राज्यसेवा आयोगाच्या पात्र उमेदवारांची नियुक्ती रखडल्याचे प्रकरण
पात्र उमेदवारांना अशी मागणी करावी लागणे, हे संतापजनक आहे. उमेदवारांच्या सहनशीलतेचा अंत न बघता रखडलेल्या नियुक्त्या लवकरात लवकर कराव्यात. – संपादक
पुणे – वर्ष २०१९ च्या राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये पात्र ठरलेल्या ४१६ उमेदवारांची तात्काळ नियुक्ती करावी अन्यथा त्यांना सामूहिक आत्महत्या करण्यास अनुमती द्यावी, अशी मागणी पात्र उमेदवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवून केली आहे. कागदपत्रांची पूर्तता आणि वैद्यकीय तपासणी होऊन १ मास उलटून गेला तरी नियुक्तीचे आदेश देण्यास सामान्य प्रशासन विभाग टाळाटाळ करत आहे. पात्र उमेदवारांच्या प्रश्नाकडे कुणीही लक्ष देत नाही. ग्रामीण भागातील पात्र उमेदवारांना मानसिक, आर्थिक आणि सामाजिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून तात्काळ नियुक्ती द्यावी अन्यथा सामूहिक आत्महत्या करण्याची सूचना निर्गमित करावी, अशी मागणी पात्र उमेदवारांनी केली आहे.