शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली !

पुणे – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना राजकारणी, इतिहासकार, व्याख्याते, हिंदुत्वनिष्ठ आदी क्षेत्रांतील अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांपैकी काही मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली येथे देत आहोत.

राजकीय क्षेत्र

इतिहासाविषयी आस्था निर्माण करणारे योगदान ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

पुरंदरे यांनी शिवछत्रपतींचा इतिहास राज्याच्या समोर ठेवला. त्यात काही वादग्रस्त सूत्रेही होती; पण त्यासंबंधी भाष्य करण्याएवढा मी जाणकार किंवा इतिहास तज्ञ नाही. हे सगळे असले, तरी त्यांचे काम मोठे होते. कुणीही एखाद्या विषयात आयुष्य खर्ची केल्यानंतर काही लोक त्यात उणे काढण्याचा प्रयत्न करतात. तसे त्यांच्या संदर्भातही झाले असावे. असे असले, तरी आपल्या पूर्वजांचा इतिहास नव्या पिढीला समजण्यासाठी अत्यंत साध्या भाषेत मांडण्यासाठी आणि इतिहासाच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यांत ज्यांनी व्याख्याने घेतली अन् या विषयाच्या संदर्भातली आस्था नव्या पिढीमध्ये निर्माण करण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले, ते विसरू शकत नाही.

बालपणापासून शिवशौर्य आणि चरित्र सांगून बलशाली समाज घडवण्यात योगदान दिले ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

बाबासाहेब यांची सर्वांत मोठी ओळख कोणती असेल, तर त्यांनी कधीही इतिहास मोडून-तोडून सांगितला नाही. त्यांनी इतिहासावर निस्सीम प्रेम केले. श्रद्धाही जोपासली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित प्रत्येक दिनांक आणि प्रसंग मुखोद्गत असलेले बाबासाहेब होते. शिवकाळ हाच त्यांचा श्‍वास आणि प्राण होता. बालपणापासून शिवशौर्य आणि चरित्र सांगून बलशाली समाज घडवण्यात त्यांनी योगदान दिलेे. त्यांच्या जाण्याने एक अमोघ व्यक्तीमत्त्व, ज्येष्ठ इतिहासकार, संशोधक हरपला आहे. ‘राजा शिवछत्रपती’ हा चरित्रात्मक ग्रंथ, ‘जाणता राजा’ हे महानाट्य, हा त्यांनी आपल्याला दिलेला फार मोठा आणि अमूल्य ठेवा आहे. ध्येयाप्रत समर्पित व्यक्तीमत्त्व, वेळ-शब्दांचे पक्के, सतत राष्ट्रनिर्माणाचा विचार, संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी कठोर परिश्रम, असे बाबासाहेब पुरंदरे पुन्हा होणे नाही. एक महान कर्मयोगी आपल्यातून निघून गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

इतिहासकार

चालता-बोलता इतिहासच इतिहासजमा झाला ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, आंतरराष्ट्रीय व्याख्याते आणि इतिहासकार

महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने चालता-बोलता इतिहासच इतिहासजमा झाल्यासारखे वाटते. मुक्तीसंग्रामातील एक स्वातंत्र्यसैनिक ग.ह. खरे यांना गुरुस्थानी मानून इतिहासाची प्रामाणिकपणे मांडणी करणारा शिलेदार, मनमिळावू माणूस, उत्तम वक्ता आणि ज्यांच्यामुळे शिवचरित्र महाराष्ट्रात पोचले असा थोर इतिहासकार आपण गमावल्याची भावना मनात दाटून येत आहे. अर्थातच कौतुक करणारी, शाबासकीचा हात पाठीवर मारणारी जणू घरातील वाटावी, अशी एक पोक्त व्यक्ती दुरावली याचे शल्य वाटत राहील.

