मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिरातील संतापजनक प्रकार !
|
मुंबई – श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी देण्यात येणार्या ‘क्यू.आर्. कोड’चा काळाबाजार करणार्यांवर दादर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी १३ भ्रमणभाष कह्यात घेतले आहेत; मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही.
दर्शनासाठी मंदिरात गर्दी होऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाने ‘ॲप’ची निर्मिती केली आहे. त्याद्वारे नोंदणी केल्यावर भाविकांना ‘क्यू.आर्. कोड’सह दर्शनाची वेळ दिली जाते. कोड दाखवूनच दर्शनासाठी प्रवेश मिळतो. अनेक भाविकांना हे ठाऊक नसल्याने ते नोंदणी न करताच मंदिरात येतात; परंतु येथे आल्यावर ‘क्यू.आर्. कोड’च्या अभावी मंदिरात प्रवेश मिळत नाही; म्हणून काही लोकांनी मंदिरात प्रवेश मिळवून देणारा ‘क्यू.आर्. कोड’ विकायला प्रारंभ केला. नोंदणी नसलेल्या भाविकांना १ सहस्र रुपयांपर्यंत हा ‘क्यू.आर्.’ कोड विकला जात होता. याविषयी प्रशासनाकडे तक्रार आल्यावर त्यांनी दादर पोलिसांकडे तक्रार केली होती.
(‘क्यू.आर्. कोड’ अर्थात् ‘क्विक रिस्पॉन्स कोड’ म्हणजे बारकोड प्रमाणे असलेली एक प्रकारची सांकेतिक भाषा) |