संगीत अभ्यासक श्री. प्रदीप चिटणीस यांनी थकवा दूर होण्यासाठी गायलेल्या तीन रागांच्या उपयुक्ततेसंबंधी लक्षात आलेली सूत्रे

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे संगीत अभ्यासक श्री. प्रदीप चिटणीस यांनी थकवा दूर होण्यासाठी गायलेल्या तीन रागांच्या उपयुक्ततेसंबंधी लक्षात आलेली सूत्रे

ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग

‘श्री. प्रदीप चिटणीस यांनी थकवा दूर होण्यासाठी भारतीय शास्त्रीय संगीतातील ललत, यमन आणि बहार हे ३ राग गायले. यांतील प्रत्येक रागाचा थकव्यावर परिणाम होतोच; पण हे तिन्ही राग येथे दिलेल्या क्रमाने ऐकल्याने त्यांचा एकत्रित परिणाम आणखी चांगला होतो. हे राग थकवा दूर करण्यासाठी सूक्ष्मातून कसे कार्य करतात, यासंबंधी लक्षात आलेली सूत्रे येथे देत आहे.


या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/530458.html


सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

१. राग ललत

अ. ललत राग आरंभ होण्यापूर्वी माझी सूर्यनाडी कार्यरत होती. राग आरंभ झाल्यावर माझी चंद्रनाडी हळू हळू कार्यरत होऊ लागली आणि ५ मिनिटांनी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

आ. मला श्वासामध्ये थंडावा जाणवू लागला.

इ. अनाहतचक्र जागृत झाल्याचे जाणवले. तेथे थंड स्पंदने जाणवू लागली.

ई. ललत रागाची स्पंदने चैतन्याच्या स्तरावर कार्यरत होती.

उ. ललत रागाची स्पंदने अनाहतचक्रातून खाली मणिपूरचक्रापर्यंत जातांना जाणवली.

ऊ. काही वेळाने स्वाधिष्ठान आणि मूलाधार या चक्रांवरही ललत रागाची स्पंदने जाणवू लागली.

ए. शरिराला चैतन्य देऊन थकवा दूर करण्यासह ललत राग मन निर्विचार करणाराही असल्याचे जाणवले.

ऐ. अनाहतचक्राच्या खालील चक्रांवर परिणाम झाल्यावर ललत रागाची स्पंदने सहस्रारचक्रावरही जाणवू लागली. अशा रितीने ललत रागाचा परिणाम आज्ञाचक्र सोडून इतर सर्व कुंडलिनीचक्रांवर झाला.

श्री. प्रदीप चिटणीस

२. राग यमन

अ. यमन राग आरंभ होण्यापूर्वी माझी चंद्रनाडी कार्यरत होती.

आ. यमन रागगायन आरंभ झाल्याझाल्याच मला छातीत थंडावा जाणवू लागला. हा थंडावा प्रवाही होता. तो शरिरात पसरत होता. या प्रवाही थंडाव्यामुळे मनाला उत्साह वाटला. निद्रानाश दूर करणार्‍या रागांमुळेही चक्रांमध्ये थंडावा जाणवतो; पण तो एकाच ठिकाणी जाणवतो. तो प्रवाही नसतो. तो शांती देणारा असतो. याचा अर्थ प्रवाही थंडाव्यामुळे मनाला उत्साह येतो, तर एकाच ठिकाणी जाणवणार्‍या थंडाव्यामुळे मनाला शांती मिळते.

इ. माझी सुषुम्ना नाडी कार्यरत होऊ लागली. यमन राग आरंभ झाल्यानंतर ९ मिनिटांनी सुषुम्ना नाडी पूर्णपणे कार्यरत झाली.

ई. मला डोक्यावरही थंडावा जाणवू लागला.

उ. माझ्या अनाहतचक्रातून हातांमध्ये रागाची स्पंदने (शक्ती) प्रवाहित होऊ लागली.

ऊ. त्यानंतर मला माझ्या शरिराच्या मागच्या बाजूला डोक्यामध्ये आणि पाठीमध्ये स्पंदने जाणवू लागली. तीही वरून खाली प्रवाहित होत होती.

