शिवचरित्राद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्‍वल्‍य इतिहास जिवंत करणारे पद्मविभूषण, शतायुषी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कालवश

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

पुणे – हिंदवी स्‍वराज्‍याची धगधगती ज्‍वाला प्रत्‍येकाच्‍या मनामनात प्रज्‍वलित होण्‍यासाठी ‘जाळत्‍या ठिणग्‍या’ एकत्र करून जीवनातील ६० वर्षे शिवचरित्राचा अखंड ‘शिवयज्ञ’ करणारे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्‍वल्‍य इतिहास सर्वांसमोर जिवंत करणारे तपस्‍वी, ज्‍येष्‍ठ इतिहाससंशोधक, पद्मविभूषण, शतायुषी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे १५ नोव्‍हेंबर या दिवशी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी येथील दीनानाथ मंगेशकर रुग्‍णालयात उपचार चालू असतांना निधन झाले.

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा.)

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्‍यांचे अवघे जीवन शिवछत्रपतींच्‍या कार्यासाठी समर्पित केले होते. हिंदवी स्‍वराज्‍याच्‍या इतिहासाचा ध्‍यास घेतलेले बाबासाहेब यांनी त्‍यांच्‍या क्षात्रतेजयुक्‍त वाणीने छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या संदर्भात देशविदेशांत सहस्रो व्‍याख्‍याने दिली. त्‍यांच्‍या या अमूल्‍य कार्यासाठी त्‍यांना वर्ष २०१५ मध्‍ये महाराष्‍ट्रभूषण पुरस्‍कार, वर्ष २०१९ मध्‍ये पद्मविभूषण पुरस्‍कार आणि अन्‍य अनेक पुरस्‍कारांनी सन्‍मानित करण्‍यात आले होते.

कलियुगातील तपस्‍वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्‍या निधनाने समस्‍त राष्‍ट्र-धर्मप्रेमींमध्‍ये हळहळ व्‍यक्‍त होत आहे. ‘शिवशाहीरांनी आरंभलेल्‍या शिवयज्ञाला पुढे अविरतपणे चालू ठेवू’ अशी भावना समस्‍त शिवप्रेमींमध्‍ये आहे.

वर्ष २०२१ मध्‍ये ऑगस्‍ट मासात त्‍यांनी वयाच्‍या १०० व्‍या वर्षात पदार्पण केल्‍याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने पुणे येथील त्‍यांच्‍या रहात्‍या घरी त्‍यांचा सन्‍मान करण्‍यात आला होता. हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय मार्गदर्शक सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्‍या कार्याच्‍या गौरवार्थ लिहिलेले सन्‍मानपत्रही त्‍यांना भेट देण्‍यात आले होते.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्‍या कार्यामुळेच येणार्‍या पिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी आणखी जोडल्‍या जातील ! – पंतप्रधान मोदी

चित्रावर क्लिक करा

हे शब्‍दांच्‍या पलीकडचे दु:ख आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्‍या निधनाने इतिहास आणि सांस्‍कृतिक विश्‍वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्‍यांच्‍या कार्यामुळेच येणार्‍या पिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी आणखी जोडल्‍या जातील. त्‍यांनी केलेली इतर कामेही स्‍मरणात राहतील. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे त्‍यांच्‍या विपुल कार्यामुळे नेहमी जिवंत रहातील.  ओम शांती.

असा अलौकिक शिवआराधक होणे नाही ! – मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे

पृथ्‍वीच्‍या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. अशा या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्‍या स्‍तुतीसाठीच प्रयाण केले असाव. छत्रपती शिवाजी महाराजांची चिरंतन आराधना हाच शिवशाहीर बाबासाहेबांच्‍या शतायुष्‍याचा ऊर्जास्रोत राहीला आहे. त्‍यासाठी त्‍यांनी शिवरायांच्‍या पदस्‍पर्शाने पुनीत असा मुलूख पालथा घालण्‍यासाठी जीवाचे रान केले. जिथे-जिथे महाराजांचा स्‍पर्श झालेल्‍या वस्‍तू, वास्‍तू आणि गडकोट-किल्ले तिथे-तिथे बाबासाहेब पोचले. त्‍यांनी संदर्भ, माहिती गोळा केली, अभ्‍यास-संशोधन केले आणि तितक्‍याच तन्‍मयतेने शिवमहिमा केवळ महाराष्‍ट्र, देश नव्‍हे तर जगभर पोचवला. घरा-घरात शिवभक्‍त निर्माण व्‍हावेत आणि या शिवभक्‍तांना त्‍यांच्‍या आराध्‍याच्‍या तेजःपुंज पैलूंचे दर्शन घडवावे, यालाच बाबासाहेबांनी जीवन कार्य मानले. पुरंदरेवाडा हा अनेकांसाठी अनेक अर्थांनी आधार होता. हा आधारवड त्‍यांच्‍या निधनामुळे अंतर्धान पावला आहे.

ब्राह्मतेजाची धगधगती ज्वाला शांत झाली ! – सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस

छत्रपती शिवाजी महाराजांची चरित्रगाथा ओघवत्या शैलीत लेखन आणि वक्तृत्व यांद्वारे मांडणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे ब्राह्मतेजाची धगधगती ज्वाला शांत झाली आहे. शिवछत्रपतींविषयीच्या निस्सीम भक्तीच्या बळावर त्यांनी जात्यंधांचा विरोध सहन करून गेल्या अनेक पिढ्या आणि अनेक दशके महाराष्ट्राला ‘शिवसाक्षर’ करण्यात मोलाचा वाटा उचलला होता. सनातन संस्था आणि शिवशाहीरांचे आत्मीय संबंध होते. त्यांना मृत्यूंतर उत्तम गती मिळावी, ही श्री भवानीदेवीच्या चरणी प्रार्थना !
– श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था.


हे सुद्धा वाचा –

♦ शिवचरित्र आणि इतिहासविषयक लिखाण सामान्यांपर्यंत पोचवण्याचे कार्य करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे !
https://sanatanprabhat.org/marathi/502519.html

♦ इतिहास-संशोधनाच्या क्षेत्रात अफाट कार्य करूनही नम्रतेने अन् प्रेमाने सर्वांना आपलेसे करणारे ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (वय ९९ वर्षे) !

https://sanatanprabhat.org/marathi/504051.html

♦ छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा हिंदु मन:पटलावर कोरणारे शिल्पकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे !
https://sanatanprabhat.org/marathi/504114.html

♦ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीकडून सन्मान !
https://sanatanprabhat.org/marathi/503977.html

__________________________________________________________________________________________________________________