पुणे येथे मिळकतकराची थकबाकी न भरल्याने इंग्रजी शाळेला टाळे ठोकले !

भरमसाठ शुल्कवाढ करणे, थकबाकी न भरणे असा मनमानी कारभार करणार्‍या शाळा त्वरित बंद करायला हव्यात. स्वतःच्या आर्थिक तुंबड्या भरण्यासाठी संस्थाचालकांनी शाळा काढण्याचे पेव फुटले आहे, त्यास काही प्रमाणात आळा बसेल. – संपादक 

पुणे – थकलेला मिळकतकर भरण्यासाठी शाळेला २ वेळा सूचना देऊनही थकबाकी भरण्यास टाळाटाळ केल्याने महापालिकेने या शाळेला टाळे ठोकले. वानवडी येथील इंग्रजी माध्यमाची ही खासगी शाळा असून शाळेने अनेक वर्षांपासून मिळकतकर भरलेला नाही. त्याची थकबाकी वाढत गेल्याने महापालिका प्रशासनाने ही कृती केली. शाळा प्रशासनाने यापूर्वी दिलेला धनादेश खात्यात पुरेसे पैसे नसल्याने ‘बाउंस’ झाला होता. महापालिकेची कारवाई होताच संस्थेच्या अधिवक्त्यांनी ३८ लाख ३९ सहस्र ७४८ रुपयांचा धनादेश महापालिकेला दिला. संस्थेने दिलेला धनादेश पुन्हा ‘बाउंस’ झाल्यास शाळेला पुन्हा टाळे ठोकले जाईल; तसेच इतरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.