सुविधांची वानवा असतांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चालू करण्याची घाई का ? – परशुराम उपरकर, राज्य सरचिटणीस, मनसे

सोयीसुविधा उपलब्ध केल्यानंतरच वैद्यकीय महाविद्यालय चालू करा, हेही का सांगावे लागते ? – संपादक

परशुराम उपरकर

 

कणकवली – सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक इमारती, साहित्य, पदांची नियुक्ती यांसह अनेक सुविधांची वानवा आहे. कोरोना महामारीला प्रतिबंध करण्यासाठी आलेला निधी खर्च करून जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयासाठी तात्पुरती डागडुजी आणि सुविधा केल्या जात आहेत; मात्र सोयीसुविधा उपलब्ध नसतांना वैद्यकीय महाविद्यालय चालू करण्यासाठी घाई का केली जात आहे ? त्याऐवजी सर्व सोयीसुविधा उपलब्ध केल्यानंतरच वैद्यकीय महाविद्यालय चालू करा, असा सल्ला मनसेचे राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
कणकवली शहरातील मनसे कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपरकर म्हणाले,

१. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी २२ एकर भूमीची आवश्यकता आहे. सध्या सिंधुदुर्गनगरीत प्रस्तावित असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासकीय भूमीचे अद्याप संपादन झालेले नाही. केवळ फलक लावलेले आहेत.

२. जिल्ह्याला कोरोना महामारीच्या अनुषंगाने आलेल्या निधीतून वैद्यकीय महाविद्यालयासाठी खाटा, जनरेटर आदी साहित्याची खरेदी केली जात आहे. जिल्हा रुग्णालयाची रंगरंगोटी करण्यात आली आहे. अद्ययावत् ‘शस्त्रक्रिया गृह’ (ऑपरेशन थिएटर), आधुनिक वैद्यांसाठी (डॉक्टरांसाठी) निवासस्थाने, अशा अनेक इमारतींची वानवा आहे.

३. वैद्यकीय शिक्षण विभागाने या वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासकीय निर्णय घेतला असला, तरी आवश्यक कर्मचारी आणि इतर गोष्टी यांविषयी सार्वजनिक आरोग्य विभागाने कोणताही निर्णय दिलेला नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणाच संभ्रमात आहे.

४. वैद्यकीय शिक्षण विभागाने वैद्यकीय महाविद्यालयासाठी संमत केलेल्या ६५० कोटी रुपये निधीपैकी १०० कोटी रुपये मिळाले असले, तरी त्यातून इमारती आणि अन्य काम करता येईल. या महाविद्यालयात राज्य आणि देशभरातूनही विद्यार्थी येणार असल्याने महाविद्यालय परिपूर्ण होणे आवश्यक आहे.