पैशांची उधळपट्टी करणारे लोकप्रतिनिधी नकोत !

नाशिक येथे ३ डिसेंबरपासून चालू होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह ५ आमदार एकूण ५५ लाख रुपये देणार आहेत. त्यांनी तसे संमतीपत्र दिले आहे. हा पैसा नियोजन समितीच्या निधीतून संमेलनासाठी देण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त महापालिकेकडून २५ लाख रुपयांचा निधीही संमेलनासाठी देण्यात येणार आहे. १५ दिवसांपूर्वी नगरमध्ये शासकीय रुग्णालयात आग लागून ११ लोकांचा होरपळून मृत्यू झाला होता. असे असूनही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी या दुःखद घटनेचे जराही भान न ठेवता ‘दिवाळी स्नेहमीलन’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये प्रसिद्ध नर्तकी (डान्सर) सपना चौधरी यांच्या नाच-गाण्याचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठीही लाखो रुपयांचा व्यय झाला.

महाराष्ट्रात महापूर आणि चक्रीवादळ यांमुळे शेतकरी अन् सर्वसामान्य यांची पुष्कळ हानी झाली. ओला आणि सुका दुष्काळ यांमुळे शेतकर्‍यांच्या पिकांची हानी झाल्यामुळे शेतकरी साहाय्यासाठी आक्रोश करत आहेत. महाराष्ट्रावर ऑक्टोबर २०२० अखेर ५ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे, म्हणजेच महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकावर ४४ सहस्र ७३४ रुपयांचे कर्ज आहे. कोरोनाच्या काळात सर्वत्रची आर्थिक परिस्थिती कोलमडली. एस्.टी. कर्मचार्‍यांना वेळेत वेतन न मिळाल्याने, तसेच काही कर्मचार्‍यांना वेतनच न मिळाल्याने अनेकांनी आत्महत्या केली आहे. कोरोनाच्या काळात अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत.

अशी भयानक स्थिती असतांना महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी साहित्य संमेलन आणि सपना चौधरीसारख्यांच्या कार्यक्रम यांवर लाखो रुपये व्यय करून जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत आहेत, हे अशोभनीय आहे. आमदार निधी असो वा जिल्हा नियोजन समितीचा पैसा हा जनतेचाच आहे. त्यामुळे हा पैसा जनता आणि शेतकरी यांच्या विकासासाठीच वापरला पाहिजे, याचा विचार लोकप्रतिनिधींनी न करणे, हे संतापजनक आहे. महापूर आणि चक्रीवादळ यांमुळे महाराष्ट्रात आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली. अशी स्थिती असतांना लोकप्रतिनिधींनी असे संमेलन आणि कार्यक्रम घेणे म्हणजे ‘रोम जळत असतांना निरो फिडेल वाजवत होता’ याप्रमाणे त्यांचे वागणे होत आहे. त्यामुळे ‘लोकप्रतिनिधींनी सावध राहून जनतेच्या विकासकामांवर लक्ष केंद्रित करावे’, अशी आपत्तीग्रस्त जनतेची अपेक्षा आहे.

– श्री. सचिन कौलकर, मुंबई