परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्‍या नंदुरबार येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. निवेदिता योगेंद्र जोशी ! 

मुलांवर साधनेचे संस्कार करून त्यांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी पाठिंबा देणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्‍या नंदुरबार येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. निवेदिता योगेंद्र जोशी (वय ४९ वर्षे) ! 

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधना करणार्‍या कु. सानिका जोशी (वय २४ वर्षे) आणि श्री. ईशान जोशी (वय २२ वर्षे) यांना त्यांची आई ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. निवेदिता जोशी यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सौ. निवेदिता जोशी

१. बालपण

१ अ. प्रतिदिन मंदिराची स्वच्छता करणे आणि पहाटे भूपाळी अन् काकड आरती म्हणणे : ‘आईचे बालपण संतांच्या सहवासात आणि देवपूजेत गेले. लहान असतांना ती तिच्या आजोळी सोनगीर (जिल्हा धुळे) या गावी रहायला होती. तिचे आजोबा तेथील बालाजी मंदिराचे पुजारी होते. त्यामुळे ती तिथे प्रतिदिन मंदिराची स्वच्छता करायची आणि पहाटे भूपाळी अन् काकड आरती (देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी मंदिरात केली जाणारी आरती) म्हणायची. त्यामुळे तिला लहानपणापासूनच देवाची पुष्कळ आवड होती.

१ आ. संतसेवा आणि संतांचा आशीर्वाद लाभणे

१. सोनगीर येथे आनंदवन संस्थानाच्या गुरुपरंपरेत अनेक मोठे संतही होऊन गेले आहेत. त्या संतांना दूध नेऊन देण्याची सेवा आई करायची. त्यामुळे तिला लहानपणापासूनच संत सहवास लाभला होता.

२. तिच्या लहानपणी तिला प.पू. भक्तराज महाराज यांचा आशीर्वादही मिळाला आहे. त्यामुळे संत, देवता यांच्या आशीर्वादानेच आई थेट भगवंताच्या गोकुळात, म्हणजेच सनातन संस्थेमध्ये आली आणि आईच्या पुण्याईने आम्हाला रामनाथी आश्रमात येण्याची संधी मिळाली.

२. काटकसर

आई सर्व वस्तूंचा वापर अतिशय काटकसरीने करते.

श्री. योगेंद्र जोशी

३. समाधानी वृत्ती

आमची आर्थिक स्थिती चांगली नाही, तरी आई याविषयी बाबांना (श्री. योगेंद्र जोशी यांना) काही बोलत नाही. ती हा प्रारब्धाचा भाग समजते आणि आलेल्या प्रसंगांना तोंड देते. तिला कुठल्याच गोष्टींची आसक्ती राहिलेली नाही. ती समाधानी आहे.

४. सेवेची तळमळ

पूर्वी बाबांकडे दुचाकी नव्हती. तेव्हा ती सनातनचे सत्संग आणि प्र्रवचन घेण्यासाठी ७ – ८ किलोमीटर लांब पायी ये-जा करायची आणि पुन्हा येऊन घरातील कामे करायची.’

– कु. सानिका आणि श्री. ईशान जोशी (सौ. निवेदिता जोशी यांची मुलगी आणि मुलगा)

५. परिस्थिती स्वीकारणे

‘आईला पूर्वी माझ्या विवाहाची काळजी वाटायची; पण एका संतांनी सांगितल्यापासून तिला आता त्याविषयी काळजी वाटत नाही. ती म्हणाली, ‘‘मी सर्व विचार देवाच्या चरणी अर्पण केले आहेत. त्यामुळे जे होईल ते चांगलेच होईल.’’ ती मला सांगते, ‘‘नातेवाइक काय म्हणतील, याची तू काळजी करू नकोस.’’

