हिंदु संघटनांच्या विरोधानंतर हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनावर फारुकी याचा बेंगळुरू येथील कार्यक्रम रहित !

  • हिंदू संघटित झाल्यावर हिंदुद्वेष्ट्यांना माघार घ्यावी लागते, हे पहाता आता हिंदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी तात्काळ संघटित व्हावे ! – संपादक
  • उठसूट कुणीही फुटकळ कलाकार उठतो आणि हिंदु धर्मावर चिखलफेक करतो. त्यामुळे अशांचा हिंदु धर्माचा अवमान करण्याचे धाडस होणार नाही, असा वचक हिंदूंनी देशभरात निर्माण केला पाहिजे ! – संपादक
हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनावर फारुकी

बेंगळुरू (कर्नाटक) – येथील ‘गुड शेफर्ड’ सभागृहात आयोजित करण्यात आलेला हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनावर फारुकी याचा नियोजित कार्यक्रम रहित करण्यात आल्याची माहिती सभागृहाच्या व्यवस्थापनाने दिली. मुनावर फारुक हा एकपात्री कार्यक्रम करतो. अशोकनगर पोलीस ठाण्याने कार्यक्रमाच्या आयोजकांना दिलेल्या पत्रानुसार, या कार्यक्रमामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल, मुनावर फारुकी याचा हिंदूंच्या भावना दुखावल्याचा इतिहास आहे. मध्यप्रदेशात त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या तो जामिनावर आहे. यापूर्वी लोकभावनेमुळे गुजरात आणि मुंबईतील त्याच्या कार्यक्रमाची अनुमतीही अधिकार्‍यांनी मागे घेतली होती.

मुनावर फारुकी यााचा ‘डोंगरी टू नोव्हेअर’ हा कार्यक्रम २८ नोव्हेंबर २०२१ या दिवशी गुड शेफर्ड सभागृहात आयोजित करण्यात आला होता. हिंदूंच्या देवतांचा सतत अपमान करणार्‍या मुनवर फारुकी याची पार्श्‍वभूमी लक्षात घेऊन हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते श्री मोहन गौडा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २८ नोव्हेंबर या दिवशी  बेंगळुरूच्या पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन या कार्यक्रमाला विरोध करून निषेध नोंदवला. कार्यक्रमासाठी अनुमती दिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचीही चेतावणी समितीने दिली होती.

सरकारने ‘ईशनिंदा कायदा’ आणावा ! – श्री. मोहन गौडा, हिंदु जनजागृती समिती

श्री. मोहन गौडा, हिंदु जनजागृती समिती

या प्रसंगी श्री. मोहन गौडा म्हणाले, ‘‘बेंगळुरू पोलिसांनी मुनवर फारूकी याचा कार्यक्रम रहित केल्यामुळे आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. हिंदुद्वेषी मुनवर फारूकी याच्यावर कायमस्वरूपी बंदी यायला हवी. या निमित्ताने सरकारकडे ‘ईशनिंदा कायद्या’ची आम्ही मागणी करतो. जिथे जिथे मुनवर फारूकी याचा कार्यक्रम आयोजित केला जाईल, तिथे तिथे आम्ही हिंदू संघटित होऊन त्याविरोधात आंदोलन करू.’’