एस्.टी.च्या भरतीतील प्रतीक्षा सूचीतील उमेदवारांना सेवेत घेण्याची शक्यता !

कर्मचार्‍यांना कामावर उपस्थित रहाण्याविषयी नोटीस

अनिल परब, परिवहनमंत्री

मुंबई – राज्य परिवहन महामंडळाने कर्मचार्‍यांचा संप मोडीत काढण्यासाठी रोजंदारीवर काम करणार्‍या २ सहस्र २९६ कर्मचार्‍यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे. उर्वरित कर्मचारी कामावर न आल्यास नवीन कामगारांना कामावर घेण्याचे संकेत परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिले आहेत. मागील १२ दिवसांपासून कर्मचार्‍यांचा संप चालू आहे.

राज्यशासनामध्ये एस्.टी.चे विलीनीकरण करण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर एस्.टी. कर्मचार्‍यांचे आंदोलन चालू आहे. ‘सर्व कर्मचार्‍यांनी २४ घंट्यांत कामावर उपस्थित रहावे, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल’, अशी नोटीस बजावण्यात आली होती. ‘कर्मचारी कामावर न आल्यास वर्ष २०१६-१७ आणि २०१९ मधील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार केला जाईल’, असे परब यांनी सांगितले.