मुलांवर साधनेचे संस्कार करून त्यांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी पाठिंबा देणार्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्या नंदुरबार येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. निवेदिता योगेंद्र जोशी (वय ४९ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधना करणार्या कु. सानिका जोशी (वय २४ वर्षे) आणि श्री. ईशान जोशी (वय २२ वर्षे) यांना त्यांची आई ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. निवेदिता जोशी यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१७ नोव्हेंबर या दिवशी आपण सौ. निवेदिता यांचे बालपण आणि काही सूत्रे पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/528102.html
१०. गुरुकार्याची तळमळ
१० अ. नातेवाइकांनाही साधनेचे महत्त्व पटवून देणे आणि काही जणांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ अंकही चालू करणे : आईमध्ये गुरुकार्य वाढवण्याची पुष्कळ तळमळ आहे. ती जाईल, तिथे सनातन संस्थेचा प्रसार करते. त्यामुळे अनेक नातेवाइकही सनातन संस्थेला जोडले गेले आहेत. सर्वांना आईमुळेच सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे महत्त्व लक्षात आले असून आता ते नियमित त्याचा उपयोग करतात. यातील काही जणांनी दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंकही चालू केला आहे.
१० आ. कोणत्याही अडचणींवर मात करून सेवेला प्राधान्य देणे : आईकडे नंदुरबार येथे अनेक सेवा आहेत. तिला कितीही शारीरिक त्रास होत असला किंवा घरातील कामांमुळे तिला सेवेला वेळ मिळत नसेल, तरी ती दुपारची विश्रांती घेण्याचे टाळून त्याऐवजी सेवेला प्राधान्य देते. यातून तिची सेवेची तळमळ दिसून येते. ती म्हणते, ‘‘माझ्यामुळे गुरुकार्य थांबायला नको.’’
११. परात्पर गुरु डॉक्टरांवरील दृढ श्रद्धा
११ अ. आपत्काळाविषयी आई-बाबांच्या मनाची झालेली सिद्धता ! : ‘एकदा आई-बाबा आणि आम्ही (मी आणि ईशान) घरी आपत्काळाविषयी चर्चा करत होतो. त्या वेळी ‘तुम्ही सुरक्षित ठिकाणी असायला हवे’, असे आम्हाला वाटते’, असे सांगितल्यावर आई-बाबा म्हणाले, ‘‘तुम्ही आमची काळजी करू नका. गुरुमाऊली आणि भगवंत यांचे आमच्यावर लक्ष आहे. त्या काळात आम्ही जिथे राहू, तिथे सुरक्षित असू. पुढे संपर्क यंत्रणाही बंद असतील. तेव्हा आमचा संपर्क झाला नाही; म्हणून तुम्ही घाबरू नका. भगवंताच्या कृपेमुळे आम्ही चांगलेच असू. तुम्ही या गोष्टींचा विचार करू नका. तुम्ही तुमच्या साधनेकडे लक्ष द्या आणि आनंदात रहा.’’ त्या वेळी ‘आपत्काळाविषयी त्यांच्या मनाची केवढी सिद्धता झालेली आहे’, हे आमच्या लक्षात आले.
११ आ. आईची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पुष्कळ श्रद्धा आहे. त्यामुळे तिच्या आयुष्यात कितीही संकटे आली, तरी ती डगमगून जात नाही.’
– कु. सानिका आणि श्री. ईशान जोशी
११ इ. मुलीला भावप्रयोग घेण्यास प्रोत्साहन देऊन तिच्याकडून तसे प्रयत्न करवून घेणे : ‘मी आणि ईशान काही दिवसांसाठी घरी गेलो होतो. तेव्हा आईने मला एका सत्संगात साधकांची भाववृद्धी होण्यासाठी प्रयोग घेण्यास सांगितले. तेव्हा ‘मला जमणार नाही’, या विचाराने मी नकार दिला. तेव्हा तिने मला प्रोत्साहन देत सांगितले, ‘‘भावप्रयोग तू घेणार नसून भगवंतच घेणार आहे. तू त्याला शरण जाऊन प्रार्थना कर. तुला आतून जे सुचेल, ते घे. देव तुला सुचवणार आहे. तुला सकारात्मक राहून प्रयत्न करायचे आहेत.’’ मी त्या सत्संगात पहिल्यांदाच भावप्रयोग घेतला.’
– कु. सानिका जोशी
१२. आईची अन्य वैशिष्ट्ये
अ. आई उत्तम भागवत कथा सांगते. आतापर्यंत तिने ८ ठिकाणी ‘भागवत सप्ताह’ केला आहे.
आ. ती उत्तम प्रकारे भजने म्हणते.
इ. ती उत्तम वक्ता आहे. राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ती कायम वक्ता म्हणून असते.
१३. आईमध्ये जाणवलेला पालट
अ. आईला पूर्वी साधकांकडून पुष्कळ अपेक्षा असायच्या. आता तिने स्वयंसूचना घेतल्यामुळे त्या न्यून झाल्या आहेत.
आ. ती अधिकाधिक भावस्थितीत रहाण्याचा प्रयत्न करते.
इ. आधीच्या तुलनेत तिच्या तोंडवळ्यामध्ये पुष्कळ पालट जाणवतो. तिच्या तोंडवळ्यावरील तेज वाढले असून ती आनंदी दिसते.
ई. आता ती श्रीमद्भगवत्गीताही शिकत आहे.
– कु. सानिका आणि श्री. ईशान जोशी
१४. परात्पर गुरु डॉक्टरांनी अयोग्य कृतीची जाणीव करून देऊन योग्य कृती करण्यास सांगणे
‘२४.८.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आईचा भावजागृतीच्या प्रयत्नांविषयीचा लेख छापून आला होता. २६.८.२०२१ या दिवशी मला परात्पर गुरु डॉक्टरांनी निरोप पाठवून विचारले, ‘दैनिकात छापून आलेल्या लेखाविषयी आईला भ्रमणभाष केला का ?’’ तेव्हा आम्ही दोघांनीही (मी आणि ईशान यांनी) आईला भ्रमणभाष केला नव्हता. त्यानंतर त्यांनी माझ्या चुकीची जाणीव करून दिली होती आणि सांगितले, ‘‘आईने एवढा सुंदर लेख लिहून दिला आहे, तर तिला भ्रमणभाष करायला हवा.’’
यातून गुरुमाऊलीने ‘कौतुक करून आनंद कसा द्यायचा ?’, हे शिकवले आणि संतांची साधकांवर असलेली प्रीती लक्षात आली.’
– कु. सानिका जोशी
‘हे गुरुमाऊली, ‘आम्ही आईला हा आनंद देण्यात न्यून पडलो’, यासाठी क्षमा मागतो. तुमच्याच कृपेमुळे आम्हाला अशी आई लाभली. त्यासाठी आम्ही कोटीशः कृतज्ञ आहोत.’
(समाप्त)
– कु. सानिका जोशी आणि श्री. ईशान जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.८.२०२१)