एन्.सी.ई.आर्.टी.ने शालेय पाठ्यपुस्तकांतून राष्ट्रीय पुरुषांच्या चारित्र्याचे मोठ्या प्रमाणात विकृतीकरण केले ! – संसदीय स्थायी समितीचा अहवाल

  • वेद आणि प्राचीन ग्रंथ यांमधील ज्ञान शिकवण्याची शिफारस !

  • पाठ्यपुस्तकात विक्रमादित्य, चोल, चालुक्य, विजयनगर, गोंडवाना आदी साम्राज्यांना स्थान दिले नाही !

  • राष्ट्रीय पुरुषांच्या चारित्र्याचे मोठ्या प्रमाणात विकृतीकरण करणार्‍या एन्.सी.ई.आर्.टी.मधील संबंधितांवर काय कारवाई करणार ? – संपादक
  • विविध माध्यमांद्वारे एन्.सी.ई.आर्.टी.ने केलेले शिक्षणाचे विकृतीकरण वारंवार पुढे आले असतांनाही ती विसर्जित का केली गेली नाही ? – संपादक

नवी देहली – शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये विविध राज्ये आणि जिल्हे येथे राष्ट्रीय इतिहासावर ज्यांनी प्रभाव टाकला आहे, तसेच समाजात एकता राखण्यासाठी प्रयत्न केला आहे, अशा अज्ञात लोकांच्या जीवनावर प्रकाश टाकला गेला पाहिजे, असे संसदीय स्थायी समितीने तिच्या अहवालात म्हटले आहे. यासह राष्ट्रीय अभ्यासक्रम सिद्ध करतांना मिळालेल्या सूचनांचा विचार एन्.सी.ई.आर्.टी.ने (राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने) केला पाहिजे, असेही समितीने म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे एन्.सी.ई.आर्.टी.ने शालेय पाठ्युपुस्तकांतून राष्ट्रीय पुरुषांच्या चारित्र्याचे मोठ्या प्रमाणात विकृतीकरण केल्याचे संसदीय स्थायी समितीने म्हटले आहे.

१. शिक्षण, महिला, मुले, युवक आणि क्रीडा या विषयांच्या संसदीय स्थायी समितीने ‘शालेय पाठ्यपुस्तकांच्या सामग्री आणि रचनेमधील सुधारणा’ या अहवालात वेद अन् इतर महान ग्रंथ यांमधील प्राचीन ज्ञान, तसेच जीवन आणि समाज यांच्याविषयीच्या शिकवणींचा पाठ्यपुस्तकांत समावेश करण्याची शिफरस केली.

२. ३२ सदस्यीय समितीच्या अहवालात म्हटले आहे की, चुकीची ऐतिहासिक तथ्ये आणि राष्ट्रीय नायक यांच्याविषयीच्या विकृतींचे संदर्भ काढून टाकणे, भारतीय इतिहासाच्या सर्व कालखंडातील समान संदर्भ सुनिश्‍चित करणे, गार्गी, मैत्रेयी किंवा राज्यकर्त्यांसह महान ऐतिहासिक महिलांची भूमिका अधोरेखित करणे, यांवर समितीने लक्ष केंद्रित केले आहे.

३. समितीला असे आढळून आले की, शालेय पाठ्यपुस्तके विक्रमादित्य, चोल, चालुक्य, विजयनगर, गोंडवाना किंवा त्रावणकोर आणि ईशान्येकडील ‘अहोम’ यांसारख्या महान भारतीय साम्राज्यांना आवश्यक तितके महत्त्व देण्यात आलेले नाही.