६. इतरांना साहाय्य करून त्यांच्याशी जवळीक साधणे

कु. सानिका जोशी

आई कुणालाही लगेच साहाय्य करते. मी शाळेत असतांना आमच्या वर्गामध्ये एक मुलगी होती. ती तिच्या आई-वडिलांना सोडून तिच्या नातेवाइकांकडे शिकण्यासाठी आली होती. तिचे नातेवाइक तिला पुष्कळ छळायचे आणि तिला शाळेत जाऊ द्यायचे नाहीत. त्यामुळे सर्व मैत्रिणींनी ठरवले की, त्या मैत्रिणीची अडचण सुटत नाही, तोपर्यंत तिला साहाय्य करायचे. ‘ती प्रत्येक मैत्रिणीच्या घरी दोन दिवस राहील’, असे ठरले. मी आई-बाबांची सहमती घेऊन तिला घरी आणले. त्या वेळी आईने तिच्यावर मुलीप्रमाणे प्रेम करून तिची काळजी घेतली आणि आई-बाबांनी तिला साधनेविषयीही मार्गदर्शन केले. आईच्या प्रेमभावामुळे मैत्रिणीला बरे वाटले. अन्य वेळीही आईच्या या गुणामुळे समाजातील अनेक लोक तिच्याशी जोडलेले आहेत.’

– कु. सानिका जोशी

७. मुलांवर साधनेचे संस्कार करणे

७ अ. मुलाच्या अयोग्य कृतीसाठी शिक्षा देणे : ‘आम्हाला लहानपणापासून देवाची आवड निर्माण व्हावी आणि आमच्यावर चांगले संस्कार व्हावे, यासाठी आई आम्हाला प्रतिदिन ‘शुभं करोती, रामरक्षा, मारुतिस्तोत्र आणि मनाचे श्लोक’ म्हणायला सांगायची, तसेच सनातनच्या बालसंस्कार वर्गांना पाठवायची. आम्ही खोटे बोललो किंवा अयोग्य वागलो, तर आई आम्हाला मारायची. मी लहान असतांना मित्रांच्या समवेत शाळेतून घरी येतांना मित्र चित्रपटातील गीत म्हणत होते. घरी आल्यावर मी तेच गाणे म्हणत असल्याचे आईने ऐकले आणि मला मोठी शिक्षा केली. त्यानंतर मी कधीच चित्रपटाचे गाणे म्हटले नाही. जेव्हा मी नातेवाइकांकडे जातो, त्या वेळी त्यांची लहान मुलेही चित्रपटांची गाणी म्हणत असतात; पण आई आणि बाबा यांनी केलेल्या संस्कारांमुळे मला भजनांची आवड निर्माण झाली.

श्री. ईशान जोशी

७ आ. घरातील देवतांची पूजा करायला शिकवणे : आईच्या कुटुंबातील अनेक जण कर्मकांड जाणणारे आणि त्यानुसार आचरण करणारे आहेत. लहानपणापासून पूजा आणि यज्ञयाग पहात असल्यामुळे तिला श्री गणेशचतुर्थीला गणपतीची प्रतिष्ठापना करण्याची माहिती आहे. तिनेच मला ‘घरातील देवतांची पूजा कशी करायची ?’, हे शिकवले.

७ इ. सुट्टीमध्ये आश्रमात रहायला पाठवणे : त्यानंतर शाळेला सुट्टी असतांना तिने मला १ मास रामनाथी आश्रमात ‘वासंतिक वर्गात’ पाठवले. त्यामुळेच मी आश्रमात पूर्णवेळ साधनेसाठी येऊ शकलो आणि पाठशाळेमध्ये जुळवून घेणे मला जड गेले नाही. आईमुळेच मला मंत्र म्हणण्याची आवड निर्माण झाली.’

– श्री. ईशान जोशी (सौ. निवेदिता जोशी यांचा मुलगा)

८. पूर्णवेळ साधनेसाठी पाठिंबा देणे

८ अ. आई आणि बाबांनी नातेवाइकांचा विरोध सहन करणे अन् डगमगून न जाता त्यांना उत्तरे देणे : ‘मी आणि ताईने आश्रमात पूर्ण वेळ साधना करण्याविषयी आईकडे मत मांडले. त्या वेळी आईला पुष्कळ आनंद झाला. तिला आणि बाबांना नातेवाइकांनी पुष्कळ विरोध केला, तरी तिने २ – ३ वर्षे त्यांचा विरोध सहन केला आणि डगमगून न जाता प्रत्येकाला ती अन् बाबा उत्तरे देत होते.

