आजी-माजी नगरसेवकांनी मालेगाव पेटवल्याच्या संशयाप्रकरणी आतापर्यंत ३३ जणांना अटक !

  • मालेगाव येथील हिंसाचार प्रकरण
  • एका मोठ्या नेत्याच्या भावाचा शोध चालू !
मालेगाव येथील हिंसाचार

नाशिक – त्रिपुरा येथील कथित घटनेवरून मालेगाव, अमरावती आणि नांदेड शहरांत दंगली झाल्या. मालेगाव येथे या प्रकरणात आजी-माजी नगरसेवकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यांनीच हे प्रकरण पेटवल्याचा संशय असून आतापर्यंत ३३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील काही जणांचा शोध चालू आहे. त्यासाठी सी.सी.टी.व्ही. चित्रणांचा उपयोग केला जात आहे.

आजी-माजी नगरसेवक आणि बड्या राजकीय नेत्याच्या भावाचा दंगलीत हात !

मालेगाव हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी ५ वेगवेगळ्या प्रकरणांत गुन्हे नोंद केले आहेत. त्यात आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करणे, दगडफेक करणे, लोकांची माथी भडकावणे, त्यासाठी कट रचणे, अशा प्रकारे संशयितांचा शोध चालू आहे. त्यात सर्वजण आजी आणि माजी नगरसेवक आहेत. २ विद्यमान नगरसेवक, २ माजी नगसेवक आणि एका माजी नगरसेवकाचा पुत्र यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे एका मोठ्या राजकीय नेत्याचा आतेभाऊही संशयितांमध्ये आहे. त्याच्यासह २ विद्यमान नगरसेवकांचा शोध पोलीस घेत आहेत.

मालेगाव ‘बंद’ आणि फेरीच्या आयोजकांना अटक नाही !

मालेगावमध्ये त्रिपुरा येथील कथित हिंसाचाराच्या विरोधात ‘रझा अकादमी आणि ऑल इंडिया सुन्नी जमियत उलेमा’ यांनी ‘बंद’ पुकारला होता. तेव्हा मालेगाव शहरातून फेरी काढली होती. त्यानंतर हिंसाचार उसळला. अनेक दुकाने जाळली गेली. लाखो रुपयांच्या मालमत्तेची हानी झाली. या प्रकरणी आयोजकांवर गुन्हा नोंद झाला आहे; मात्र त्यांना अटक करण्यात आली नाही. (याचे उत्तर पोलिसांनी नागरिकांना द्यायला हवे ! – संपादक)