर देवाचे सर्व केले पाहिजे. त्याविना मुलांवर संस्कार कसे होणार ? देवाचे करण्यात भावांमध्ये वाटणी कशी करायची ?’, असे तिला वाटत होते.

३ इ. मुलगा चि. गुरुदत्त लहान असतांना बर्‍याचदा रुग्णाईत असायचा. त्याला सतत ताप-खोकला असायचा. त्यामुळे आईला बर्‍याचदा रात्री जागरण करावे लागायचे.

३ ई. आईला क्षयरोग होणे आणि आधुनिक वैद्यांनी तिला ६ मास पूर्ण विश्रांती घेण्यास सांगणे : वर्ष १९८० मध्ये आईला क्षयरोग झाला. त्या काळी क्षय झाला की, रुग्णालयात भरती व्हावे लागायचे. त्या वेळी आमच्या घरात मी आणि भाऊ लहान असल्याने आईला रुग्णालयात ठेवून तिचे पहाणे आणि घरात मुलांची काळजी घेणे वडिलांना शक्य नव्हते. त्यांनी आधुनिक वैद्यांना आईला घरात ठेवून तिथेच तिची काळजी घेण्याविषयी विचारले. आधुनिक वैद्यांनी ‘आईला वेगळ्या खोलीत ठेवा आणि तेथे कुणीच जायला नको’, असे सांगितले. त्यांनी आईला ६ मास पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले. आईची सर्व काळजी वडीलच घ्यायचे.’

– कु. राजश्री सखदेव (मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.७.२०२१)


या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/533583.html