नाशिक पोलिसांवर राजकीय दबाव असून विधिमंडळात आवाज उठवणार ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

नाशिक, २८ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘येथील भाजपचे मंडल अध्यक्ष अमोल इघे यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव आहे. अमोल इघे प्रकरण आणि शहरातील वाढती गुन्हेगारी यांविषयी विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवण्यात येईल’, अशी चेतावणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी २८ नोव्हेंबर या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. त्यांनी मृत अमोल इघे यांच्या घरी भेट देत त्यांच्या कुटुंबियांचे सात्वन केले.

अमोल इघे यांची २६ नोव्हेंबर या दिवशी पहाटे ६ वाजता निर्घृण हत्या झाली. त्यांना घराबाहेर बोलावून त्यांच्यावर शस्त्राने वार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विनोद उपाख्य विनायक बर्वे याला अटक केली आहे. ‘राजकीय युनियनच्या वादातून ही हत्या झाली आहे’, असा पोलिसांचा संशय आहे. संशयित आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगार वंचित आघाडीचा पदाधिकारी असल्याचे सांगितले जात आहे. त्याने १ मासापूर्वी येथील पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

आरोपीवर मोक्का लावण्याची मागणी !

प्रवीण दरेकर पुढे म्हणाले की, या प्रकरणात उत्तरदायी कोण आहे, ते आम्ही उघड करणार आहोत. युनियनची नोंदणी नसतांना कुणी फलक लावले ? आरोपीवर मोक्का लावून हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा. याप्रकरणी आरोपीला वाचवण्याचा कुणी प्रयत्न करत असेल, तर त्याला आम्ही सोडणार नाही.