दैदिप्यमान इतिहासावर प्रकाश टाकणारे शेकडो कागद बाबासाहेबांनी जगासमोर आणले ! – ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, भारतीय इतिहास संशोधक मंडळ, पुणे

बाबासाहेब पुरंदरे हे भारतीय इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांनी मोडी लिपी, पर्शियन, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रजी इत्यादी भाषा अवगत केल्या आणि त्यांच्यातील सहस्रो साधनांचा अभ्यास करून त्यांनी शिवचरित्र साकार केले. बाबासाहेबांनी ऐन तारुण्यात सहस्रो मोडी कागदपत्रे अभ्यासली आणि त्यावर संशोधन करून मराठ्यांचा इतिहास जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अभ्यासलेल्या कागदपत्रांतून आपल्याला अठराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेतलेल्या मराठ्यांनी अटकपासून (अटक सध्याच्या पाकिस्तानात आहे) कटकपर्यंत (कटक ओडिशामध्ये आहे.) जे साम्राज्य निर्माण केले, त्या दैदिप्यमान इतिहासावर प्रकाश टाकणारी शेकडो कागदपत्रेही बाबासाहेबांनी जगासमोर आणली. मराठ्यांच्या सर्व मोहिमांवर प्रकाश टाकणारी कागदपत्रे बाबासाहेबांनी ५० ते ७५ वर्षांपूर्वी जगासमोर आणली. आमच्यासाठी बाबासाहेब ही फार मोठी प्रेरणा होती. आमच्या मंडळाचे ते आधारस्तंभ होते. त्यांनी जे कार्य उभे केलेले आहे, तेच कार्य आजच्या तरुण पिढीने पुढे नेले पाहिजे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

शिवचरित्रातून राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करणे, ही बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल ! – प्रा. मोहन शेटे, इतिहासतज्ञ

जीवनाची शतकपूर्ती करणार्‍या बाबासाहेबांनी छत्रपती शिवरायांचे चरित्र जनमानसात पोचवण्यासाठी सारे आयुष्य समर्पित केले. ५ लाख कि.मी.हून अधिक प्रवास, राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या १७ आवृत्त्या, ‘जाणता राजा’ या आशिया खंडातील २ र्‍या क्रमांकाच्या महानाट्याचे १ सहस्र २०० हून अधिक प्रयोग करणे आणि १ कोटीहून अधिक दर्शकांपर्यंत ते पोचणे, २१ सहस्र व्याख्याने अन् ३ कोटी रुपयांहून अधिक दानधर्म असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे. शिवछत्रपतींचे कार्य सांगण्यासाठी ८० वर्षे वयाच्या एका व्यक्तीने सतत कार्यरत रहाणे, हा जणू विश्‍वविक्रम आहे. बाबासाहेब भारतातील सर्व इतिहासप्रेमींसाठी आदर्श आहेत. शिवचरित्रातून राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करणे, ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल !

हिंदुत्वनिष्ठ

बाबासाहेबांचे स्फूर्तीदायक जीवन पिढ्यानपिढ्या शिवरायांचा प्रताप आणि प्रेरणा जागृत ठेवील ! – सरसंघचालक मोहन भागवत

आदरणीय बळवंत मोरेश्‍वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने आपण सर्वच एका शतायुषी शिवऋषीला मुकलो आहोत. तरुण वयापासूनच देशभक्तीचा वसा त्यांना संघाच्या शाखेतून प्राप्त झाला. तो ध्यास मनात ठेवून ध्येयप्राप्तीकरिता तत्वरूप आदर्श पुरुष म्हणून छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज यांची भक्ती त्यांनी जीवनभर निष्ठेने केली. दादरा नगर-हवेलीच्या मुक्तीसंग्रामात सैनिक म्हणूनही ते लढले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची कथा आपल्या वक्तृत्वाच्या बळावर त्यांनी घराघरांत पोचवली. त्यासाठी जीवनभर असंख्य परिश्रम केले. अत्यंत कठीण परिस्थितीतून केलेल्या या वाटचालीतूनच ‘जाणता राजा’सारख्या भव्य आणि प्रेरक नाट्यशिल्पाची निर्मिती त्यांनी केली. त्या देशभक्त आणि परिश्रमी शिवशाहीर यांचे पार्थिव जरी दृष्टीआड झाले, तरी त्यांचे स्फूर्तीदायक जीवन समाजामध्ये पिढ्यानपिढ्या शिवरायांचा प्रताप अन् प्रेरणा सतत जागृत ठेवील.

‘हिंदु राष्ट्र व्हावे’, ही बाबासाहेब पुरंदरे यांची प्रबळ इच्छा होती ! – श्री. विद्याधरपंत नारगोलकर, महामंत्री, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे

एक हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु धर्माभिमानी व्यक्तीमत्त्व आपल्यातून हरवले. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला सतत मिळायचे. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर, ही त्यांची आराध्य दैवते होती. हिंदु राष्ट्राविषयी त्यांना अभिमान होता. हिंदु राष्ट्र व्हावे, ही त्यांची प्रबळ इच्छा होती. सनातन धर्माविषयी त्यांना अतिशय आदर होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी उडी मारल्याच्या इतिहासाला १०० वर्षे झाली, त्या वेळी ते आणि मी भेटलो होतो. आज ते कालवश झाले. मी त्यांना मनापासून श्रद्धांजली वहातो.

बाबासाहेब ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथरूपात शिवरायांचा इतिहास अनंतकाळ कथन करत रहातील ! – दुर्गेश परुळकर, लेखक आणि व्याख्याते

स्वर्गामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सर्व मावळे बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले असतील, यात शंका नाही. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथरूपात शिवरायांचा इतिहास अनंतकाळ कथन करत रहातील, याची निश्‍चिती आहे. त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र कथन करत व्यतीत केले. ‘जाणता राजा’ या महानाट्यातून त्यांनी शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचा इतिहास साकार केला. त्यासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा कल्पकतेने वापर केला. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन ! शिवरायांचा आधुनिक भाट कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरीनाथाच्या चरणी विलीन झाला !

आध्यात्मिक

शिवस्फूर्तीचा अत्यंत मोठा प्रवाह अंतर्धान पावला ! – प.पू. गोविंददेव गिरी महाराज

बाबासाहेब पुरंदरे हे उभ्या महाराष्ट्राच्या शिवचैतन्याला जागृत करणारे अत्यंत मोठे व्यासपीठ होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातील जागरूकता लोकमान्यांनी उभी केली आणि ती अगदी घराघरांपर्यंत आणि विशेषतः युवकांच्या अंतःकरणाला भिडेल अशाप्रकारे सगळीकडे पोचवण्याचे कार्य शिवशाहिरांनी केले. माझ्यातील शिवप्रेमाला अत्यंत मोठी स्फूर्ती ज्या २ ठिकाणांहून मिळाली, ते म्हणजे स्वर्गीय बाळशास्त्री हरदास आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ! त्यांनी उभा महाराष्ट्र शिवछत्रपतींच्या भक्तीने भारून टाकला. त्यांनी केलेले हे अत्यंत मोठे, ऐतिहासिक कार्य इतिहासाला कधीच विसरता येणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराज हे खरे प्रेरणास्रोत आहेत. ही प्रेरणा सगळीकडे पोचवण्याचे कार्य नियतीने बाबासाहेबांकडून करून घेतले. त्यांनी केलेले परिश्रम, केलेला अभ्यास, तसेच प्रवास आणि त्यांनी जोडलेली माणसे, शिवसृष्टी आणि जाणता राजा या रूपाने आम्हाला दिलेली अत्यंत मोठी देणगी हे सर्व काही अविस्मरणीय अन् आदरणीय आहे.

एक शतायुषी, अत्यंत महान शिवभक्त, नव्हे नव्हे शिवस्फूर्तीचा अत्यंत मोठा प्रवाह अंतर्धान पावला. मी त्यांच्या पुण्यस्मृतीला अत्यंत भारावलेल्या अंत:करणाने श्रद्धांजली वहातो. त्यांची स्फूर्ती युवकांच्या मनात कायम जागृत राहील आणि या देशाचे भवितव्य छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेल्या दिशेने सातत्याने पुढे साकारत जाईल, असा माझा विश्‍वास आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांचे कार्य समस्त वारकरी संप्रदायासाठी नेहमीच प्रेरणादायी ! – ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे, मुख्य प्रशासक, राष्ट्रीय वारकरी परिषद

‘गेले दिगंबर ईश्‍वर विभूती । राहिल्या त्या कीर्ती जगामाजी ॥’ आमच्या पारायणरूपी शिवचरित्रात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘राजा शिवछत्रपती’ या पुस्तकाचा संदर्भ येत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, तसेच राजघराणे यांंमध्येही बाबासाहेब पुरंदरे यांच्याप्रती पुष्कळ आदर दिसून येतो. वारकरी कीर्तनाच्या माध्यमांतून जागर करतात, त्याचप्रमाणे बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या ओघवत्या वाणीतून शिवचरित्र जागवले. बाबासाहेब पुरंदरे यांचे कार्य समस्त वारकरी संप्रदायासाठी नेहमीच प्रेरणा देणारे आहे.