केवळ ‘गोभक्त’ नको तर गोहत्या थांबवण्यासाठी गोभक्तांनी कृतीशील झाले पाहिजे ! – साध्वी प्रीतीसुधाजी महाराज

पुणे येथे विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित ‘मेळा गोभक्तां’चा कार्यक्रम संपन्न !

साध्वी प्रीतीसुधाजी महाराज

पुणे – एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते असूनही गाय कापली जाते याचे दु:ख वाटते. आपण त्यांच्या विरोधात काही करत नाही म्हणून त्यांची हिंमत वाढते. केवळ ‘गोभक्त’ संबोधून घेऊ नका. आपल्याला संख्या नको आहे. गाय वाचली पाहिजे. त्यासाठी कृतीशील कार्यकर्ता पाहिजे, असे प्रतिपादन साध्वी प्रीतीसुधाजी महाराज यांनी केले. विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताने आयोजित केलेल्या ‘मेळा गोभक्तां’चा हा कार्यक्रम पुणे येथे पार पडला, त्या वेळी त्या बोलत होत्या.

प्रीतीसुधाजी महाराज पुढे म्हणाल्या की, आमच्या गोशाळेत व्यवसाय केला जात नाही. गोपालन करणे ही आमची साधना आहे. या साधनेतून आम्हाला आत्मानुभूती येते. प्रत्येकाने प्रतिदिन तन, मन, धन यांचा त्याग करून गाय पशूवधगृहात जाणार नाही यासाठी प्रयत्न करायला हवेत.

या मेळाव्यात संपूर्ण महाराष्ट्रातील गोरक्षक, गोसेवक, गोपालक, गोशाळा चालक अशा सर्वच कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी विहिंप मुंबई प्रांताचे अध्यक्ष शंकर गायकर, गोभक्त सचिन पुणेकर, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते. ‘कोहिनूर ग्रुप’चे कृष्णकुमार गोयल, माजी आमदार मेधा कुलकर्णी तसेच अनेक गोभक्तांनी आपले मनोगत व्यक्त केले.

महाराष्ट्र शासनाने गाय ही ‘वारसा प्राणी’ म्हणून घोषित करावा, अशी मागणी गोभक्त सचिन पुणेकर यांनी या वेळी केली. त्याविषयीचे निवेदनही त्यांनी सभेसमोर सादर केले.

हिंदूंना मिटवण्याचा प्रयत्न केला तरीही ‘हिंदु धर्म’ संपत नाही ! – श्री. शंकर गायकर, विहिंप मुंबई प्रांताचे अध्यक्ष

गोमातेची सेवा हीच राष्ट्रसेवा, मातृसेवा आहे. गोमातेच्या रक्षणासाठीची लढाई अनेक शतकांपासून चालू आहे. भारतमातेच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा वर्ष १८५७ चा उठावही ‘गोहत्ये’ वरूनच झाला आहे. हिंदूंना मिटवण्याचा प्रयत्न गेली ५०० वर्षांपासून चालू आहे. तरीही ‘हिंदु धर्म’ संपत नाही म्हणून तो सनातन आहे. गोसेवा हे एक व्रत आहे. संकल्प आहे. ताकत आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा. या ठिकाणी होणारा हा सत्कार नसून गोरक्षणाचे दायित्व आहे. हेच आपले ध्येय, कर्तव्य असले पाहिजे. गाय आमचे मातृत्व, पितृत्व आणि राष्ट्रीयत्व आहे, तसेच आमचे गोत्रही आहे. गोमातेला धक्का लागू देणार नाही. याआधीही अनेक साधू-संतांचा गोहत्या बंदी कायदा करण्यासाठी बळी गेला आहे.