संभाजीनगर – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या ‘नो व्हॅक्सिन नो पेट्रोल’ आदेशाचे पालन करतांना जिल्ह्यातील पेट्रोलपंप चालकांनी स्वतःच्या कामाच्या वेळा पालटण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वच पेट्रोलपंप आता सकाळी ८ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालू रहातील. हा निर्णय २५ नोव्हेंबरपासून लागू केला जात आहे.
‘जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोरोनाचे लसीकरण झालेल्या ग्राहकांनाच इंधन देण्यात यावे’, असा आदेश पेट्रोलपंप मालकांना देण्यात आला आहे. आदेशानुसार, पेट्रोलपंप चालकांनी कर्मचार्यांच्या माध्यमातून येणार्या ग्राहकांनी कोरोनाची लस घेतली किंवा नाही हे पडताळायचे आहे. पंपावर काम करणार्या कर्मचार्यांना दैनंदिन कामे करत असतांनाच लसीकरणाची पडताळणी करावी लागेल. पेट्रोलपंपांवर कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात आहे किंवा नाही, याची पहाणी स्वतः जिल्हाधिकारी सुनील चव्हाण करत आहेत. शहरातील ‘बाबा पेट्रोलपंपा’वर कर्मचारी ग्राहकांच्या लसीकरणाविषयी विचारणा न करताच आणि कोरोनाच्या नियमांचे पालन न करताच पेट्रोल देत होते. त्यामुळे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी हा पेट्रोलपंप बंद (सील) करण्याची कारवाई केली.