सिंधुदुर्ग – वर्ष २०२१ मध्ये जून मासात चालू झालेला पाऊस आता ६ मास होत आले, तरी थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता अवेळी पडत असलेल्या पावसामुळे भात पिकासह अन्य पिकांचीही हानी होत आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकर्यांना हानीभरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे. हा पाऊस असाच चालू राहिला, तर भातशेतीसह जिल्ह्यातील महत्त्वाची पिके असलेल्या आंबा आणि काजू यांच्या उत्पादनांवरही परिणाम होणार आहे.
पावसाचा मुख्य कालावधी संपला असला, तरीही अजूनही अवेळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे तयार झालेले भात आणि कापून शेतात ठेवलेले भात यांची मोठी हानी होत आहे. कापलेले भात भिजल्याने काळे पडत आहेत, तर काही वेळा भात गिरणीत भरडतांना तांदळाचे तुकडे होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाऊस पडत राहिला, तर गुरांना देण्यासाठी वैरणही मिळणार नाही. शेतकर्यांनी जेवढा खर्च केला आहे, त्याहून अल्प उत्पन्न शेतकर्यांना मिळणार आहे. त्यामुळे ‘सरकारने ओला दुष्काळ घोषित करून शेतकर्यांना हानीभरपाई देऊन साहाय्य करावे’, अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे.