संपकरी एस्.टी. कर्मचारी हिंसाचार करत असतील, तर राज्यशासनाला कारवाईचा अधिकार ! – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – संपकरी एस्.टी. कर्मचारी कामावर येण्यास इच्छुक असलेल्या कर्मचार्‍यांना रोखत असतील किंवा हिंसाचार करत असतील, तर राज्यशासनाला आवश्यक ती कारवाई करण्याचा अधिकार आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

याविषयी राज्यशासनाने अहवाल सादर करावा, तसेच अन्य कर्मचारी संघटनांनी न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीपुढे म्हणणे मांडावे, तसेच एस्.टी.च्या संघटना आणि एस्.टी. महामंडळ यांचे म्हणणे जाणून प्राथमिक अहवाल करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. एस्.टी. कर्मचार्‍यांनी संप मागे घ्यावा, यासाठी राज्यशासनाने न्यायालयात केलेल्या याचिकेवर २२ नोव्हेंबर या दिवशी सुनावणी झाली. एस्.टी. महामंडळाच्या संपामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडथळा येत असल्याविषयी न्यायालयाने या वेळी अप्रसन्नता व्यक्त केली.