साधकांना सत्संगात विविध दृष्टीकोनांच्या माध्यमातून अनमोल मार्गदर्शन करणार्‍या पू. (सौ.) अश्विनी पवार !

सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा काल कार्तिक कृष्ण पक्ष एकादशी (३० नोव्हेंबर २०२१) या दिवशी वाढदिवस झाला. त्यानिमित्त खालील लिखाण प्रसिद्ध करत आहोत.

पू. (सौ.) अश्विनी पवार

पू. (सौ.) अश्विनी पवार घेत असलेल्या काही सत्संगांना बसण्याची संधी मला गुरुकृपेने मिळाली. मला त्या अनमोल सत्संगांत शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.

१. स्वभावदोष आणि अहं यांच्या संदर्भात दिलेले दृष्टीकोन

१ अ. अहंयुक्त कृतीने साधना होत नसून अहं विरहित कृतीने साधना होते ! :  ‘एक साधक त्याच्या सेवेचा आढावा दायित्व असणार्‍या साधकाला वेळेत पाठवत नव्हता. त्या साधकाकडून सहसाधकांशी अधिकारवाणीने बोलणे, ‘इतरांचे मन दुखावले जाईल’, असे बोलणे व्हायचे. ते साधक कार्यालयात उच्च पदावर कार्यरत होते. पू. (सौ.) अश्विनीताईंनी सत्संगात त्या साधकांना त्यांच्या नोकरीतील अनुभवाचा अहं असल्याची जाणीव करून दिली. पू. (सौ.) अश्विनीताईंनी त्यांना सांगितले, ‘‘तुमच्याकडे कौशल्य आहे. त्याचा तुम्ही लाभ करून घ्यायला पाहिजे. कौशल्याला अहंची लागण असेल, तर ते गुरुचरणी अर्पण होऊ शकत नाही. तुमच्याभोवती अहंचा कोश असल्याने तुमचा साधनेचा प्रवाह योग्य दिशेने होत नाही. अहंमुळे तुमच्यातील क्षमतेचा वापर होत नाही आणि क्षमता खुंटते. स्वतःभोवती अहंची कडा असल्याने तुम्हाला देवाचे साहाय्य कसे मिळणार ? अहंयुक्त कृतीने साधना होत नाही, तर अहं विरहित कृतीने साधना होते. समोरच्या साधकाचे मनापासून ऐकून घ्यायला हवे. ‘तो साधक काय सांगतो ?’, ते समजून घ्यायला हवे. तुमच्यातील अहंचे प्रकटीकरण होत असल्याने तुम्हाला नम्रतेने बोलता येत नाही आणि त्याची खंतही वाटत नाही. खंत वाटण्यासाठी तुम्ही देवाला शंभर वेळा प्रार्थना करा. खंत परिवर्तनाची निर्मिती करते.’’

१ आ. ५ मिनिटे राग आल्यास ५ मिनिटांची प्राणशक्ती व्यय होऊन त्याचा मनावरही परिणाम होतो ! : एका साधकाने सांगितले, ‘‘इतरांकडून अपेक्षा करत असल्याने प्रतिक्रिया व्यक्त होतात.’’ त्यावर पू. (सौ.) अश्विनीताई म्हणाल्या, ‘‘५ मिनिटे राग आला, तर ५ मिनिटांची प्राणशक्ती व्यय होते. त्याचा मनावरही परिणाम होतो.

१ इ. ‘सकारात्मक विचार’ हे मनाचे शक्तिवर्धक (टॉनिक) आहे !  : नकारात्मकता नुसती मनात नाही, तर ती प्रकट झाल्याने त्याचा त्रास होतो. त्यामुळे त्रस्तता येते. आपल्याला नकारात्मक बोलल्याचे भान रहात नाही. आपल्या मनावर नकारात्मक संस्कार दृढ होत जाऊन ते तीव्र होतात आणि आपल्या साधनेचा वेळ वाया जातो. आपल्या मनावर ‘एखादा स्वभावदोष दृढ होत आहे’, ही जाणीव रहात नाही आणि ही जाणीव नष्ट व्हायला लागली की, आपले अधःपतन होऊन वेगाने घसरण होते. ‘सकारात्मक विचार’ हे मनाचे शक्तिवर्धक (टॉनिक) आहे.’’

२. साधकांकडून होणार्‍या चुकांसंदर्भात सांगितलेले दृष्टीकोन

२ अ. तळमळ वाढल्यावर ध्यास लागून देवाचे विचार ग्रहण होतात ! : पू. (सौ.) अश्विनीताईंनी एका साधिकेला विचारले, ‘‘तुम्हाला तुमच्या चुकांविषयी काय लक्षात आले ?’’ तेव्हा त्या साधिकेने सांगितले, ‘‘प्रयत्न न्यून आहेत आणि तळमळ अन् सातत्य नाही.’’ त्यावर पू. (सौ.) अश्विनीताई म्हणाल्या, ‘‘अधिकाधिक प्रार्थना केल्यावर तळमळ वाढते. ‘सातत्य अल्प असणे’, हा घटक तळमळीवर परिणाम करतो. तळमळ अल्प पडल्यास निरुत्साह येतो. शिकण्याची वृत्ती नसते. तळमळ वाढल्यावर ध्यास लागतो. ध्यास लागला की, देवाचे विचार ग्रहण होतात.’’

२ आ. ‘स्वीकारले आणि सोडून दिले’, यातून साधना होत नाही : पू. (सौ.) अश्विनीताईंनी एका साधकाला ‘चुका स्वीकारत नाही. कारणे दिली जातात. तेव्हा मनाची प्रक्रिया काय होते ? ‘मनातील विचार योग्य आहे’, असे वाटते ? कि साधक सांगतात, ते योग्य आहे ?’, असे विचारल्यावर ‘स्वीकारले जाते’, असे त्या साधकाने सांगितले. पू. (सौ.) अश्विनीताईंनी ‘स्वीकारणे अंतर्मनापासून होत नाही’, याची त्या साधकाला जाणीव करून देत सांगितले, ‘‘स्वीकारले आणि सोडून दिले, यातून साधना होत नाही.’’

२ इ. साधकाने ‘चूक झाली’, असे म्हटल्यास त्याच्या अंतरंगात पालट होतो ! : पू. (सौ.) अश्विनीताईंनी एका साधकाला सांगितले, ‘‘दुसरा कसा चुकतो ?’, याकडे तुमचे लक्ष अधिक असते. दुसरा कितीही चुकला, तरी ‘आपण कुठे चुकतो ?’, ते पहायचे. ‘माझी चूक झाली’, असे म्हणायला चालू केल्यास हळूहळू अंतरंगात पालट होण्यास प्रारंभ होतो. टंगळमंगळ असल्याने गुरुसेवेत मन लागत नाही.

२ ई. आपल्याला दुसर्‍याचे स्वभावदोष लक्षात येत असतील तेव्हा आपले स्वतःच्या मनाकडे लक्ष हवे. आपण दुसर्‍यांच्या चुकांविषयी सहजतेने सांगतो; पण स्वतःची चूक सांगतांना आपल्याला खंत वाटायला हवी.’’

३. ध्येयाने प्रेरित होऊन ध्यासाने साधना करायला हवी !

एका साधकाला ‘स्वतःचे प्रयत्न चांगले चालू आहेत’, असे वाटत होते. प्रत्यक्षात तो ‘स्वतःचे चांगले चालू आहे’, या भ्रमात असल्याची जाणीव पू. (सौ.) अश्विनीताईंनी त्यांना करून दिली. पू. (सौ.) ताईंनी त्यांना सांगितले, ‘‘तुमचे मन तुम्हाला फसवत आहे. तुम्ही अंतर्मनापासून प्रयत्न करा. तुम्ही अन्य साधकांकडून शिकण्यासाठी संवेदनशीलता वाढवा. काळ वेगाने पुढे जात आहे आणि तुमची साधना संथ गतीने चालली आहे. तुम्हाला सेवेचा ध्यास लागायला हवा. नुसते वरवरचे करणे नको, तर तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांची प्रचीती समष्टीला आली पाहिजे.

४. तळमळीचे महत्त्व 

आपण गुरूंच्या दरबारात आहोत. गुरुसेवेने प्रारब्ध नष्ट होते. गुरुसेवेचे चैतन्य मिळण्यासाठी आपण धडपडायला पाहिजे. गुरुसेवेची तळमळ असल्यास देहभान हरपून गुरुसेवा करता येते. आपण वेळेचा सदुपयोग करायला हवा. आपली आतली प्रेरणा जागृत व्हायला पाहिजे. गुरुसेवेत खंड पडायला नको. आपण सतत सेवारत राहिले पाहिजे. आपल्याकडून प्रत्येक सेवा आत्मियतेने व्हायला हवी.’’

५. परात्पर गुरु डॉक्टर आपल्याला गुरुरूपात मिळाले आहेत. अनेक जन्म साधना केल्यावर गुरुप्राप्ती होते.

६. अन्य सूत्रे

अ. समष्टी जे सांगते, ते ऐकायला हवे. समष्टीचे निरीक्षण असते ना ! प्रथम इतरांचे १०० टक्के ऐकायला प्रारंभ करायला हवा.

आ. आपले विचार आणि कृती दुसर्‍यात पालट होण्यासाठी साहाय्यभूत ठरली पाहिजे.

इ. तुम्ही स्थिर राहिलात, तर प्रसंग हाताळू शकता. आवश्यकता वाटते, तिथे उत्तरदायी साधकांना विचारून घ्या. प्रायश्चित्त मनोभावे पूर्ण केल्यास पापक्षालन होते.

७. आश्रमाप्रतीचा भाव 

आपल्या आश्रमावर मंदिरावर असतो, तसा कळस आहे. पवित्र स्पंदने असलेल्या या मंदिरात प्रत्यक्ष भगवंत (परात्पर गुरु डॉक्टर) राहून गेला आहे. तुम्ही कोट्यवधी रुपये दिले, तरी असे कुठेही मिळणार नाही. ‘तुमची साधना व्हावी’, यासाठी तुम्हाला इथे रहायला मिळत आहे. गुरूंची प्रीती तुम्हाला लाभली आहे.

‘परात्पर गुरु डॉक्टर, आपल्याच अपार कृपेमुळे मला पू. (सौ.) अश्विनीताई घेत असलेल्या सत्संगाला बसण्याची संधी मिळाली’, याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘आपण माझ्याकडून सातत्याने साधनेचे प्रयत्न करवून घ्या’, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने आणि आर्ततेने प्रार्थना करते.’

– श्रीमती मनीषा अरविंद गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (४.१२.२०२०)