लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थानाकडे पुरातत्व विभागाने केलेले अक्षम्य दुर्लक्ष उघडकीस आणणारा लेख !
राष्ट्रपुरुषांच्या स्मृती जतन करणे, म्हणजे त्यांच्याप्रती कृतज्ञ रहाणे आणि राष्ट्राभिमान जोपासणे होय, हे सरकारच्या केव्हा लक्षात येणार ? – संपादक
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच !’, असे ब्रिटिशांना ठणकावणारे आणि ‘केसरी’, ‘मराठा’ या वृत्तपत्रांच्या माध्यमातून, स्वत:च्या वक्तृत्वातून इंग्रजांच्या अन्याय-अत्याचारांच्या विरोधात भारतियांमध्ये असंतोष निर्माण करणारे ‘भारतीय असंतोषाचे जनक’, सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून स्वराज्याच्या चळवळीला गतीमान करणारे, ‘गीतारहस्य’, ‘ओरायन’, ‘आर्क्टिक होम इन द वेदाज’, ‘वैदिक क्रोनोलॉजी अँड वेदांग ज्योतिष’ आदी धार्मिक ग्रंथांचे कर्ते प्रकांड पंडित, उत्कृष्ट संपादक, संस्कृत, गणित, खगोलशास्त्र, वेदान्त तत्त्वज्ञान आदींचे गाढे अभ्यासक, महान स्वातंत्र्यसेनानायक निष्काम कर्मयोगी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्र आणि धर्म विषयक कार्यापुढे भारतीय सदैव नतमस्तक रहातील !
केवळ ६४ वर्षांच्या आयुष्यात प्रचंड लोकोत्तर कार्य करणार्या अशा या थोर धुरंधर विभूतीच्या रत्नागिरी येथील जन्मस्थानाची दुरवस्था झालेली पहायला मिळत आहे. हे जन्मस्थान ‘महाराष्ट्र शासनाचा पुरातत्व विभाग, रत्नागिरी’च्या अंतर्गत येते. कोरोनाच्या संसर्गामुळे रत्नागिरी येथील लोकमान्य टिळकांचे बंद असलेले जन्मस्थान
१३ नोव्हेंबर २०२१ पासून महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. जन्मस्थानाच्या या दुरवस्थेविषयी जाग आणणारा लेख लोकमान्य टिळक यांच्या असामान्य निवडक कर्तृत्वविशेषासह येथे देत आहोत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वाेच्च त्याग केलेल्या स्वातंत्र्यसेनानींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या वास्तू भावी पिढीला प्रेरणादायी ठरतील, अशा प्रकारे संरक्षित आणि जतन करण्यात याव्यात, हा या लेखामागचा उद्देश आहे, हे वाचकांनी लक्षात घ्यावे !
संकलक – श्री. संजय जोशी, हिंदु जनजागृती समिती, रत्नागिरी.
१. जन्मस्थानाच्या छपराची दुरवस्था
जन्मस्थानाच्या छपराची कौले (जुन्या काळातील नळे) फुटली आहेत. कौले (नळे) पाऊस आणि वारा यांमुळे पडू लागल्याने छपराच्या काही भागांतील कौले काढून ठेवण्यात आली आहेत. काही ठिकाणी कौले तशीच फुटलेल्या अवस्थेत छपरावर ठेवण्यात आली आहेत. कौले फुटल्याने, तसेच काही ठिकाणी ती काढून ठेवल्याने छपरावरील पत्रे उघडे पडून गंजून सडत आहेत. स्मारकाच्या मागील भागाच्या छपरावरील कौलांवर गवत वाढले आहे. याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर पावसाळ्यात पाणी गळून ही ऐतिहासिक वास्तू, तसेच वास्तूत जतन केलेल्या लोकमान्य टिळक यांचा अनमोल ठेवा खराब होण्याचे भय आहे.
२. रंग उडालेली जन्मस्थानाची वास्तू
जन्मस्थानाच्या वास्तूचे रंगकाम केलेले नाही. भिंतींवर शेवाळ धरले आहे. काही ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत.
३. जन्मस्थानाचा गंजलेला फलक
पुरातत्व विभागाने लावलेला जन्मस्थानाचा फलक गंजला असून तो नीट वाचताही येत नाही. दुसर्या फलकावर झाडाची फांदी आली असल्याने तो फलकही पूर्ण वाचता येत नाही. ‘पुरातत्व विभागाने किमान खराब फलक काढून तेथे चांगला फलक लावावा’, अशी अपेक्षा स्थानिक रहिवासी करत आहेत.
४. लोकमान्य टिळकांचा पुतळा आणि मेघडंबरी यांची दुरवस्था
जन्मस्थानाच्या प्रवेशद्वाराजवळ मेघडंबरीमध्ये लोकमान्य टिळक यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. त्याचा रंग काही ठिकाणी उडाला आहे. तेथील रंगाचे कपचे उडाले आहेत. पुतळ्याच्या धातूचा भाग काही ठिकाणी सडल्यासारखा झाला आहे. मेघडंबरीच्या खांबांना लावलेल्या फरशांमध्ये भेगा असून तो भाग बुजवलेला नाही. मेघडंबरीवरील अर्धगोलाकार छताचा रंग उडाला आहे. मेघडंबरीच्या उद्घाटनाचा फलक खराब झाला असून तो नीट वाचता येत नाही. ‘केवळ उद्घाटने करून फलक लावायचे आणि संबंधित वास्तूकडे ती खराब होईपर्यंत ढुंकूनही पहायचे नाही, ही पुढारी आणि अधिकारी वर्ग यांची जुनी खोड आहे’, अशी खोचक प्रतिक्रिया स्थानिक रहिवासी व्यक्त करत आहेत.
५. शिल्पाकृतीची दुरवस्था
मेघडंबरीच्या मागे लोकमान्य टिळकांच्या जीवनातील काही प्रसंग दर्शवणारी शिल्पाकृती ज्या लोखंडी ‘अँगल’वर बसवण्यात आली होती. तिचे ‘वेल्डिंग’ तुटल्याने शिल्पाकृती खाली पडून तुटली. तुटलेली शिल्पाकृती स्मारकाच्या संरक्षक भिंतीला टेकवून ठेवलेली असून ती खराब झाली आहे. शिल्पाकृतीचा तुटलेला भाग अन्यत्र ठेवला असल्याचे समजते. शिल्पाकृतीवर झाडी आल्याने ती नीट दिसतही नाही. लोकमान्य टिळकांच्या जीवनातील प्रसंग चित्रीत केलेल्या शिल्पाकृतीची जर ही अवस्था असेल, तर एकूणच लोकमान्यांच्या जन्मस्थानाचे जतन कशा प्रकारे होत असेल ? याची वाचकांना सहज कल्पना येऊ शकेल.
६. अपुरा कर्मचारी वर्ग आणि जन्मस्थानाची माहिती सांगण्याची व्यवस्था नसणे
स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्मारकाला भेट द्यायला देशभरातून शेकडो पर्यटक, तसेच सहलीच्या निमित्ताने शालेय विद्यार्थी येतात. ते स्मारकाची माहिती पुस्तिका मागतात; मात्र स्मारकाच्या ठिकाणी माहिती पुस्तिका ठेवण्यात आलेली नाही. या आधी जन्मस्थानाची माहिती देण्यासाठी कर्मचारी वर्गाचा अभाव दिसून येत होता. जन्मस्थानाची जागा अनुमाने १ एकर आहे. एवढी मोठी जागा आणि जन्मस्थानाची वास्तू यांच्या देखभालीसाठी पूर्वी २ पहारेकरी होते. सद्य:स्थितीत तेथे केवळ १ पहारेकरी आहे. त्याला एकट्यालाच जन्मस्थानाची स्वच्छता, पर्यटकांसाठी बांधलेल्या स्वच्छतागृहांची स्वच्छता, झाडांची देखभाल, बागकाम, पर्यटकांना जन्मस्थानाची माहिती देणे इत्यादी करावे लागत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
७. जन्मस्थानामागील परिसराची दुरवस्था
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मारकाचा परिसर अनुमाने १ एकरचा असून त्यात आंबा, माड आणि इतर झाडे असून परिसरात स्वच्छतेचा अभाव आहे. एके ठिकाणी जन्मस्थळाच्या संरक्षक भिंतीबाहेरील एक मोठे झाड संरक्षक भिंतीला टेकले असून झाडाच्या वजनाने संरक्षक भिंत केव्हाही कोसळू शकेल, अशी स्थिती आहे. जन्मस्थानाच्या मागील बाजूस असलेल्या आंब्याचे झाड तुटल्यानंतर राहिलेला बुंध्याचा भाग तसाच ठेवलेला आहे. परिसरात पडलेली झाडे, लाकूड, सामान, चिरे, फुटलेली कौले (नळे) अस्ताव्यस्त आहेत. पर्यटकांसाठी नवीन स्वच्छतागृह बांधण्यात आले; मात्र मोडकळीस आलेले जुने स्वच्छतागृह त्याच स्थितीत ठेवण्यात आले आहे.
८. पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय दुर्लक्षित
जन्मस्थानाच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीच्या २ पंपांपैकी १ नादुरुस्त आहे. विहिरीची स्वच्छता होत नाही. विहिरीत गाळ साठला आहे. पिण्याचे पाणी साठवण्याची व्यवस्था नाही. एका देणगीदाराने दिलेले शीतयंत्र अनेक वर्षे बंद आहे. त्यामुळे पर्यटकांची पिण्याच्या पाण्याची सोय दुर्लक्षित झाल्याचे समजते.
हे पण वाचा –
♦ लोकमान्य टिळक यांचे रत्नागिरी येथील जन्मस्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करा ! – हिंदु जनजागृती समिती
https://sanatanprabhat.org/marathi/529081.html
♦ लोकमान्य टिळक यांचे देहावसान झालेल्या मुंबईतील ‘सरदारगृह’ या वास्तूची दुरवस्था !
https://sanatanprabhat.org/marathi/529257.html
९. अपप्रकार टाळण्यासाठी ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवण्याची आवश्यकता !
पर्यटकांपैकी काहींना जन्मस्थळाच्या मागील बाजूस असलेल्या बाकांवर बसून मद्यप्राशन करतांना पकडण्यात आले होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वत:चे आयुष्य वेचणार्या स्वातंत्र्यधुरिणांचा अवमान करणार्या अशा नतद्रष्ट मंडळींना शासन करण्याच्या दृष्टीने आणि एकूणच ऐतिहासिक जन्मस्थळाच्या वास्तूचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने येथे ‘सीसीटीव्ही कॅमेरे’
बसवले जावेत, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
१०. वाहनतळाची (पार्किंगची) व्यवस्था अथवा त्यासाठी फलक नसणे
जन्मस्थानाला भेट द्यायला असंख्य नागरिक, तसेच विद्यार्थ्यांच्या सहली येत असतात. त्यांची वाहने कुठे उभी करायची ? असा प्रश्न अनेक वेळा निर्माण होऊन रहदारीस अडथळा निर्माण होतो. यासाठी ‘स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था करण्यात यावी आणि तसा फलक जन्मस्थानाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस लावण्यात यावा’, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
११. प्रवेशद्वाराजवळील लोखंडी ग्रील गंजून तुटणे
जन्मस्थानाच्या प्रवेशद्वाराजवळील लोखंडी ग्रील गंजून तुटले आहे. तुटलेल्या भागी लाकडी पट्ट्या बांधून ठेवल्याचे दिसत आहे.
वास्तूची दुरवस्था
परिसरातील अस्वच्छता
योग्य संरक्षणाचा अभाव
गंजलेला माहितीफलक
लोकमान्य टिळकांच्या अलौकिक कार्याचा काही अंशअशा महान राष्ट्रपुरुषाचे जन्मस्थान शासकीय अनास्थेमुळे दुर्लक्षित रहाणे कितपत योग्य ? – संपादक १. वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर देशाला स्वराज्य मिळवण्यासाठी दिशा देणारे पहिले नेते ! भारतीय असंतोषाचे जनक आणि लाल, बाल, पाल या त्रैमूर्तीतील एक स्वातंत्र्यसेनानायक ! २. वर्ष १८९३ – पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव, तर १८९५ या वर्षी शिवजयंती उत्सव चालू केला. त्याआधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावरील समाधीचा प्रथम जीर्णाेद्धार केला. ३. वर्ष १८९५ – मुंबई प्रांत विनियम बोर्डचे सभासद म्हणून नेमणूक ! ४. वर्ष १९०५ – स्वदेशीचा अंगीकार आणि विदेशी मालावर बहिष्कार ही चळवळ चालू केली. ५. वर्ष १९०८ – राजद्रोहाचा खटला चालून ६ वर्षांची शिक्षा ब्रह्मदेशात मंडाले कारागृहात भोगली. ६. वर्ष १९१६ – ‘होमरूल लिग’ या संघटनेची स्थापना केली. होमरूल म्हणजे आपल्या राज्याचे प्रशासन आपण करायचे यालाच ‘स्वशासन’ असेही म्हणतात. ७. हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळायला हवा, याकरता सर्वांत आधी पुढाकार लोकमान्य टिळकांनीच घेतला होता. ८. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात टिळक पंचांग पद्धती आजही वापरली जाते. ९. महाराष्ट्रात सहकारी चळवळ टिळकांनी प्रथम चालू केली. कम्युनिस्ट पार्टीची स्थापना भारतात होण्यापूर्वी कितीतरी आधी टिळक भारतीय कामगार चळवळीचे नेतृत्व करत होते. |
जन्मस्थानाच्या सुधारणेच्या दृष्टीने स्थानिकांनी केलेल्या सूचना !
१. जन्मस्थानाची देखरेख आणि अन्य कामे यांसाठी पुरेसा कर्मचारी वर्ग ठेवण्यात यावा.
२. जन्मस्थानामध्ये लोकमान्य टिळकांविषयी माहिती देणारे फलक मराठी आहेत. या ठिकाणी भेट द्यायला देशभरातून असंख्य बहुभाषिक नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांच्या सहली येत असतात. त्यांना भाषेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी येथे इंग्रजी आणि हिंदी भाषांतील फलकही लावण्यात यावेत.
३. जन्मस्थानाची वास्तू जुनी असल्याने त्यासाठी वापरलेले खांब, वासे, रेजे, बॉटमपट्टी यांचे लाकूड खराब झालेले असण्याची शक्यता आहे. ते पालटण्यात अथवा दुरुस्त करण्यात यावेत.
४. जन्मस्थानामध्ये प्रवेश करण्याच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूस लाकडी रेजे आहेत. दोन रेज्यांमधील अंतरामधून मांजर, घुशी, सरपटणारे प्राणी इत्यादी आत जाऊन धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी रेज्यांच्या आतल्या बाजूने उघडझाप करता येणार्या लोखंडी झडपा (शटर) बसवण्यात याव्यात.
५. लोकमान्य टिळकांचे कार्य दर्शवणारा चलचित्रपट (डॉक्युमेंटरी) दाखवण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच तेथे माहिती पुस्तिका, लोकमान्यांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या निवडक प्रती, छायाचित्र इत्यादी साहित्य ठेवण्यात यावे. जन्मस्थानाची आठवण म्हणून पर्यटक ते खरेदी करून घेऊन जाऊ शकतील आणि त्यातून पुरातत्व विभागाला उत्पन्नही मिळू शकेल.
६. वास्तूची बाहेरील स्थिती लक्षात घेता वास्तूच्या आत भिंतींचा रंग उडाला असण्याची शक्यता आहे, त्याची रंगरंगोटी करण्यात यावी.
७. वास्तूच्या आत असलेल्या माहिती फलकांची तपासणी करावी आणि आवश्यक ते फलक (जीर्ण झालेले, अक्षरे दिसेनाशी झालेले) पालटून त्याजागी समर्पक लिखाण आणि चित्रे असलेले नवीन फलक लावण्यात यावेत.
८. पूर्वीच्या काळी जमिनी सारवल्या जात. वास्तूच्या आतमध्ये कोबा केलेला आहे आणि त्यावर शेणाने सारवलेले असल्याचे जन्मस्थळाला पूर्वी भेट दिलेले सांगतात. वास्तूचा जुना बाज टिकून रहावा, यासाठी वास्तूच्या जमिनी नियमित शेणाने सारवण्याची व्यवस्था करण्यात यावी.
९. जन्मस्थानासाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी शासनाकडून संमत झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. संमत झालेला शासकीय निधी कागदावर न रहाता त्याचा योग्य विनियोग करून लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाचे त्वरित संरक्षण आणि संवर्धन करण्यात यावे.
१०. जन्मस्थानाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेली वास्तू अनेक वर्षे पडून आहे. तेथे लोकमान्य टिळकांविषयीच्या ग्रंथांचे ग्रंथालय उभारण्यात यावे, म्हणजे पर्यटकांना लोकमान्यांविषयी विस्तृत माहिती घेऊन अभ्यासही करता येईल.
११. लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान सध्या महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या अंतर्गत देखभालीसाठी आहे. हे जन्मस्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करण्यात यावे.
१२. लोकमान्य टिळक यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार घोषित करावा.
ज्या लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी स्वतःचे आयुष्य वेचले, बंदीवास स्वीकारला, त्यांच्या जन्मस्थानाची अशी दुरवस्था पाहून आपले राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचा जाज्वल्य इतिहास जतन करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यासाठी ‘शासनकर्त्यांचे डोके कधी ठिकाणावर
येणार ?’, असा प्रश्न अनेकांच्या मनात उत्पन्न होत आहे. राष्ट्राच्या भावी पिढीला पर्यायाने राष्ट्राला विजिगीषू बनवायचे असेल, तर लोकमान्य टिळकांसारख्या थोर स्वातंत्र्यसेनानायकांच्या स्मृतीस्थळांची जपणूक प्राणांपलीकडे करणे, ही काळाची आवश्यकता आहे !