प.पू. भक्तराज महाराज यांची छायाचित्रे काढण्याची सेवा करत असतांना मुंबई येथील साधक श्री. अरविंद परळकर यांना आलेल्या अनुभूती आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !
उद्या २८ नोव्हेंबर या दिवशी असणार्या सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या महानिर्वाण उत्सवाच्या निमित्ताने …
सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. प.पू. भक्तराज महाराजांची झालेली प्रथम भेट !
१ अ. प.पू. भक्तराज महाराज यांचे आगमन झाल्यावर भक्तांची गर्दी असल्यामुळे पुढे जाऊन त्यांचे दर्शन घेण्याचे धैर्य न होणे : वर्ष १९८९ च्या डिसेंबर मासात प.पू. डॉक्टर (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांचा अभ्यासवर्ग संपल्यानंतर ते मला म्हणाले, ‘‘उद्या संध्याकाळी घरी ये. तुला प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन होईल.’’ हे ऐकून मला अत्यानंद झाला. दुसर्या दिवशी मी शीव येथे गेलो. प.पू. भक्तराज महाराज यांचे (प.पू. बाबांचे) आगमन झाल्यावर बराच वेळ त्यांच्याभोवती भक्तांची पुष्कळ गर्दी होती. त्या गर्दीत पुढे जाऊन त्यांचे दर्शन घ्यायचे मला धाडस झाले नाही.
१ आ. प.पू. डॉक्टरांच्या अनुपस्थितीत साधकाने अभ्यासवर्ग घेऊन अध्यात्मप्रसाराचे कार्य चालू ठेवल्याचे प.पू. डॉ. आठवले यांनी प.पू. भक्तराज महाराज यांना सांगितल्यावर त्यांनी मोरटक्क्याला असलेल्या भंडार्यासाठी त्याला येण्यास सांगणे : थोड्या वेळाने प.पू. डॉक्टर दवाखान्यातून आले. त्यांनी मला पाहिले आणि मला प.पू. बाबांसमोर घेऊन गेले. प.पू. डॉक्टर प.पू. बाबांना म्हणाले, ‘‘हा अरविंद परळकर. मी तुम्हाला याच्याविषयी सांगितले आहे. तुम्ही मला कांदळीला बोलावून घेतले असता माझ्या अनुपस्थितीत याने अभ्यासवर्ग घेतला आणि तुमचे अध्यात्मप्रसाराचे कार्य चालू ठेवले. याला आता ‘आपला’ म्हणा.’’ प.पू. बाबा म्हणाले, ‘‘डॉक्टर, तुम्ही ज्याला ‘तुमचा’ म्हटले, तो यापुढे माझाही झाला.’’ प.पू. बाबांनी मला नंतर लगेच मोरटक्क्याला होणार्या भंडार्यासाठी येण्यास सांगितले.
२. प.पू. भक्तराज महाराज यांची छायाचित्रे काढण्याची सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे
२ अ. संतांच्या आशीर्वादाविना त्यांचे छायाचित्र काढू शकत नसल्याचे लक्षात येणे
२ अ १. प.पू. डॉक्टरांनी प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रासादिक भजनांच्या भावार्थासहित भजनांचे नवीन पुस्तक गुरुपौर्णिमेला प्रकाशित करण्याचे ठरवणे : वर्ष १९९० मध्ये प.पू. बाबांच्या प्रासादिक भजनांच्या पुस्तकांच्या प्रती संपत आल्या होत्या; म्हणून प.पू. डॉक्टरांनी भजनांच्या भावार्थासहित प.पू. बाबांच्या भजनांचे नवीन पुस्तक छापून ते गुरुपौर्णिमेला प्रकाशित करण्याचे ठरवले. प.पू. बाबांनी पुस्तकाची छपाई वडाळा येथील ‘सुदर्शन प्रिंटींग प्रेस’मधून करून घेण्यास सांगितले. त्या प्रेसचे मालक श्री. बागवे हे प.पू. बाबांना परिचित होते. श्री. बागवे हेही एक संत होते आणि त्यांचा ‘हरि ओम् ।’ हा मंत्र होता. त्यामुळे ते ‘हरि ओम् बागवे’ या नावाने ओळखले जात.
२ अ २. ‘दोन संत शेजारी बसले आहेत’, ही त्यांचे छायाचित्र काढण्यास चांगली संधी आहे’, असा विचार करून छायाचित्रकाची मांडणी (सेट) करून ‘क्लिक’चे बटण दाबल्यावर प्रकाशझोत (‘फ्लॅश’) न पडून छायाचित्र न येणे : गुरुपौर्णिमेच्या काही दिवस अगोदर प.पू. बाबा मुंबईस आले होते. ते प.पू. डॉक्टरांच्या घरी मुक्कामास होते. प.पू. बाबांनी ‘बागवे यांना भेटायला येण्यास सांगा’’, असा निरोप त्यांना देण्यास सांगितले. दुसर्या दिवशी सकाळी साधारण ११ वाजता संत श्री बागवे यांचे आगमन झाले. ते प.पू. डॉक्टरांच्या घरी दिवाणखान्यातील पलंगावर प.पू. बाबांच्या शेजारी बसले. सकाळची वेळ असल्याने भक्तांची फारशी गर्दी नव्हती. त्या काळात मला छायाचित्रणाची (फोटोग्राफीची) पुष्कळ हौस होती आणि मी तिथे छायाचित्रक (कॅमेरा) घेऊन गेलो होतो. ‘दोन संत शेजारी-शेजारी बसले आहेत, ही त्यांचे छायाचित्र काढण्याची चांगली संधी आहे’, असा विचार करून मी त्यांचे छायाचित्र काढण्यास पुढे सरसावलो. दोघांच्याही ते लक्षात आले आणि ते जरा छायाचित्रासाठी आवश्यक अशा पद्धतीने बसले (photo conscious झाले). मी छायाचित्रकाची मांडणी (‘सेट’) करून ‘क्लिक’चे बटण दाबले; पण छायाचित्रकाचा प्रकाशझोत (‘फ्लॅश’) पडला नाही.
२ अ ३. प्रकाशझोताची छायाचित्रकाशी असलेली जोडणी (कनेक्शन) तपासून पुन्हा एकदा क्लिकचे बटण दाबल्यावरही प्रकाशाचा झोत न पडणे : आजकाल ‘डिजिटल फोटोग्राफी’मुळे इन्डोअर (indoor) (बंदिस्त जागेतील) छायाचित्रणाच्या जागी प्रकाश न्यून असला, तरीही चांगली छायाचित्रे येऊ शकतात; परंतु त्या वेळी ‘डिजिटल फोटोग्राफी’ला आरंभ झाला नव्हता. त्या वेळी छायाचित्रकामध्ये ‘फिल्मचा रोल’ भरून तो पूर्ण झाल्यावर धुवायला द्यायचा, अशी पद्धत होती. यात इन्डोअर (indoor) छायाचित्रे काढतांना प्रकाश अल्प असल्याने प्रकाशझोत (‘फ्लॅश’) वापरणे आवश्यक होते. मी ‘फ्लॅश’ नीट प्रभारित (चार्ज) झाला आहे कि नाही, हे पाहिले. फ्लॅशची छायाचित्रकाशी असलेली जोडणी तपासून पुन्हा एकदा क्लिकचे बटण दाबले; परंतु तरीही प्रकाशझोत (‘फ्लॅश’) पडला नाही.
२ अ ४. तिसर्या वेळेसही ‘फ्लॅश’ न झाल्यावर शरणागती पत्करणे : आता माझी स्थिती लाजिरवाणी झाली. तिथे जमलेल्या सर्वांचे लक्ष माझ्याकडे केंद्रित झाले होते आणि ते सर्व माझी फजिती पहात होते. दोन्ही संत मात्र अजूनही ‘फोटोसाठी पोझ’ देऊन बसले होते. ‘अजून एक प्रयत्न करून बघूया’, असा विचार करून मी छायाचित्रक अन् फ्लॅश तपासून पुन्हा एकदा ‘क्लिक’चे बटण दाबले आणि तिसर्या वेळेसही ‘फ्लॅश’ झाला नाही. आता मात्र मी शरणागती पत्करली.
२ अ ५. हताश होऊन प.पू. डॉक्टरांकडे साहाय्यासाठी पहाणे, तेव्हा ‘संतांचे छायाचित्र काढण्यासाठी त्यांची अनुमती घ्यावी लागते’, याची प.पू. डॉक्टरांनी जाणीव करून देणे आणि तसे केल्यावर छायाचित्रे चांगली येणे : हे सर्व माझ्या बुद्धीपलीकडचे होते; म्हणून मी साहाय्यासाठी प.पू. डॉक्टरांकडे पाहिले आणि ‘आता काय करायचे ?’, असे मी विचारले. तेव्हा प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘अरे, तू संतांचे छायाचित्र काढत आहेस. त्यासाठी तू त्यांची अनुमती घेतली होतीस का ?’’ मला माझी चूक लक्षात आली आणि मी प्रथम प.पू. बाबांना विचारले, ‘‘बाबा, तुमचे छायाचित्र काढू का ?’’ प.पू. बाबा म्हणाले, ‘‘अरे, काढ ना !’’ आणि त्यांनी ‘पोझ’ थोडी पालटली. आता त्यांच्या तोंडवळ्यावर खेळकरपणाचा आणि आपलेपणाचा भाव होता. मग मी संत श्री बागवे यांनाही विचारले. त्यांनी केवळ मान हालवून हसत होकार दिला आणि ‘आशीर्वाद देत आहे’, असा हात केला. मी पुन्हा छायाचित्रक (कॅमेरा) सेट करून क्लिकचे बटण दाबले. या वेळेस ‘फ्लॅश’ झाला आणि फोटोही चांगला आला.
२ आ. ‘‘संतांच्या इच्छेविरुद्ध किंवा त्यांची अनुमती न घेता त्यांचे छायाचित्र काढू शकत नाही’’, हे सूत्र प.पू. डॉक्टरांनी सर्वांना शिकण्यासाठी अभ्यासवर्गात घेणे : नंतरच्या शनिवारी प.पू. डॉक्टरांनी अभ्यासवर्गात हे सूत्र घेतले आणि सांगितले, ‘‘संतांच्या इच्छेविरुद्ध किंवा त्यांची अनुमती न घेता आपण त्यांची छायाचित्रे काढू शकत नाही.’’ मी म्हटले, ‘‘पण यापूर्वी अनेकांनी प.पू. बाबांची कितीतरी छायाचित्रे काढली आहेत.’’ प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘यापूर्वी प.पू. बाबांची छायाचित्रे काढणारे सर्वजण प.पू. बाबांचे भक्त होते. ‘भक्तांची फजिती करून त्यांना नाराज का करायचे ?’, असा विचार बाबांनी केला असेल; पण या प्रसंगात प.पू. बाबांना शिकवायचे आणि दाखवून द्यायचे होते की, संतांच्या अनुमतीविना तुम्ही त्यांची छायाचित्रे काढू शकत नाही. संत श्री बागवे हे कृष्णभक्त आहेत. त्यांनी प्रारंभी तर्जनी वर केली होती, म्हणजे छायाचित्रकावर सुदर्शनचक्र धरले होते. त्यामुळे छायाचित्र येत नव्हते. अनुमती दिल्यानंतर त्यांनी तर्जनीच्या जागी आशीर्वादाची मुद्रा असलेला हात दाखवला.’’
(क्रमश: उद्याच्या अंकात)
– श्री. अरविंद परळकर, मुंबई (२१.४.२०२०)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा ः https://sanatanprabhat.org/marathi/531018.html
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |