शिवप्रेमींमध्ये क्षात्रवृत्ती निर्माण करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे १५ नोव्हेंबर २०२१ या दिवशी निधन झाले. ते जरी या जगात नसले, तरी त्यांचे इतिहासाविषयीचे प्रेरक विचार आजही सर्वांच्या मनात आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांच्या चरित्राचे लेखक इतिहास संशोधक डॉ. सागर देशपांडे यांनी त्यांच्या जागवलेल्या काही स्मृती येथे देत आहोत.
छत्रपती शिवाजी महाराज रक्तात भिनवायला हवेत ! – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
‘आजच्या काळात अनेकजण छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर केवळ अत्तरासारखा लावून फिरण्यासाठी करतात; मात्र छत्रपती शिवाजी महाराज ही अत्तरासारखी लावायची नव्हे, तर रक्तात भिनवण्याची गोष्ट आहे.’ – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (१४.६.२०१८)
शिवशाहिरांची क्षात्रवृत्ती !
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ८५ व्या वर्षानंतर एकदा प्रवासात एका आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘बाबा, आपण थोड्या अल्प आवेशात भाषणे दिली, तर शरिरावर ताण अल्प पडेल असे वाटते.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘खरे आहे; पण श्रोत्यांना ते आवडणार नाही. तसेच त्यांचे अवधानही अल्प होईल आणि पराक्रमाची गाथा उलगडतांना मिळमिळीतपणा चालण्यासारखा नसतो.’
एकमेव शिवशाहीर !
‘इतिहास विसरणारे इतिहास घडवू शकत नाहीत’, या जाणिवेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाद्वारे अस्मिता आणि कर्तृत्व यांना संजीवन प्राप्त करून देण्याचे कार्य गेली अनुमाने ८० वर्षे अखंडपणे करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे एकमेव होते !’
दानशूर शिवशाहीर !
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी पुस्तकांची विक्री आणि व्याख्यान देण्यासाठी मिळणारे मानधन यांतून मिळालेले लाखो रुपये विविध संस्थांना दान केले आहेत. ‘महाराष्ट्रभूषण’ या सन्मानासमवेत मिळालेल्या १० लाख रुपयांतील केवळ १० पैसे त्यांनी स्वतःजवळ ठेवले. उरलेल्या रकमेत आणखी १५ लाख रुपये घालून त्यांनी ती सर्व रक्कम कर्करोगावर उपचार करणार्या रुग्णालयाला दान केली. ‘जाणता राजा’ या नाटकाच्या या प्रयोगांच्या उत्पन्नातून त्यांनी अनेक संस्थांना लाखो रुपयांचे साहाय्य केले आहे. बाबासाहेबांनी पन्नासपेक्षा अधिक मुलांना आसरा देऊन त्यांच्या योगक्षेमाची काळजी वाहिली आणि त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले आहे.
स्वातंत्र्यसैनिक शिवशाहीर !
पोर्तुगीज शासनाने दादरा-नगर हवेली प्रश्नी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताविरुद्ध खटला प्रविष्ट केला होता. त्याविषयी पंडित नेहरू यांनी अभ्यासक आणि संशोधक यांची ‘गोवा युनिट’ नावाची समिती स्थापन केली होती. भारताची बाजू पटवून देण्यासाठी आवश्यक ते पुरावे गोळा करण्याचे अत्यंत महत्त्वाचे आणि जोखमीचे दायित्व या समितीवर होते. तरुण संशोधक-अभ्यासक या नात्याने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचाही त्या समितीत समावेश होता. भारताच्या बाजूने पुरावे गोळा करण्यासाठी त्यांनी जीव धोक्यात घालून काम केले होते.
शिवशाहिरांची अभ्यासू वृत्ती !
शिवशाहिरांचे गुरु आणि इतिहास संशोधक प्रा. ग.ह. खरे अनेकदा सांगत, ‘‘बाबा एकदा दस्तावेजात डोके खुपसून बसला की, तहानभूक विसरून जायचा. मंडळातील ग्रंथ, कागदपत्रे यांचा त्याने जेवढा उपयोग करून घेतला, तेवढा कुणीही करून घेतला असेल, असे दिसत नाही.’’
तत्त्वनिष्ठ शिवशाहीर !
‘शिवशाहिरांनी शिवचरित्रावर देश-विदेशात १२ सहस्रांहून अधिक व्याख्याने दिली. ‘‘दिलेला शब्द पाळायचा नाही, याच्यासारखा मोठा गुन्हा आणि भ्रष्टाचार कोणता ?’, असे बाबासाहेब मानायचे. त्यांचा वेळेचा हट्ट पुष्कळ टोकाचा ! इतका की, ठरलेल्या वेळी आयोजक आणि श्रोते आलेले नसतांना त्यांनी साक्षात् विठ्ठलाला साक्षी ठेवून एका मंदिरात आपले नियोजित व्याख्यान चालू केले. घसा फुलून आलेला असतांनाही आणि अंगात ताप असूनही शिवभक्तांच्या आग्रहापायी नागपुरात एकाच दिवसात त्यांनी मध्यरात्रीपर्यंत नऊ व्याख्यानेही दिली आहेत.’
– इतिहास संशोधक डॉ. सागर देशपांडे (बाबासाहेबांच्या चरित्राचे लेखक)