८ आ. मुलांना कशातही अडकू न देता त्यांना सेवा आणि साधना यांकडे लक्ष देण्यास सांगणे : ‘‘नातेवाइकांचा ताण येतो का ?’’, असे त्यांना विचारल्यावर ते म्हणतात, ‘‘तुम्ही याचा विचार करू नका. आम्ही सांभाळून घेऊ. तुम्ही तुमची साधना आणि सेवा यांकडे लक्ष द्या अन् गुरुमाऊलींना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) अपेक्षित असे घडा.’’ ते आम्हाला यात अडकू देत नाहीत.

८ इ. ‘दोन्ही मुलांनी गुरुकार्यात स्वतःला वाहून घ्यावे आणि जीवनाचे सार्थक करावे’, असा आईचा विचार असणे : आईने आम्हाला आश्रमात पूर्णवेळ रहाण्यासाठी पाठिंबा दिला. ‘आम्ही दोघांनी गुरुकार्यात स्वतःला वाहून घ्यावे आणि जीवनाचे सार्थक करावे’, असा तिचा विचार असतो. आम्हा दोघांना आश्रमात पाठवण्यात आई-बाबांचा मोठा त्याग आहे. समाजाची सध्याची स्थिती पाहून ‘त्या वेळी त्यांनी घेतलेला निर्णय योग्य होता’, याविषयी त्यांना गुरूंप्रती कृतज्ञता वाटते.

९. भावस्थितीत राहून कृती करणे

९ अ. अनेक वेळा पोळ्यांवर आणि देवतांच्या चित्रांना कुंकू लावल्यावर त्यात ‘ॐ’ उमटणे : आई स्वयंपाक करतांना देवतांची स्तोत्रे किंवा भजने म्हणते आणि नामजप करते. त्यामुळे अनेक वेळा पोळ्यांवर ‘ॐ’ उमटतो. ‘तिने बनवलेला स्वयंपाक साक्षात् भगवंताने ग्रहण केला आहे आणि त्याची ही प्रचीती आहे’, असे वाटते. काही वेळा देवघरातील पूजा करतांना देवतांच्या चित्रांना कुंकू लावल्यावर त्यावरही ‘ॐ’ उमटतो. तिच्यातील भावामुळे भगवंत तिला प्रचीती देतो.

९ आ. भावसत्संगात भावप्रयोग घेण्यास क्षणाचाही विलंब न लागणे आणि आईमधील भावस्थितीमुळे भगवंताने नेहमी अनुभूती देणे : आई नंदुरबार येथील भावसत्संगात साधकांची भाववृद्धी व्हावी, यासाठी प्रयोग घेत असते. विशेष म्हणजे आईला ‘भावप्रयोग घे’, असे सांगितल्यावर ती लगेच भावविश्वात जाते आणि तिला भाववृद्धीसाठी प्रयोग करायला क्षणाचाही विलंब लागत नाही. त्यामुळे अनेक साधक आईकडून असे प्रयोग लिहून घेतात. तिलाही यात पुष्कळ आनंद मिळतो. तिच्यातील भावस्थितीमुळे तिला भगवंत नेहमी अनुभूती देतो.

९ इ. साधनेची ओढ : आई आम्हाला आश्रमात असतांना भ्रमणभाष करते. त्या वेळी प्रथम ‘‘तुमच्या मनाची स्थिती कशी आहे ? व्यष्टी साधना होते का ? साधना होत आहे ना ?’’, असे ती प्रश्न विचारते आणि तिचीही मनाची अन् साधनेची स्थिती सांगते. ती सतत ‘‘मी साधनेचे काय प्रयत्न करू ?’’, असे विचारत असते.

– कु. सानिका जोशी आणि श्री. ईशान जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.८.२०२१)


या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा :  https://sanatanprabhat.org/marathi/528363.html


येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक