नागपूर – कोरोनाचा संसर्ग अल्प झाला आहे, सर्व व्यवहार पूर्ववत् चालू झाले आहेत, हे लक्षात घेऊन आता रेल्वेनेही देशभरातील सर्व सेवा पूर्ववत् करण्याचा निर्णय घेतला आहे. लांब पल्ल्यांच्या सर्व गाड्यांचे क्रमांकही पालटले आहेत. त्यामुळे पूर्वीचे क्रमांक ठाऊक नसल्याने प्रवाशांची धावपळ होत आहे, तसेच ज्या प्रवाशांनी रेल्वे गाडीच्या जुन्या क्रमांकाने आरक्षण केले, त्यांची आता गाडीचा क्रमांक शोधण्यासाठी धावाधाव चालू झाली आहे.
रेल्वे गाड्यांच्या क्रमांकासमोरील ‘शून्य’ काढला !
भारतीय रेल्वेने कोविड पूर्वकाळात चालवल्या जात असलेल्या सर्व गाड्या पुन्हा त्याच पद्धतीने चालवण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच गाड्यांचे वेळापत्रकही पहिल्याप्रमाणेच करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या काळात रेल्वेने बर्याच गाड्या बंद केल्या होत्या. त्यामुळे चालू असलेल्या गाड्यांचे क्रमांकही पालटले होते. ते क्रमांक ‘शून्य’ अंकाने चालू होत होते; मात्र आता रेल्वेने हे क्रमांकही पालटण्याचा निर्णय घेतला आहे. या क्रमांकासमोरील ‘शून्य’ काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे साहजिकच सर्व गाड्यांचे क्रमांक पालटले आहेत.
तिकीट विक्री घराकडे जाऊन गाडीचा क्रमांक जाणून घेण्याचे आवाहन !
रेल्वेने आता रेल्वे स्थानकांवर उद्घोषणेद्वारे याविषयीची माहिती प्रवाशांना देण्यास प्रारंभ केला आहे, तसेच आरक्षण केलेल्या प्रवाशांना त्यांच्या गाडीचा क्रमांक तिकीट विक्री घराकडे जाऊन जाणून घेण्याचे आवाहन केले आहे; मात्र ज्यांना याविषयी काहीच माहिती नसेल, त्या प्रवाशांची ऐनवेळी तारांबळ होणार आहे. त्यामुळे याविषयी रेल्वेने तातडीने सर्व नागरिकांपर्यंत ही माहिती पोचवायला हवी.