जालना – ‘लहान मुलांच्या लसीकरणासह ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस देण्याची मागणी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे’, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २२ नोव्हेंबर या दिवशी येथे बोलतांना दिली.
ते पुढे म्हणाले की,
१. शाळा चालू झाल्याने ११ ते २० वर्षे वयोगटांतील मुलांचा संपर्क वाढल्याने या वयोगटांतील कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत.
२. ‘या मुलांचे लसीकरण तातडीने केले पाहिजे’, असे ‘टास्क फोर्स’चे मत आहे. दिवाळीनंतर शाळेचे वर्ग भरवण्याची मागणी पालक करत आहेत. इयत्ता ५ वीपासूनचे पुढील वर्ग उघडले असून इयत्ता १ ली ते ४ थीपर्यंतचे वर्ग भरवण्यास शिक्षण विभागाला आरोग्य विभागाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देण्यात आले आहे. याविषयी मुख्यमंत्री निर्णय घेतील.
३. राज्यात चिकनगुनियाचे प्रमाण वाढले असून नागरिकांनी काळजी घेण्याचे, तसेच आरोग्य विभागालाही उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात नोव्हेंबरअखेर लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून अधिकाअधिक १५ डिसेंबरपर्यंत पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण होईल.