मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आहेत कुठे ? याची माहिती आम्हाला द्या !

सर्वोच्च न्यायालयाचा अधिवक्त्यांना आदेश

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह

नवी देहली – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह कुठे आहेत ?, त्यांचा ठावठिकाणा काय आहे ?, याची माहिती आम्हाला द्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सिंह यांच्या अधिवक्त्यांना दिला. सिंह यांनी त्यांच्या अधिवक्त्यांच्या माध्यमातून अटकेपासून संरक्षण देणारी याचिका प्रविष्ट केली आहे. त्यावरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हा आदेश दिला. सिंह यांच्याविरुद्ध खंडणीचे ४ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. ते देशाबाहेर पळून गेल्याचे बोलले जात आहे. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने सिंह यांच्या अधिवक्त्यांना वरील आदेश दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ नोव्हेंबरला होणार आहे.

१. न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्ते (परमबीर सिंह) जगाच्या कोणत्या कोपर्‍यात आहेत ? ते या देशात आहेत कि देशाबाहेर गेले आहेत ? याचिकाकर्ते कुठे आहेत ते आम्हाला सर्वप्रथम जाणून घ्यायचे आहे.

२. यावर सिंह यांच्या अधिवक्त्यांनी सांगितले की, सिंह यांना सुरक्षित वाटल्यास ते समोर येतील.

३. त्यावर न्यायालयाने अधिवक्त्यांना ‘तुमचा व्यवस्थेवर किती अविश्‍वास आहे ते पाहा. याचिकाकर्ते पोलीस आयुक्त होते; पण आम्ही त्यांना कोणतीही विशेष वागणूक देणार नाही. ते संरक्षण मागत आहेत. ‘न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यावरच ते भारतात प्रकट होतील’, असे तुम्हाला म्हणायचे आहे का ?’, अशा शब्दांत अधिवक्त्यांना सुनावले.