शहरात ‘फ्लॅग मार्च’ काढला
नागपूर – अमरावती शहरात उसळलेली दंगल, जाळपोळ आणि दगडफेक या घटना लक्षात घेऊन शहर पोलीसदल सतर्क झाले आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वात शहरभर पोलिसांनी ‘फ्लॅगमार्च’ (संचलन) केला. कोणत्याही स्थितीसाठी शहर पोलीस सिद्ध आहेत, असे संकेतही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी १४ नोव्हेंबर या दिवशी दिले आहेत.
१. १३ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि शहरातील सर्वच पोलीस उपायुक्तांसह साहाय्यक पोलीस आयुक्त दर्जांच्या अधिकार्यांसमवेत आयुक्त अमितेश कुमार यांनी तातडीची बैठक घेतली. सर्व अधिकार्यांना सतर्क रहाण्याच्या सूचना केल्या, तसेच शहरातील सर्वच प्रतिष्ठाने, उपाहारगृहे आणि ढाबे सक्तीने वेळेवर बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
२. शहरातील जवळपास ३१ संवेदनशील ठिकाणांवर शस्त्रधारी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पोलीस नियंत्रण कक्षात राखीव पोलीस दलाच्या तुकड्या शस्त्रांसह सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. ६ आर्.सी.पी. पथके आणि ५ क्यु.आर्.टी पथके यांना २४ घंटे सतर्क रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत.
३. शहरातील घडामोडींवर साध्या वेशातील पोलीस लक्ष ठेवून आहेत. धार्मिक संघटनांची संमेलने, राजकीय पक्षांच्या बैठका आणि कार्यकर्ता मेळावे इत्यादींवर पोलिसांचे लक्ष रहाणार आहे.
४. अमरावती शहरातील दंगलीची स्थिती लक्षात घेता साहाय्यासाठी साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात ५ पोलीस निरीक्षक, १० साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांसह १०० पोलीस कर्मचार्यांचे पथक अमरावती शहरात पाठवण्यात आले आहे.
सामाजिक माध्यमांवरही पोलिसांचे लक्ष !अमरावती शहरात उसळलेल्या दंगलीचे अनेक व्हिडिओ आणि छायाचित्रे नागपूर येथील सामाजिक माध्यमांवर फिरत आहेत. प्रक्षोभक वक्तव्ये आणि हिंसाचार यांची छायाचित्रे प्रसारित करणार्यांवर नागपूर सायबर पोलिसांनी लक्ष ठेवले आहे. कोणत्याही प्रकारचे हिंसक आणि तथ्यहीन वृत्त सामाजिक माध्यमांवर प्रसारित करणार्यांवर थेट गुन्हे नोंद करण्यात येणार आहेत. |