लोकमान्‍य टिळक यांचे देहावसान झालेल्‍या मुंबईतील ‘सरदारगृह’ या वास्‍तूची दुरवस्‍था !

राष्‍ट्रप्रेमी नागरिकांनो, भावी पिढीपुढे राष्‍ट्रपुरुषांचा आदर्श ठेवून त्‍यांच्‍यात राष्‍ट्रप्रेम निर्माण करणारे शासनकर्ते असतील, असे हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करण्‍यासाठी प्रयत्नरत व्‍हा ! – संपादक

लोकमान्य टिळकांचा ‘सरदारगृह’ येथील पुतळा

मुंबई, २१ नोव्‍हेंबर (वार्ता.) – देशाच्‍या स्‍वातंत्र्य चळवळीतील ‘असंतोषाचे जनक’ अशी ओळख असलेले लोकमान्‍य टिळक यांचे मुंबईतील क्रॉफड मार्केट या भागातील ‘सरदारगृह’ या वास्‍तूमध्‍ये निधन झाले होते; पण आज त्‍या वास्‍तूचीच दुरवस्‍था झाली आहे. देशाच्‍या स्‍वातंत्र्य चळवळीत सिंहाचा वाटा उचलणार्‍या या थोर राष्‍ट्रपुरुषाच्‍या वास्‍तव्‍याने पुनित झालेल्‍या वास्‍तूकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्‍यामुळे या वास्‍तूमध्‍ये लोकमान्‍यांचे देहावसान झाले होते, हे अनेकांना ठाऊकच नाही. सर्वपक्षीय शासनकर्त्‍यांच्‍या दुर्लक्षामुळे लोकमान्‍यांच्‍या कार्याची ओळख करून देणार्‍या या वास्‍तूला देशवासीय मुकत आहेत. भाजपचे नेते राज पुरोहित हे मागील अनेक वर्षे या वास्‍तूला अधिग्रहित करून राष्‍ट्रीय स्‍मारकाचा दर्जा देण्‍याची विनंती सरकारकडे करत आहेत; मात्र त्‍याकडे दुर्लक्ष होत आहे.

लोकमान्‍य टिळक यांचे देहावसान झालेले मुंबईतील ‘सरदारगृह’

१. सरदारगृह या इमारतीच्‍या ४ थ्‍या मजल्‍यावर दैनिक ‘केसरी’ चे कार्यालय आजही आहे. लोकमान्‍यांच्‍या राष्‍ट्रकार्याची प्रेरणा देणारी ही वास्‍तू सद्यस्‍थितीला केवळ दैनिक ‘केसरी’चे कार्यालय म्‍हणून ओळखले जात आहे. लोकमान्‍य टिळक यांची पगडी आणि उपरणे आजही तेथे संग्रही ठेवण्‍यात आले आहे.

२. या वास्‍तूमध्‍ये लोकमान्‍य टिळक यांच्‍या जीवनातील महत्त्वाच्‍या प्रसंगांची चित्रे भिंतीवर काढण्‍यात आली आहेत. लोकमान्‍य टिळक यांचे अंत्‍यदर्शनाच्‍या वेळी ठेवण्‍यात आलेले पार्थिव आणि त्‍यांच्‍या अंत्‍ययात्रेला झालेली प्रचंड गर्दी यांची छायाचित्रेही तेथे पहायला मिळतात.

३. ही इमारत जुनी झाली असून चौथ्‍या मजल्‍यावरील लोकमान्‍यांच्‍या खोलीपर्यंत जाण्‍याचा जिना अशरक्ष: तंबाखू आणि पान यांच्‍या पिचकार्‍यांनी रंगला आहे.


हे पण वाचा –

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’, असे ठणकावणार्‍या लोकमान्य टिळक यांचे रत्नागिरीतील जन्मस्थान दुरवस्थेत !
https://sanatanprabhat.org/marathi/529131.html

लोकमान्य टिळक यांचे रत्नागिरी येथील जन्मस्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करा ! – हिंदु जनजागृती समिती
https://sanatanprabhat.org/marathi/529081.html


४. इमारतीच्‍या प्रवेशद्वाराच्‍या वर ‘लोकमान्‍य बाळ गंगाधर टिळक’ या नावाची पाटी असून त्‍यावर ‘स्‍वराज्‍य हा माझा जन्‍मसिद्ध हक्‍क आहे आणि तो मी मिळवणारच’, ही लोकमान्‍यांची प्रसिद्ध सिंहगर्जना आणि त्‍यांचे जन्‍म-मृत्‍यू यांचे दिनांक पाटीवर देण्‍यात आली आहे. ही पाटी मुख्‍य रस्‍त्‍यावरून दिसत नाही. या नावाच्‍या पाटीच्‍या वर दोन भगवे ध्‍वज लावण्‍यात आले आहेत; मात्र तेही जीर्ण झाले आहेत.

५. इमारतीच्‍या नावाच्‍या पाटीच्‍या वरच्‍या भागात लोकमान्‍य टिळक यांच्‍या संगमरवरी दगडाचा अर्धाकृती पुतळा आहे; मात्र त्‍यावर पुष्‍कळ धूळ साचली आहे.

६. ही इमारत एका खासगी व्‍यावसायिकाने विकत घेतली आहे. या वास्‍तूची माहिती नसल्‍यामुळे विद्यार्थी अथवा राष्‍ट्रप्रेमी ही वास्‍तू पहायला येत नाहीत. सरकारने या वास्‍तूचे संवर्धन केल्‍यास त्‍यातून भावी पिढीला राष्‍ट्रकार्यासाठी प्रेरणा मिळेल.