सांगली, १७ नोव्हेंबर (वार्ता.) – सांगलीच्या आयर्विन पुलास १८ नोव्हेंबर या दिवशी ९२ वर्षे पूर्ण होत आहेत. या पुलाचे काम वर्ष १९२७ ते १९२९ पर्यंत चालू होते. या पुलास एकूण १३ कमानी असून त्याच्या बांधकामासाठी ६ लाख ५० सहस्र रुपये व्यय आला आहे. पुलाची योजना आणि कामाची पहाणी व्ही.जी. भावे यांच्याकडे होती. याचे उद्घाटन तत्कालीन ‘व्हॉइस रॉय आणि गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया’चे आयर्विन यांच्या हस्ते १८ नोव्हेंबर १९२९ या दिवशी झाले. सांगलीत त्या काळी ‘हीज हायनेस’ श्रीमंत चिंतामणराव धुंडिराज उपाख्य आप्पासाहेब पटवर्धन यांची कारकीर्द होती. वर्ष २००५, वर्ष २०१९ आणि २०२१ च्या महापुराचा अनुभव या पुलाने घेतला असून आजही हा पूल कृष्णा नदीत ठामपणे उभा आहे, अशी माहिती ज्येष्ठ राष्ट्रप्रेमी श्री. शरद फडके यांनी दिली आहे.