ए. मला माझ्या मणिपूरचक्रामध्ये स्पंदने जाणवू लागली. तेथून ती दोन्ही पायांमध्ये जात होती.

ऐ. आता मला माझ्या देहाच्या पुढच्या भागातून कपाळापासून खाली स्पंदने प्रवाहित होत असल्याचे जाणवू लागले.

ओ. अशा रितीने यमन रागाने संपूर्ण देहावर परिणाम करून शक्ती आणि चैतन्य दिले. त्यामुळे देह हलका झाल्याचे जाणवू लागले.

औ. यमन राग आरंभ होण्यापूर्वी माझ्या नाडीचे ठोके ५८ होते. रागगायन संपल्यावर ते ६४ झाले. नाडीचे ठोके वाढल्यावरून देहाला शक्ती मिळाल्याचे लक्षात आले.

३. राग बहार

अ. बहार राग आरंभ होण्यापूर्वी माझी सूर्यनाडी कार्यरत होती. राग आरंभ झाल्यावर लगेचच, म्हणजे २ मिनिटांतच माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

आ. मला अनाहतचक्रावर थंडगार स्पंदने जाणवू लागली आणि ती प्रवाहित होऊन खालील मणिपूरचक्राकडे
जाऊ लागली.

इ. बहार राग आरंभ झाल्यापासून ८ मिनिटांतच रागामुळे जाणवणारी थंडगार स्पंदने मणिपूरचक्राच्या खाली स्वाधिष्ठान आणि मूलाधार या चक्रांमध्येही जाणवू लागली.

ई. रागगायन झाल्यावर मला उत्साही वाटत होते.

उ. बहार राग आरंभ होण्यापूर्वी माझ्या नाडीचे ठोके ७२ होते. राग संपल्यावर ते ६२ झाले होते. या रागाने मुख्यत्वे थंडावा प्रवाहित केल्यामुळे आणि हे कार्य वायुतत्त्वाच्या स्तरावर असल्याने नाडीचे ठोके न्यून झाले. या तुलनेत राग यमन चैतन्याच्या, म्हणजे तेजतत्त्वाच्या स्तरावर कार्य करत असल्याने त्या वेळी नाडीचे ठोके वाढून ते ५८ चे ६४ झाले होते.

४. ललत, यमन आणि बहार या रागांच्या परिणामांचा सारांश

हे तिन्ही राग मुख्यत्वे अनाहतचक्रावर परिणाम करणारे आहेत. अनाहतचक्र हे शरिराचे ऊर्जाकेंद्र आहे.

४ अ. राग ललत : हा राग आज्ञाचक्र सोडून इतर सर्व चक्रांवर परिणाम करणारा आहे. आज्ञाचक्रावर परिणाम होत नाही; कारण ते चक्र बुद्धीशी संबंधित असल्याने थकवा दूर करण्यामध्ये त्या चक्राचा सहभाग असत नाही. ललत राग कुंडलिनीचक्रांना चैतन्य पुरवून थकवा दूर करण्याचे कार्य करतो. राग यमन केवळ अनाहत आणि मणिपूर या चक्रांवर परिणाम करतो. या दोन चक्रांवर न्यास केला की, सर्व शरिराला स्पंदने पोचतात. त्याप्रमाणेच या रागाच्या वेळीही जाणवले. या दोन चक्रांमुळे हाता-पायांना
शक्ती मिळाली.

४ आ. राग यमन : हा राग शरिराच्या मागील आणि पुढील अशा सर्व बाजूंनी शरिराला शक्ती देतो’, असे जाणवले. या रागाने चैतन्याच्या स्तरावरही कार्य केले. त्यामुळे देह हलका झाला.

४ इ. बहार राग : हा राग अनाहत ते मूलाधार या चक्रांना थंडावा देतो, तसेच तो मनाला उत्साह देतो.

४ ई. राग ललत, यमन आणि बहार : हे राग क्रमाने कुंडलिनीचक्रांना चैतन्य, शरिराला चैतन्य आणि शेवटी उत्साह देतात. हे तिन्ही राग सुषुम्ना नाडी कार्यरत करतात. ती नाडी चैतन्यदायी आहे. त्यामुळे थकवा दूर होतो.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२५.९.२०१८)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक