पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने पूरग्रस्त महिलांना वाटप केलेल्या २६ लाख ३२ सहस्र रुपयांच्या साड्यांच्या नोंदीच नाहीत !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! – संपादक

कोल्हापूर – वर्ष २०१९ मध्ये आलेल्या महापुरामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने पूरग्रस्त महिलांना साड्यांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी समितीने श्री महालक्ष्मी मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या ५ सहस्र साड्या घेतल्या. २६ लाख ३२ सहस्र रुपयांच्या या साड्या कुणी नेल्या ?, कोणत्या दिनांकाला नेल्या ?, किती पूरग्रस्त महिलांना त्यांचे वाटप केले ?, त्यांची नावे आणि पत्ते काय ? यांपैकी कशाचीही नोंद देवस्थानकडे नाही. दैनिक ‘लोकमत’ने माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती मागितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. (यापूर्वीही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अनेक घोटाळे उघड झाले असून त्यविषयीचे राज्य गुन्हे अन्वेषणाकडील चौकशीचे घोंगडे अद्यापही भिजत पडलेले आहे. प्रत्येक वेळी व्यवस्थापन समिती पालटल्यावरही घोटाळ्यांचे आरोप होतच आहेत ! मंदिराचे सरकारीकरण झाल्याचे हे दुष्परिणाम असून आणखी किती काळ भाविकांनी अशा प्रकारे देवनिधीची लूट त्यांच्या डोळ्यांसमोर पहायची ? – संपादक)

१. जिल्ह्यातील पूरग्रस्त महिलांना वाटप करण्यात आलेल्या साड्यांच्या लाभार्थी महिलांची सूची, पत्ते, दूरभाष क्रमांक, साडी मिळाल्याची स्वाक्षरी किंवा अंगठा यांपैकी कोणतीही माहिती देवस्थान व्यवस्थापन समितीकडे नाही.

२. श्री महालक्ष्मी मंदिरात अर्पण आलेल्या साड्यांचे हिशोब ठेवण्याचे दायित्व तेथील व्यवस्थापकांचे आहे; मात्र या नोदींमध्ये केवळ साड्या आल्याचा दिनांक, पावती क्रमांक आणि मूल्य एवढ्याच नोंदी आहेत. त्यापुढे विचारलेल्या माहितीत ‘केवळ ५ सहस्र साड्या वाटप करण्यात आल्या’ एवढीच नोंद असल्याचे समोर आले.

३. श्री महालक्ष्मी मंदिरातून पूरग्रस्तांसाठी दिलेल्या साड्यांच्या सूचीत अनेक साड्यांचे मूल्य हे १ सहस्र ते ११ सहस्र रुपयांपर्पंत होते, तसेच काही साड्या ५०० ते ९५० रुपये एवढ्या किमतीच्या होत्या. त्यामुळे ‘या मौल्यवान साड्या पूरग्रस्तांना वाटण्यात आल्या’, असेच यातून सिद्ध होते. ही एकप्रकारे देवीला भाविकांनी अर्पण केलेल्या साड्यांची लूट नाही ना ? अशी शंका भाविकांकडून उपस्थित होत आहे. भाविकांनी देवीला अर्पण केलेल्या साडीच्या ६० टक्के रक्कम भरून ती कुणालाही खरेदी करता येते.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या शिवाजी पेठेतील भाड्याच्या कार्यालयाच्या नूतनीकरणावर ७४ लाख रुपयांची उधळपट्टी !

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या स्थापनेनंतर समितीने वर्ष १९७१ मध्ये शिवाजी पेठेतील बलभीम बँकेच्या तळमजल्यात भाड्याने कार्यालय चालू केले. येथे भाडे नाममात्र आहे. या कालावधीत दोन-तीन वेळा या कार्यालयाची दुरुस्ती बँकेनेच करून दिली. वर्ष २०११ मध्ये समितीने महालक्ष्मी बँकेची श्री महालक्ष्मी मंदिराजवळील ताराबाई रस्त्यावरील साडेतीन सहस्र चौरस फुटांची भूमी खरेदी केली. अशा प्रकारे समितीची स्वमालकीची भूमी असतांनाही वर्ष २०१९ मध्ये कार्यालयाच्या नूतनीकरणाचा ठराव संमत करण्यात आला. भाड्याची जागा असूनही यासाठी ७४ लाख रुपये व्यय करण्यात आले. देवस्थानच्या प्रत्येक कामासाठी न्याय आणि विधी खात्याकडून अनुमती घ्यावी लागते; मात्र या नूतनीकरणासाठी खात्याकडून अनुमती घेण्यात आलेली नाही. नूतनीकरणाच्या व्ययातून नवीन इमारत उभी राहू शकली असती, याचाही विचार केलेला नाही.

नूतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयात अत्यंत अपुरी जागा असून देवस्थानमधील कामासाठी येणार्‍या लोकांना बसण्यासाठी साधे बाकही नाहीत, तसेच लहान जागेतच बैठक कक्ष, अध्यक्ष, सचिव, लेखापाल, अभियंता यांना बसण्यासाठी कक्ष केले आहेत. यातून हे नूतनीकरण करून नेमके काय साध्य केले ? असा प्रश्नही भाविकांकडून उपस्थित होत आहे.